नवरात्रातील सहावी माळ श्रीकात्यायनी देवी
चन्द्रहासोज्ज्वलकरा शार्दूलवरवाहन।
कात्यायनी शुभं दद्याद्देवी दानवघातिनी ॥
देवी पार्वतीचचं दुसरं नाव कात्यायनी आहे. उमा, कात्यायनी, गौरी, काली, हेमावती आणि ईश्वरी या व अश्या अनेक नामांनी देवीला संबोधलं जातं. यजुर्वेदातील तैतरीय आरण्यक , स्कंद पुराण, पाणिनी वर पातांजली ऋषींनी लिहिलेल्या महाभाष्यात अश्या अनेक ठिकाणी देवी कात्यायनीचा उल्लेख व वर्णन सापडतं. स्कंद पुराणानुसार परमेश्वराच्या नैसर्गिक क्रोधातून देवी कात्यायनी उत्पन्न झाली. माता पार्वतीकडून मिळालेल्या सिंहावर आरूढ होऊन देवीने महिषासुराचा वध केला.
शक्तीचं आदीरुप प्रतीक असल्यामुळे देवीला शक्ती, दुर्गा, भद्रकाली व चण्डिका या नावाने देखील ओळखले जाते. प्रतिपदेपासूनच्या विविध रूपातील उपासनेचा कुंडलिनी चक्राशी संबंध येतो. त्यानुसार षष्ठीला साधकाचं मन आज्ञाचक्रात स्थित असतं. योगसाधनेत आज्ञाचक्राचं विशेष महत्व आहे. आज्ञाचक्रात मन स्थिर झालेला साधक देवीच्या चरणी आपलं सर्वस्व अर्पण करतो. परिपूर्ण आत्मदान करणाऱ्या या साधकाला आई सहजभावात दर्शन देते.
एका कथेनुसार कत नावाचे एक ऋषी होऊन गेले. त्यांचा पुत्र कात्य. या कात्य ऋषींना पुत्र झाला ज्याचं नाव कात्यायन. या कात्यायन ऋषींनी देवी परांबाचं उग्र तप केलं. ज्या योगे देवीने प्रसन्न होऊन इच्छित वर मागण्यास सांगताच, कात्यायन ऋषींनी भगवतीला पुत्रिरूपात जन्म घेऊन उपकृत करण्याची इच्छा प्रकट केली. देवीने अर्थातच तिचा स्वीकार केला. यथावकाश जेंव्हा मातलेल्या महिषासुराला संपवण्याची वेळ निकट आली, तेंव्हा अश्विन शुद्ध षष्ठीला कात्यायन ऋषींच्या घरी जन्म घेऊन सप्तमी , अष्टमी व नवमीला कात्यायन ऋषींकडून पूजा स्वीकारून दशमीला महिषासुराचा वध केला.
देवी चतुर्भुजा असून वरचा उजवा हात अभयमुद्रेत असून उजवा खालचा हात वरमुद्रेत आहे. डाव्या बाजूच्या वरच्या हातात कमलपुष्प असून खालच्या हातात खड्ग आहे. देवीच्या उपासनेने भक्त धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे चारही पुरुषार्थ प्राप्त करून अलौकिक तेज आणि प्रभावयुक्त होतो. देवीच्या अलौकिक सामर्थ्याची कल्पना आलेला साधक तिची मनोभावे भक्ती करताना म्हणतो.
आज्ञाचक्री मन लागू दे एकाग्रता नित्य येऊ दे
महिषासुर हा शट्रिपुंचा तव कृपेने त्वरे जळू दे
तव तेजाची कीर्ती गाई मन
तव भक्तीची आस धरी मन
आई कात्यायनी माझे सर्वस्व समर्पित तुजला
आई कात्यायनी माझी भक्ती अर्पितो तुजला
जगा गांजले असुर दानवी
असमर्थ लढण्या बाहू मानवी
तव भक्तीची आस धरुनी
सिद्धीदायी तव नाम ऐकुनी
आई कात्यायनी आलो दारी, चरणी शीश नमिले
आई कात्यायनी वाहतो भक्तीची तुज मी फुले
उमा पार्वती तूच ईश्वरी
विविध नामे तूच गौरी
घटाघटाचे सामर्थ्य आई तूच असशी
दिव्य प्रकाश ब्रम्हतेज तूच असशी
आई कात्यायनी रमुदे मन भक्तीमध्ये तुझिया
आई कात्यायनी अर्पण आत्मा चरणी तुझिया
आईच्या भक्तिरसात न्हाऊन निघालेला आत्मा एकाग्र होऊन आईच्या सेवेसाठी आतुर होऊन जातो. कात्यायनी देवीच्या अद्भुत रुपात सर्वस्व विसरून निजानंदात हरवून जाऊया.
©® लेखन व काव्य : प्रसन्न चिंतामणी आठवले
०४/१०/२०१९
माळ सहावी अर्पण !!! 🚩🚩🚩🌷🌷🌷
Comments
Post a Comment