Skip to main content

#श्रीकृष्णनीती #भाग४२

#राजकारण आणि श्रीकृष्णनीती #भाग४२

श्री गणेशाय नमः !!! श्रीगुरुवे नमः !!!

डॉ राजेंद्रप्रसाद यांच्या राष्ट्रपती होण्याच्या मागचं राजकारण आणि त्यातील नेहरूंचा सहभाग आणि डॉ राष्ट्रपती होऊ नयेत म्हणून नेहरूंनी केलेलं राजकारण आपण गेल्या भागात बघितलं. यात नेहरूंचा हेतू हा सरळ सरळ आपल्या विरोधातील व्यक्ती या पदावर आल्यास आपल्याला राज्य करण्यास आणि कायदे करण्यास अडचणी येणार हे उघड उघड होतं . याच कारणासाठी त्यांनी १९५० चे हंगामी राष्ट्रपती, १९५२ आणि १९५७चे लोकनियुक्त प्रतिनिधींमार्फत निवडले गेलेले राष्ट्रपती अश्या तीनही वेळा, डॉ राजेंद्रप्रसाद यांना उमेदवारीच मिळू नये यासाठी जंग जंग पछाडलं. अर्थात त्यावेळी काँग्रेसमध्ये होयबा लोकं नव्हती. मुळात त्याकाळी कार्यकारिणीत आणि प्रदेश कमिटीत असलेली सर्व मंडळी नेहरूंच्या खांद्याला खांदा लावून स्वातंत्र्य लढ्यात लढलेली असल्यामुळे. नेहरूंच्या ताटाखालील मांजर नव्हते. त्या प्रथेची सुरवात नेहरूंनी या निवडणुकीतील अनुभवानंतर केली असावी आणि आपल्याच मर्जीतील आणि आपल्या म्हणण्याला दुजोरा देणारी माणसं नेमून आपलीच पोळी भाजली जाईल आणि आपलंच नियंत्रण राहील  याची व्यवस्था केली. ज्याचा कित्ता नंतरच्या सर्व नेहरू घराण्याच्या वारसांनी 
गिरवला आणि काँग्रेस पक्ष जो एकेकाळी निस्पृह माणसांचा आणि जनसामान्यांचा पक्ष होता त्याला आपली जहागिरी केलं. असो. 

सरदार पटेलांनी १९४७ मध्ये भारतीय सांस्कृतिक स्मारक उभारणीच्या कार्याला सोमनाथ मंदिर जीर्णोद्धार या प्रकल्पापासून सुरवात केली. पण ते कार्य त्यांच्या निधनापश्चात फक्त सोमनाथ पुरतं मर्यादित राहिलं. अन्यथा कशी मथुरा हे प्रश्न त्याचवेळी धसास लागले असते. मुळात जुनागड संस्थान भारतात सामील करून घेतल्यानंतर त्याची पाहणी करण्यासाठी आलेल्या पटेलांनी १२ नोव्हेंबर, १९४७ ला सोमनाथसह संपूर्ण जुनागडचा दौरा करून, भेट दिली. परंतु  सोमनाथ मंदिराची स्थिती पाहून खंत व्यक्त केली आणि तिथल्यातिथे मंदिराच्या पुनर्बांधणीला आणि जीर्णोद्धाराला परवानगी देऊन तसा  आराखडा सादर करण्याचा आदेश कन्हैयालाल माणेकलाल मुन्शी (जे नेहरूंच्या पहिल्या हंगामी सरकारमध्ये खाद्य व पुरवठा मंत्री होते) त्यांना हे काम त्वरित हाती घेण्याची आज्ञा केली. 

गांधींचा या प्रस्तावाला तत्वतः पाठिंबा होता (त्यावेळी गांधी हयात होते). फक्त त्यांच्या  म्हणण्यानुसार ह्याचा खर्च सरकारने न करता लोकसहभागातून व्हावा. पण अश्या अधिग्रहित वस्तूंच्या जीर्णोद्धाराला त्यांचा तत्वतः पाठिंबा होता, हे मुद्दाम नमूद करावेसे वाटते. ऑक्टोबर १९५० ला सुरवात झालेलं  हे  काम  पटेलांच्या निधनापश्चात कन्हैयालाल मुन्शीनी तितक्याच आत्मीयतेने पूर्ण केलं. वास्तविक या जीर्णोद्धारालासुद्धा नेहरूंचा विरोधच होता. त्यांच्या अंदाजानुसार पटेलांच्या निधनानंतर हे कार्य पूर्ण होणार नाही. परंतु मुन्शीनी हे कार्य निहित  वेळेत पूर्णच केलं नाही, तर आजचं  मंदिर जे उभं आहे त्याचा आराखडा तयार करवून सर्व बांधकाम सुयोग्यरित्या पूर्ण करून घेतलं. त्यामुळे याचं श्रेय पटेलांइतकंच कन्हैयालाल मुन्शीना देखील द्यावं लागेल.  

