भोग आणि ईश्वर ५९० (१डिसेंबर, २०२० पासून अखंड)
ही मालिका ६०० व्या भागाला समाप्त करण्यात येईल.
मनाच्या अनेक अवस्थांमध्ये मनाची जडणघडण कशी आहे, यावर ते मन अनेक कसोट्यांवर कसं प्रतिक्रिया देतं, काय कृती करतं, हे अवलबून आहे. मनाच्या अवस्थेतून मनाची लवचिकता किती आहे, हे लक्षात येतं. मनाला सर्व परिस्थितीशी जुळवून पुढे जाण्याची सवय असावी. पण यातील काही गोष्टी आपल्या हातात असतातच असं नाही, असा एक समज असतो.
असा समज होण्याचं कारण म्हणजे आपण मनाच्या ताब्यात असलेल्या बुद्धीने कार्य करतो आणि विचार करतो. जर आपण अश्या कोणत्याही बंधनाशिवाय बुद्धीला विचार करायला लावलं, तर नक्कीच लक्षात येईल की, मन हे जर नियंत्रणात आलं, तर नक्कीच त्याचा उपयोग अनेक गोष्टी साध्य करण्यासाठी होऊ शकतो. पण या स्थितीला येण्या साठी मनाला शांतपणे विचार करायला लावायची सवय जडवून घ्यावी लागते.
अर्थात काही जणांना उपजत शांतपणे विचार करून निर्णय घेण्याची सवय असते, अगदी जन्मतः. यावर विचार केला तर लक्षात येईल की, याची बीजं एकतर जन्माआधीच्या संगोपनात असतील किंवा आदल्या जन्मातील अर्धवट राहिलेल्या काही कर्मात. म्हणजे जर आधीच्या जन्मात मनाला स्थिर करून, शांत करून, ध्यान धारणा यांचा थोडफार अभ्यास करण्यात आला असेल, तर त्या सवयीमुळे आत्मशक्ती थोड्याफार प्रमाणात जागृत झालेली असते.
मग अश्या चांगल्या किंवा वाईट सवयी, जर आधीच्या जन्मात लावून घेतलेल्या असतील तर, त्या या जन्मात प्रकर्षाने दिसून येतात. त्यानुसारच आपण एखाद्या बद्दल बोलताना म्हणतो की, हा जन्मतः खूपच उद्दाम आहे, अमका पहिल्यापासून शांत आहे इत्यादी. यातील काही उदाहरणं अशी असतात की, लहानपण अगदी विरुद्ध वातावरणात गेलं असेल तरीही,
सदर व्यक्ती, त्या संस्कारित वातावरणाच्या अगदी विरुद्ध असू शकतात. आता एवढं सर्व सांगायचं कारण म्हणजे, जर या जन्मीच्या आपल्या काही सवयी चांगल्या किंवा काही वाईट असतील तर, आपणच त्यावर गांभीर्याने विचार करून, चांगल्या सवयी अजून दृढ आणि वाईट सवयी त्यागून, निदान या जन्माच्या शेवटापर्यंत त्यातून आपली सुटका करून घेऊ शकतो.
यासाठीच सर्वप्रथम मनाला चिंतनातून, विचार करण्याला प्रवृत्त्त केलं पाहिजे. ज्यातून मनाला स्वतःबद्दल विचार करायची सवय लागेल. अश्या चिंतनातून आपल्याच अनेक नकारात्मक बाबी किंवा अवगुण लक्षात येऊ शकतात. त्यावर दीर्घ चिंतन करून, त्यांचा त्याग करण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू शकतो.
यावर पुढील भागात अधिक चिंतन करून मार्ग शोधण्याचा प्रयत्न करूया. पण तोपर्यंत आपल नाम आपल्या सोबत राहील, याची दक्षता घेत राहूया.
भोग आणि ईश्वर भाग १ (लेख क्र १ ते ६७) व भाग २ (लेख क्र ६८ ते १३७), ही पुस्तकं उपलब्ध आहेत. आपण खाली दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क साधून, , पुस्तक मागवू शकता.
©® विचार व लेखन : प्रसन्न आठवले
१३/०७/२०२२
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️
श्रीकृष्ण प्रेरणा!!श्रीकृष्णार्पणमस्तू !!
Comments
Post a Comment