सुभद्राहरण ३८ समाप्तीचा भाग
ll श्रीगणेशाय नमः ll ll श्रीलक्ष्मीनारायणाय नमः ll
दुसऱ्या दिवशी भल्या पहाटे उठून, लग्नानंतरचे कुलाचार म्हणून पूजा करण्यात आली. कृष्णाने सजवून नटवून अर्जुनाला पुजास्थानी आणलं. अर्थात नवपरिणीत सौभाग्यवती सौभाग्यालंकार परिधान केलेली स्वर्गीय सोंदर्याची मूर्ती सुभद्रा अर्जुनाशेजारी विराजित झाली. कुलोपाध्यय यांनी विधिवत पूजेला सुरवात केली.
श्रीगणेश पूजन करून नवकोट नारायणाच्या घरी त्याच्याच समोर श्रीमनमहानारायणाची पूजा करण्यात आली. सर्वसाक्षी स्वतः साक्षी होता. विधिवत पूजा संपन्न झाली. आमंत्रित मंडळींच्या भोजनाचा समारंभ उरकला. सर्वजण भोजनोत्तर वार्तालाप करत आहेत. त्यात अर्जुन आपला मानस व्यक्त करतो.
" हे वसुदेव मामा आणि देवकी मामी, आता माझ्या नियोजित एक तपाच्या यात्रेतील एक संवत्सर बाकी आहे. तो एक संवत्सराचा कालावधी पुष्कर क्षेत्री व्यतीत करून, ततपश्चात तिथूनच इंद्रप्रस्थास प्रस्थान करीन. म्हणून मी आणि सुभद्रा उद्याच येथून प्रयाण करू. आज्ञा द्यावी."
भावविभोर वसुदेव आणि देवकी अर्जुनाच्या समीप आले आणि वसुदेव हात जोडून अर्जुनाला म्हणाले
" हे अर्जुना, माझी लाडकी कन्या आता तुझी भार्या आहे. तिचे सारे सुखदुःख आता तुझ्याच हाती आहे. पण अलौकीक असा वधूपिता होण्याचं भाग्य मला लाभलंय, ज्याचा जामात नरवीर अर्जुन आहे. तरीही एका कन्येचा पिता म्हणून मी हात जोडून इतकंच म्हणेन की, माझ्या कन्येचा नीट सांभाळ कर"
इतकं बोलून वासुदेवांनी हात जोडले आणि त्यांना अश्रू अनावर झाले. माता देवकीच्या नेत्रीतर अखंड धारा सुरूच होत्या. अर्जुन त्यांचे हात धरून त्यांना म्हणाला
" वसुदेव मामा आणि देवकी मामी, आपण हात जोडावे , हे योग्य नव्हे. कारण मी आजही तोच अर्जुन आहे जो तुमची प्रिय भगिनी माता कुंती हीचा पुत्र आहे. आजही माझा कान धरून पृच्छा करण्याचा आपला अधिकार आहे आणि राहील. आपली कन्या आणि आता माझी भार्या प्रिय सुभद्रा ही माझ्या हृदयस्थ आहे. तिचं कल्याण आणि क्षेम पाहण्याचं उत्तरदायित्व माझं आहे. ते मी प्राणपणाने करीनच. तरीही काही न्यून वा चूक माझ्या हातून घडलंच तर हा केशव आहेच माझे कान धरायला. आपण निश्चीन्त असा. या विश्वातील कोणतीही शक्ती तिला तिळमात्रदेखील त्रास देऊ शकणार नाही, इतकी क्षमता या बाहुत नक्कीच आहे."
सुभद्रा जी आतापर्यंत फक्त कन्या, भगिनी, सखी या रुपात होती, तिला आता अर्जुनाची धर्मपत्नी वा भार्या हे इष्ट कोंदण मिळालं होतं. ज्याचा आनंद अवर्णनीय होता. ती देखील अर्जुनासह सुखी संसाराच्या स्वप्नात रममाण झाली. माता पिता दोन्ही प्रिय बंधू यांना सोडून जात असल्याचं दुःख होतंच. पण जगराहाटीनुसार ते क्रमप्राप्त होतं.
