ll गणेश स्तवन ll
गजानना तव रुप मनोहर
पाहुनी मन भुलले
तुझ्या स्तुतीचे गायन करता
पुराण वेद थकले
किती करावी तुझी आरती
शारदेस प्रश्न हा
तबक पुजेचे घेऊन गाती
गंधर्व स्तुतीगीता
शब्द्ब्रम्ह अन कलास्त्रोतही
तुला न वर्णु शकले
तुझ्या स्तुतीचे गायन करता
पुराण वेद थकले
तव रुपाला पाहुन लोचन
असे थक्क होती
सहस्त्र सुर्याचीच प्रभा तव
दशोदिशा उजळती
तव स्मरणाने प्राचीवरती
अरुणकमळ फुलले
तुझ्या स्तुतीचे गायन करता
पुराण वेद थकले
अग्निरुप तु तरिहि चंदन
भक्तांना रक्षीसी
किर्ती तुझी अशी अलौकीक
असुरगण कापती
भक्तरक्षणा देवा तू रे
कितीक असुर वधले
तुझ्या स्तुतीचे गायन करता
पुराण वेद थकले
प्रसन्न व्हावे भक्तालागी
चिंतामणी मोरया
शब्ध पुरविसी तूच ईश्वरा
काव्य पूर्ण करण्या
आठवलेल्या शब्दांनी मी
काव्यसुमन वाहिले
तुझ्या स्तुतीचे गायन करता
पुराण वेद थकले
कवी ः प्रसन्न आठवले
०६/०७/२०२०
१०ः३८
Comments
Post a Comment