Skip to main content

अध्यात्म विराम १७७

अध्यात्म विराम १७७

एक गोष्ट पक्की ध्यानात ठेवा की, जे खरे सद्गुरू आहेत आणि ज्यांना हे पद साधनेने आणि त्यांच्या त्यांच्या सद्गुरूंच्या कृपेने प्राप्त झालेले आहे, त्यांनी कधीही कोणत्याही गोष्टीसाठी साधक किंवा जनसामान्य यांच्या कडे जाहिरात केली नाही किंवा कोणत्याही प्रकारे प्रसिद्धीसाठी काहीही केलं नाही. हाच खऱ्या सद्गुरुंचा महिमा आहे की, त्यांना मी सद्गुरू आहे, असा कुठेही बोलबाला करावा लागला नाही.त्यांच्या सिद्धिने, साधनेने, तपोबलाने जन सामान्यांना जे अनुभव आले,जी अनुभूती प्राप्त झाली आणि जी प्रचिती मिळाली,त्याद्वारे, लोकां नीच त्यांच्या कार्याची प्रसिद्धी करून, भक्तांची मांदियाळी त्यांच्या मागे आली.

म्हणूनच कालचा प्रश्न की सद्गुरू हे करावे लागत नाहीत, तर ते आपल्या सिद्धीने, आपल्या भक्तांना आपल्याकडे खेचून आणतात. म्हणजेच ज्याप्रमाणे डब्यामध्ये गूळ वा साखर आहे, हे मुग्यांना सांगावे लागत नाही, त्याप्रमाणे खऱ्या सद्गुरुंचा पुण्यप्रभाव, भक्तांना आपल्याकडे खेचून घेतो. अनेक सद्गुरू आपल्या सिध्दीने आपल्या भक्तांना आपल्याकडे आणतात. त्यांना कोणाच्या प्रारब्धात भक्तीचा योग, मुक्तीच्या मार्गाची वाटचाल आणि साधनेचा खटाटोप आहे, याची जाण असते.

त्यामुळे, असे भक्त, साधक आपल्याकडे येतील याची व्यवस्था सद्गुरू स्वतः करतात. प्रत्येक सद्गुरूंना साधकांच्या येण्याचा काळ वेळ माहीत असते. ती ज्या जन्मामध्ये ठरलेली असते, त्या जन्मात त्या वेळी, योग्य ते सद्गुरू, त्या साधकांना शोधत येतात आणि योग्य वाटेवर घेऊन जातात. यामधे अजून एक महत्वाची गोष्ट, जी काल लेख संपताना आपण म्हणालो, ती ध्यानात घेण्या सारखी म्हणजे कोणत्याही सद्गुरूंच्या सिद्धीला, तपो बलाला कमी वा अधिक लेखण्याचा वा जोखण्याचा प्रयत्न कधीही करू नये. कारण प्रत्येक गुरुतत्व हे एकाच परमोच्च गुरुतत्वाशी निगडित असते. 

प्रत्येक सद्गुरूंकडे असलेलं साधनेचं व तपाचं बल हे प्राप्त परिस्थिती आणि त्यांच्या साधकांची आत्म् प्रगती, यासाठी जसं आणि जितकं आवश्यक आहे, तितकंच वापरत आणलं जातं. त्यामुळे जिथे साधकांची आत्मिक प्रगती वा वाढ थांबू शकते वा त्यात काही बाधा येण्याची शक्यता असते, तिथे त्या त्या सद्गुरू तत्वांकडून, त्याचा मर्यादित व नियंत्रित वापर केला जातो. त्यामुळे एखादी गोष्ट अमक्याला प्राप्त झाली आणि मला नाही वा एखाद्याची इच्छा पूर्ण झाली पण माझी नाही झाली, असा विचार, एकाच सद्गुरूंबाबत दोन साधकांनी किंवा दोन भिन्न देहात वास करणाऱ्या सद्गुरूंबाबत त्यांच्या त्यांच्या साधकांनी कधीही करता कामा नये. 

याबाबत एक गोष्ट पूर्णपणे आणि कायमस्वरूपी ध्यानात असावी की, आपल्या साधकांच्या आत्मिक प्रगती व उन्नत्ती कडे प्रत्येक सद्गुरू ध्यान देत असल्यामुळे, एखादा तात्पुरता आनंद वा सुख किंवा समाधान आपल्याला न देण्यात किंवा आपली एखादी इच्छा पूर्ण न करण्यात, किंवा ती मर्यादित स्वरूपात पूर्ण करण्यात, आपल्याच अंतिम भलाईचा विचार त्यांच्या मनात असणार. म्हणूनच आपण जास्त मिळालं म्हणून अती आनंदी होता कामा नये आणि कमी मिळालं म्हणून निराश होता कामा नये. 

त्यातसुद्धा आपलीच कर्मरुप फलाची, वृत्तीची, अहं ची परीक्षा असेल आणि न मिळाल्यास आपल्या चिकाटी आणि धीर यांची परीक्षा घेतली जात आहे, हे ध्यानात घ्यावे. कारण आपली अध्यात्मिक व पारमार्थिक प्रगती, ही त्यांच्या दृष्टिक्षेपात असते आणि त्यांना त्यात जास्त रुची असते. म्हणूनच आपण एखादे मागणे जरूर मागावे. पण ते मागताना ते न मिळाल्यास, मी निराश व दुःखी होणार नाही, याचसुधा वचन सद्गुरूंना देऊन ठेवावे. म्हणजे योग्य ते घडवून आणण्यात, त्यांना संकोच वाटणार नाही किंवा अवघड जाणार नाही. 

खरतर विषयाचा व्यास मोठा आहे आणि अजूनही लिहिण्या सारखे आहे म्हणूनच हाच विषय उद्याच्या भागात चिंतनाला घेऊया. 

क्रमशः
श्रीकृष्णार्पणमस्तू!! 
©® संकल्पना, विचार व लेखन : प्रसन्न आठवले
०७/०५/२०२३
9049353809 व्हॉट्सॲप
9960762179

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...