सुभद्राहरण ४
ll श्रीगणेशाय नमः ll ll श्रीलक्ष्मीनारायणाय नमः ll
आश्वस्त झालेला द्विजवर अर्जुनास म्हणाला.
" हे महाबाहो, मी खांडवप्रस्थातील निवासी द्विजवर. आताच माझे गोधन व द्रव्य काही कंटकांनी बळजोरी करून माझ्या इथून चोरून नेले आहे. आपण माझ्या गोधनाचे आणि द्रव्याचे रक्षण करून त्यांना योग्य ते शासन द्याल हे जाणून मी येथे आलो आहे."
विप्रवराचे हे उद्गार ऐकून धर्मरक्षणार्थ तत्पर आणि पात्र असलेल्या अर्जुनाने त्या विप्रवरास त्वरित सहाय्य करण्याचे आश्वासन दिले. परंतु त्याच्या लगेचच लक्षात आलं की त्याचा चाप अर्थात गांडीव आणि शर असलेला भाता महालाच्या आतील कक्षात राहिला आहे, जिथे ज्येष्ठ बंधू युधिष्ठिर आणि द्रौपदी एकांतवासात आहेत. जर आतील कक्षात गेलो तर देवर्षीच्या नियमाचा भंग होतो आणि जर तसं न करता ब्राह्मणाचं साहाय्य केलं नाही तर क्षत्रिय व राजधर्माचं उल्लंघन होईल.
या भवतीनभवतीमध्ये बद्ध झालेल्या अर्जुनाने विचार केला की, देवर्षीनी घालून दिलेल्या नियमांचं उल्लंघन झालंच तर प्रायश्चित्त घेऊन त्या पातकातून मुक्ती मिळेल. परंतु विप्रवराला अर्थात असहाय्य जीवास सहाय्य न केल्यास घोर पातकाचं धनी व्हावं लागेल. या विचाराने तो त्वरित महालाच्या आतील कक्षात जाऊन गांडीव व शरभाता घेऊन त्या विप्रवराला म्हणाला
" चला आपण लगेच निघालो तर रथातून त्या शर्विलकाला गाठणं सहज शक्य होईल फार दूर नसतील गेले ते."
इतकं बोलून विप्रास घेऊन तो लगोलग जाऊन त्या शर्विलकास पकडून सैनिकांच्या हाती सोपवून आणि त्या विप्राचं सर्व गोधन आणि द्रव्य त्यास सोपवून माघारी आला. एकांतवासातून बाहेर आल्यावर आपल्या लाडक्या अनुज अर्जुनाबद्दल विचारपूस करत असलेल्या युधिष्ठिरासमोर अर्जुन येऊन उभा राहिला आणि सर्व वृत्तांत कथन करून अपराधी भावाने युधिष्ठिरास म्हणाला
" हे ज्येष्ठ भ्राता , आपण एकांतवासात असताना माझे चापबाण घेण्याच्या मिषाने मी देवर्षींनी घालून दिलेल्या नियमाचा भंग केल्याकारणाने मी त्या प्रमादाबद्दल प्रायश्चित्त करू इच्छितो. आपण मला अनुमती द्यावी."
अर्थातच त्याचे हे बोल ऐकून युधिष्ठिर त्वरेने म्हणाला
" हे प्रिय अनुज अर्जुन, तू नियमभंग जरी केला असलास तरी तो अपराधास पात्र नियमभंग होत नाही. कारण तुझा उद्देश सद्हेतुपुर्ण होता. म्हणून माझ्या मताने त्याचे प्रायश्चित्त तू घ्यावेस असं मला वाटत नाही"
यावर दोन्ही हात जोडून आणि युधिष्ठिराचे चरण धरून अर्जुन म्हणाला
" हे ज्येष्ठ भ्राताश्री हा आपला उदार दृष्टिकोन बंधुप्रेमातून आहे. तरीही आपण न्यायप्रिय आहात. प्रमादाबद्दल प्रायश्चित्त न घेता सबब सांगणं हे अप्रस्तुत आणि धर्मसंगत नाही. म्हणूनच आपण मला अनुमती द्यावी. देवर्षी नारद यांच्या आज्ञेनुसार, मी एक तप अर्थात बारा वर्षे वनात जाऊन ब्रम्हचर्य व्रताचे पालन करून मगच परत येईन. आज्ञा असावी."
अनुज अर्जुनाच्या या तर्कावर निरुत्तर झालेला युधिष्ठिर मोठ्या जड अंतःकरणाने म्हणाला
" तुझं कथन तर्कसंगत व न्यायोचितच आहे. परंतु जाताना तू काही विप्रवर, पांथस्थ व तिर्थयात्रेस्तव देशाटन करत आपल्या राज्यात उतरलेले यात्री , साधू, संन्यासी, ऋषींवर यांनाही न्यावस. त्याचप्रमाणे त्यांच्या रक्षणार्थ उचित दळभार अर्थात सैन्य व शस्त्र न्यावीस. कारण त्यांच्या तीर्थाटनात क्षत्रियांनी उचित सहाय्य व संरक्षणव्यवस्था पुरवणं हे कर्तव्य आहे."
अर्जुनाने युधिष्ठिराचं म्हणणं स्वीकारून प्रस्थानाची तयारी केली.
क्रमशः
भाग ४ समाप्त
©® संकल्पना व लेखन : प्रसन्न आठवले
ll शुभम भवतू ll
ll श्रीकृष्णार्पणामस्तु ll जय श्रीकृष्ण ll
Comments
Post a Comment