अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - २
पुत्राच्या या कथनानंतर हनुमंतांनी त्याला आलिंगन दिले आणि येथेच प्रतीक्षा कर असे सांगून आपण मंदिरात प्रवेश करते झाले. मंदिरात पाच भिन्न दिशांना पाच मोठे दिवे सर्वकाळ तेवत आहेत हे जाणवत होतं . मंदिरात प्रवेश करताच हनुमंत माता कामाक्षीचं स्मरण करतात. काही क्षणात माता हनुमंताच्या समोर प्रकट होते. हनुमंत मातेला नमस्कार करतात.
"हे माते, मी आपल्या दर्शनाने कृतार्थ झालो. आपल्या समोर आता माझे स्वामी श्रीराम आणि त्यांचे बंधू लक्ष्मण यांना बळी दिलं जाईल. आपली याला मान्यता आहे का. मी माझ्या स्वामी आणि त्यांचे बंधू यांच्या सुटकेकरता आलो आहे. "
"हे हनुमान मी प्रभू श्रीराम आणि बंधू लक्ष्मण यांना ओळखलंय. मला स्वतःला अहिरावण व महिरावण यांचा बळी हवाय. परंतु हे अहिरावण आणि महिरावण अत्यंत दुष्ट आहेत ते येथे यज्ञकार्य करून नित्य माझ्या भक्तांचे बळी देत असतात. परंतु मी काहीच करू शकत नाही, कारण त्यांचा मृत्यू माझ्या हाती नाही. परंतु जर तू त्या दोहोंच्या सुटकेकरता आला असलास तर तुला तुझ्या कार्यात यश मिळो हा आशीर्वाद मी नक्की तुला देऊ शकतो. यशस्वी भव. या मंदिरात, पांच दिशांना पाच दीप प्रज्वलित आहेत ते जर एकाच वेळी विझले तर या दोघांचा अंत करणं, तुला शक्य होईल"
देवीला प्रणाम करून हनुमंत भ्रमराचं रूप धारण करून गर्भगृहात प्रवेश करते झाले. गर्भगृहात प्रवेश करताच हनुमंत मातेचं रूप धारण करून मूर्तीच्या जागी उभे राहतात. यथावकाश अहिरावण आणि महिरावण , श्रीरामलक्ष्मण यांना घेऊन मंदिरात प्रवेश करतात. आत प्रवेश करताच माता त्यांना कथन करते कि,
"मातेची पूजा आज गवाक्ष न उघडताच करावी आणि बळी पण तसाच द्यावा."
मातेच्या इच्छेनुसार दोघे असुर बंधू यथाविधी पूजा करतात. पूजेनिमित्त चढवले जाणारे भोग, मातेला गवाक्षातूनच दिले जातात. पूजेपश्चात श्रीरामलक्ष्मण यांनादेखील गवाक्षातूनच आत मातेला बळी म्हणून दिलं जातं. मातारुपी हनुमंत दोघांचा स्वीकार करून तिथून पलायन करतात. अजूनही श्रीरामलक्ष्मण संमोहित अवस्थेत मूर्च्छित आहेत. वास्तविक दोघांची सुटका करून हनुमंत तिथून पलायन करू शकत होते, परंतु माता कामाक्षीला दिलेल्या वचनानुसार दोन्ही असुरांचा बळी देणं गरजेचं होतं.
याच दरम्यान दोन्ही असुरांना सर्व प्रकार लक्षात येतो आणि ते हनुमंताच्या मागोमाग शस्त्र घेऊन धावतात. हनुमंत, दोन्ही मूर्च्छित बंधू, श्रीरामलक्ष्मण यांना सुरक्षित ठिकाणी ठेवून मकरध्वजाच्या साथीने दोन्ही असुरांशी लढण्यात मग्न झाला. परंतु काय झालं ते कळेना, जितक्या वेळा हनुमंत दोन्ही असुरांना यमसदनी धाडत होता, तितकया वेळा असुर पाच पाच रूपांनी पुन्हा येऊन लढत होते. या प्रकाराने हनुमंत आश्चर्यचकित होऊन मकरध्वजाला म्हणाला
" हा काय प्रकार आहे तुला माहीत आहे."
"नाही पिताश्री. परंतु अहिरावणाची पत्नी नागकन्या आहे. परंतु तिला बळजबरीने त्यांनी पळवून आणून लग्न केलंय. ती त्यांच्यावर नाराज आहे. तिला यातून सुटका हवी आहे. ती नागकन्या, आपल्याला नक्की मदत करेल."
" ठीक आहे. मी त्या नागकन्येला भेटायला अहिरावण महाली जातो. मी जाऊन येईपर्यंत तू यांना लढण्यात गुंतवून ठेव."
मकरध्वज हनुमंतांना नमस्कार करून, यशस्वी होण्याचा आशीर्वाद घेतो आणि हनुमंत अहिरावणाच्या महालाच्या दिशेने वायूवेगे जातो, अर्थातच भुंग्याचं रूप घेऊन."
क्रमशः
भाग २ समाप्त
संकलन आणि लेखन : प्रसन्न आठवले.
०८/०५/२०२०
Comments
Post a Comment