आज या संकटात अनेक हातानी ईश्वरच सहाय्य करतो आहे. ही नक्कीच दैवभूमी आहे. म्हणूनच प्रत्येक संकटात पुण्यवान माणसांच्या जाणिवा जागृत ठेवून त्यांच्या करवी सहाय्य करवून घेऊन ईश्वर या भूमीला संकटातून सहजी बाहेर काढतो. आजसुद्धा या संकटातून वैद्यकीय सेवा देणारे, सुरक्षा सेवा देणारे, अत्यावश्यक सेवा देणारे, सरकारी अधिकारी जे घरी न बसता अहोरात्र आपल्यासाठीच झटत आहेत, त्या सर्व सेवार्थीच्या माध्यमातून स्वतः ईश्वरच या भूमीवर अवतरला आहे., अशी माझी धारणा आहे. त्यांच्या मनोबलाला आपण द्विगुणित करूया.
काही अपवाद वगळता बहुतांशी जनसामान्य घरीच राहून त्यांना व सरकारला सहकार्यच करत आहेत. त्या सर्वांना ईश्वररूप मानून खालील ओळी लिहिल्या आहेत. ईश्वर हा वेगळा सहाय्य करत नाही तर मानवरूपातील त्याच्या अंशातूनच तो मानवाला सहाय्य करतो. म्हणूनच त्या मानवरूपातील सर्व सेवार्थी ईश्वरअंशाला ही शब्दरूप पुष्पमाला सादर.
अनंताची शक्ती पाठीशी
अनंत भजती ईश्वराला
अनंतरुपे पाहतो ज्याला
तोचि राखतो कृपे आम्हाला
निष्काळजी न आम्ही कधी
भक्ती करतो विधात्याची
कुणी म्हणती स्वामी त्यांना
महाराज म्हणती त्या स्वरूपाला
अनंतरुपे पाहतो ज्याला
तोचि राखतो कृपे आम्हाला
काळजी करी तो भक्तांची
भक्तीपुढे नमितो अनंतरश्मी
चिंता न करणे धर्म अमुचा
कृपावंत राखतो सर्वांना
अनंतरुपे पाहतो ज्याला
तोचि राखतो कृपे आम्हाला
कोटी कोटी अणूरूप आत्मन
करिती नित्य ज्याला नमन
तो परमात्मा जाणतो काळाला
रक्षणासाठी विनवू तयाला
अनंतरुपे पाहतो ज्याला
तोचि राखतो कृपे आम्हाला
अच्युतम केशवम नारायणाय
भजन नित्य करा मनात
जन जन तळमळे जगण्याला
पोहोचते साद ईशहृदयाला
अनंतरुपे पाहतो ज्याला
तोचि राखतो कृपे आम्हाला
जाणिवेच्या पार जो आहे
सार्थ त्याची कृपादृष्टी आहे
कोटी कोटी स्मरती ज्याला
तोचि राखेल या भूमीला
अनंतरुपे पाहतो ज्याला
तोचि राखतो कृपे आम्हाला
अनेक रूपे करी साहाय्य
सेवाव्रती राबती लाख नित्य
संकट भिते त्या मानवाला
पाठी ज्याच्या हात ईश्वराचा
अनंतरुपे पाहतो ज्याला
तोचि राखतो कृपे आम्हाला
©® कवी : प्रसन्न आठवले
३१/०३/२०२०
०९:०२
Comments
Post a Comment