अर्जुन आपल्या कक्षात आला. ततपश्चात कृष्ण सुभद्रेला अर्जुनाच्या कक्षात घेऊन आला. काही काळ वार्तालाप करून कृष्ण अर्जुनाला म्हणाला
" तुला पुष्कर क्षेत्रासाठी पहाटे प्रस्थान करावे लागेल, त्या मुळे दोघेही विश्राम करा. मी उद्या पहाटे येतो तुम्ही तयार रहा. सुभद्रेचं समान इथेच आणून ठेवलंय. ते पहाटे रथात चढवलं जाईल. तूझ्या सह पुष्कर क्षेत्री व त्यानंतर संवत्सर पश्चात जाण्यासाठी दोन रथ सामानसुमानसह सोबत असतील. तू वीर आहेस आणि माझ्या प्रिय भगिनीची चिंता वाहण्यास समर्थ आहेस, हे मी जाणतो. परंतु कधीही गरज भासली तर स्मरणमात्रे मी उपस्थित असेन, हे जाण." इतकं बोलून कृष्ण कक्षातून प्रस्थान करता झाला.
अर्जुनाने आणि सुभद्रेने भल्या पहाटे उठून आवरून तयार होऊन कृष्णाच्या आगमनाची प्रतीक्षा केली. अल्प प्रतिक्षेतच कृष्ण उपस्थित झाला. सेवकांनी सर्व सामान रथात भरून तसा संदेश दिला. त्या संदेशापश्चात कृष्ण अर्जुन व सुभद्रा हे माता पिता महाराज उग्रसेन यांच्या चरणस्पर्शासाठी त्यांच्या कक्षात गेले. अर्थात मातेने कन्येची ओटी भरून तिला अलंकार भेट म्हणून दिले. अर्जुनालाही उचित भेट देऊन सर्वजण राजप्रासदाच्या मुख्य द्वारापाशी आले. तिथे अर्जुनाच्या रथासह, अर्जुनासह आलेला दळभार कृष्णाने सोबत दिलेले रथ, हे सर्व तयार होतं.
साश्रु नयनांनी निरोप घेत अर्जुन सुभद्रा प्रस्थान करते झाले. कृष्ण आपल्या रथात बसून अर्थातच द्वारकेच्या वेशीपर्यंत निघाला. वेशीपाशी अर्जुन सुभद्रा आणि कृष्ण यांचा उचित वार्तालाप झाला आणि जड अंतःकरणाने माधवाने निरोप दिला आणि तो माघारी परतला. अर्जुन सुभद्रा पुष्कर क्षेत्री एक संवत्सर, विवाहाच्या नवीन काळाचा आनंद घेत राहिले आणि तिथून इंद्रप्रस्थास प्रयाण करते झाले.
एका उत्तम विवाह सोहळ्यात आपण सहभागी झालो आज या निमित्ताने कृष्णाच्या प्रिय भगिनीचा विवाह अथ पासून इति पर्यंत पाहिला. कथा मांडताना संदर्भात वा मांडणीत काही न्यून राहिले असल्यास वा दोष असल्यास लेखक त्याबद्दल क्षमाप्रार्थी आहे.
पुढील कथाभाग काही कालावधीनन्तर लगेचच. सध्या घोळत असलेला विषय " देवकी" हा आहे.तो विषय घेऊन लवकरच नवीन लेखमालेसह उपस्थित होईन. तोपर्यंत उद्यापासून दुसरी एक लेखमाला काही दिवसांसाठी.
सर्व वाचकांचा आभारी आहे कारण ते या सदारीकरणाचे प्राण आहेत आणि त्यांच्या प्रतिसादामुळे मी लिहिता राहिलो. धन्यवाद, असाच लोभ असू द्या हीच विनंती.
भाग ३८ आणि सुभद्राहरण ही कथामाला समाप्त
०२/०५/२०२०
©® संकल्पना व लेखन : प्रसन्न आठवले
ll शुभम भवतू ll
ll श्रीकृष्णार्पणामस्तु ll जय श्रीकृष्ण ll
Comments
Post a Comment