अध्यात्म विराम १८०
सद्गुरू म्हणजे ईश्वराचं प्रतिरूप किंवा इंग्लिशमधे ज्याला reflection म्हणतात ते असतं. ईश्वर हा कृपेचा, दयेचा, करुणेचा महासागर असतो. म्हणूनच अनेक संत महंत, ऋषीमुनी यांनी त्या ईश्वराला करुणा सिंधू किंवा करूणार्णव म्हटलं आहे. पण हे फक्त म्हणण्यासाठी आहे की याचा काही दाखला आहे, असा प्रश्न पडू शकतो. याची दोन विरुद्ध टोकाची उदाहरणं देता येतील. एक म्हणजे प्रत्यक्ष आपल्या पत्नीला अशोकवनात, कैदेत ठेवणाऱ्या रावणालासुद्धा, ज्यांनी शेवटची संधी देतो, सीतेला परत पाठव, मी तुला क्षमा करतो, असा निरोप पाठवला, ते श्रीराम दयेचा महासागर होते म्हणून. दुर्बल किंवा भित्रे होते म्हणून नाही.
अन्यथा त्याचं अविजेय रावणाला नंतर, युद्धात सहजी मारून, विजय प्राप्त करते झाले नसते. म्हणजेच आपण सर्वशक्तीमान ईश्वर आहोत आणि आपल्याकडे समस्त जगताचं बल, शक्ती, ऊर्जा, ज्ञान आहे, हे ज्ञात असूनही, त्याचा मद न होता,प्रत्येक जीवाला मनाप्रमाणे जगण्याचा नैतिक अधिकार आहे, हे धर्म तत्व सिध्द करण्यासाठी ईश्वराने आपल्या दयारुप सागराचा,करुणेच्या महा सागराचा आपला अवतार, जगताला दाखवला आहे. म्हणजे खलातील खल पुरुषाला सुद्धा आपल्या क्रोधाचा साक्षात्कार शक्यतो करावा लागू नये, या सद विचाराने प्रेरित राहून, ईश्वर नित्य आपल्या करुणा रूप अवतारात रत असतो.
जेणेकरून, प्रत्येक जीवाला आपल्या चूक, प्रमाद, अपराध यांच्या परिमार्जनासाठी शक्यतो, याचं जन्मी याच देहात, शेवटपर्यंत संधी प्राप्त होत रहावी. हे तत्त्व युगानुयुगांच्या अनुभवाने, अनुभूतीने व प्रचीतीने प्रत्ययास येतं. हे परिमार्जन करण्याचं तत्त्व अखंड, अविरत आणि अविश्रांत, या ब्रम्हांडात चल स्वरूपात अस्तित्वात आहे आणि राहील. हाच ईश्वराचा निर्गुण असूनही सगुण रुपात सिध्द असण्याचा दाखला आहे. दंड हा, या नियमाला अपवाद असेल आणि राहील, हेदेखील ईश्वराने सिद्ध करून ठेवलं आहे. वर म्हटल्याप्रमाणे याचं दुसरं उदाहरण हे शिशुपाल वधाचं देता येईल.
इथे मागील अवतारा प्रमाणेच, आपल्यावरील लांच्छना स्पद अपशब्द, शंभर अपराध होईपर्यंत धीराने सहन करण्याचं आपल वचन, पूर्ण प्रामाणिकपणे व नीतीने पाळलं आणि नंतर पाप भार मर्यादा उल्लंघन करताच, एका क्षणात तो देह नष्ट केला. म्हणजेच आपल्याकडे सर्व जगताची शक्ती व्याप्त असूनही, आपण निर्माण केलेल्या देहाला विनाकारण आणि पापांची, अपराधाची परमावधी होत नाही तोपर्यंत, शक्यतो संपवणार नाही, या आपल्याच ब्रीदाला पूर्णपणे जपण्याचं महत्तम तत्व सिद्ध करण्यासाठीच ईश्वराने करुणा रूप, दयेचा महा अर्णव अर्थात सागर हे, रूप सकारण धारण केलेलं आहे.
अवतार म्हणजे प्रत्यक्ष देहरुप होऊन, भूलोकात वा ब्रम्हांडात किंवा कोणत्याही लोकात अवतीर्ण होणे नव्हे. तर निर्गुण असूनही अनेक गुणात आपलं स्वरूप जगताला दाखवून, जगातील धर्मपालक आणि धर्ममार्गी जनांना, मार्गदर्शन करून त्यांना विश्वास देणं, हे ईश्वरी कार्यच आहे. त्याला अनुसरून, दयेचा करुणेचा महासागर, क्रोधाग्नीचा जगत पालनार्थ धारण केलेल्या रौद्र रूपाचा, तांडवाचा अवतार, निर्माता, पालनकर्ता, व विनाशकर्ता हे तीन मुख्य रुपातील अगणित गुण, ईश्वराने, वेळोवेळी जगतास दाखवून दिलेलं आहे. निर्गुण ईश्वराच्या या सगुण प्रकटनात विश्वाचा प्राण व आत्मा वसलेला आहे.
कारण त्रैलोक्यातील सर्व गुण, ज्याच्या ठायी व्याप्त आहेत, जो त्या सर्व गुणांचा समुच्चय, संचय व निधी आहे, तो निर्गुणाचं आपलं मुलस्वरुप धारण करूनही, त्याचवेळी सगुणात सुद्धा प्रकट राहतो, ही धारणा विश्वात दृढ व्हावी आणि आपल्या या विश्वरुप पसाऱ्यात, सज्जनांना आपला विश्वास व दुर्जनांना आपला धाक सतत रहावा, हे दोन्ही उद्देश करुणारूप आणि रौद्र रूप या दोन्ही टोकातील गुणातून, ईश्वर दाखवून देतो.
या विषयाला उद्याच्या भागात पुढे घेऊन, हे चिंतन असच सुरू ठेवूया.
क्रमशः
श्रीकृष्णार्पणमस्तू!!
©® संकल्पना, विचार व लेखन : प्रसन्न आठवले
१०/०५/२०२३
9049353809 व्हॉट्सॲप
9960762179
Comments
Post a Comment