१९५१मध्ये या जीर्णोद्धार पूर्ण झालेल्या मंदिरातील शिवलिंगाच्या प्राणप्रतिष्ठेला  राष्ट्रपती डॉ राजेंद्रप्रसाद यांना, मुन्शी यांनी आमंत्रण दिल. जे त्यांनाही तत्वतः स्वीकारलं. त्यांच्या भेटीसाठी सर्व यंत्रणा कामाला लागली. मुळात ९ मार्च,  १९५१ या महाशिवरात्रीच्या दिवशी स्वतः सरदार वल्लभभाई पटेल या मंदिराची प्राणप्रतिष्ठा करणार होते. पण डिसेंबर १९५० ला त्यांच्या दुःखद निधनामुळे हि तिथी एप्रिल ७, ला गुढीपाडवा या दिवशी ठरवण्यात आली. परंतु काही अन्य कारणांमुळे हि तिथी ११ मे, १९५१ वैशाख शुद्ध पंचमी या दिवशी ठरवून पार पाडण्यात आली. ११ मे या दिवशी सकाळी ९:४७ च्या शुभमुहूर्तावर राष्ट्रपती डॉ राजेंद्रप्रसाद यांच्या हस्ते शिवलिंगाची प्राणप्रतिष्ठा करण्याचं ठरवण्यात  आलं. खरतर २ टन वजनाचं  काळ्या पाषाणातील शिवलिंग ९:४७ या सुमुहूर्ताच्या एका मिनिटात स्थापित करणं हे तांत्रिकदृष्टया अशक्य होतं. कारण हा मुहूर्त ३०० वर्षानंतरचा अत्युत्तम मुहूर्त ज्योतिर्विदांनी घोषित केला होता. त्यामुळे एवढं मोठं लिंग उचलून स्थापित करणं हे जिकीरचं आणि कालापव्यय करणारं  काम होत. म्हणून लिंग ठेवण्यासाठी बांधण्यात आलेली जागा आणि लिंग यामध्ये एक सोन्याची शलाका ठेवण्यात आली आणि ९:४७ ला डॉ राजेंद्रप्रसाद यांनी हि शलाका ओढून लिंग स्थापित केलं. श्री केवलानंद सरस्वती यांच्या नेतृत्वाखालील सुमारे १६२ ब्रह्मवृंदांनी मंत्रोच्चारात हि प्राणप्रतिष्ठा पार पाडली. शिवलिंग प्रतिष्ठापनेला सुमारे १०१ तोफांची सलामी पण देण्यात आली.  

मुळात या मंदिराच्या जीर्णोद्धाराला असलेला आपला विरोध लपवू न शकलेले नेहरू, या सोहळ्याला डॉ राजेंद्रप्रसादांनी जावं यांच्या विरुद्ध होते. त्यांनी राष्ट्रपतींना तसं बोलून परावृत्त करण्याचा निष्फळ प्रयत्नही  करून पहिला. परंतु डॉ राजेंद्रप्रसादांनी त्याला न जुमानता जाण्याचा निर्णय घेतला आणि तो अमलात आणला.  अर्थातच राष्ट्रपतींचं या सोहळ्याला जाणं  नेहरूंच्या मर्जीविरुद्ध असल्यामुळे, ऑल इंडिया रेडिओ (AIR) ने या सोहळ्यातील राष्ट्रपतींच्या भाषणाचं प्रक्षेपण केलं नाही. मुळात राष्ट्रपतींनी नेहरूंचा सल्ला धुडकावताना त्यांना स्पष्ट शब्दात समज दिली, कि मी हिंदू आहे आणि हि गोष्ट लपवलेली नाही. तरीही मी इतर धर्मांचा देखील आदर करतो आणि गुरुद्वारा, मस्जिद आणि चर्चमध्ये देखील आमंत्रण आल्यास जाईन. त्याचमुळे मी या कार्यक्रमास ठरल्याप्रमाणे जाणार. 

अशी जिद्द आणि धमक दाखवणारी व्यक्तित्व होती तोपर्यंत नेहरूंना आपलं पूर्ण नियंत्रण मिळवता आलं. नाही. परंतु साधारण १९५५ पर्यंत यातील काही जहाल व्यक्तित्व पडद्याआड गेली आणि बाकीची हळू हळू नेहरूंच्या विस्तारवादी राजकारणाला कंटाळून काँग्रेसबाहेर पडली आणि स्वतंत्र झाली वा राजकारणाबाहेर गेली.  म्हणूनच नेहरू घराण्याचं वर्चस्व प्रस्थापित झाल, जे नेहरूंचं स्वप्न होतं. 

पुढील भागात VK कृष्ण मेनन यांच्याविषयी जाणून घेऊ. 

श्रीकृष्णाय नमोनमः !!! हरये नमः !!! योगेश्वराय नमः !!!!

सद्गुरु चरण शिरसावंद्य !!!

क्रमशः

©® संकल्पना व लेखन :  प्रसन्न आठवले

भाग बेचाळीसावा समाप्त

ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ
श्री श्री श्री श्री श्री श्री श्री श्री श्री श्री श्री

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...