नवरात्रातील नववी माळ देवी श्रीसिद्धीदात्री
सिद्धगन्धर्वयक्षाद्यैरसुरैरमरैरपि |
सेव्यमाना सदा भूयात् सिद्धिदा सिद्धिदायिनी ||
ही देवी नावाप्रमाणेच अनेक प्रकारच्या सिद्धी आपल्या साधकांना प्राप्त करून देते. देवीच्या या स्वरूपाला सिद्धीदात्री म्हणून ओळखलं जातं. नवव्या दिवशी एकचित्ताने साधना करणाऱ्या साधकांना देवी सर्व प्रकारच्या सिद्धी प्रदान करते, नव्हे साधकांच्या साधनेने प्रसन्न झालेली देवी दुर्गा सिद्धीदात्री या स्वरूपात भक्तवत्सल होते.
मार्कंडेय पुराणानुसार अणिमा, महिमा, गरिमा, लघिमा, प्राप्ति, प्राकाम्य, ईशित्व और वशित्व या आठ प्रकारच्या सिद्धी आहेत. काही शास्त्रात ही संख्या अठरा सांगितली जाते. या सर्व सिद्धी साधकांना प्रदान करण्यात देवी सक्षम आहे. भगवान शंकरांनी या देवीच्या कृपेनेच सिद्धी प्राप्त केल्या होत्या. देवी सिद्धीदात्रीच्या अनुकंपेने भगवान शिवांचं अर्ध शरीर स्त्रीचं झालं, ज्यामुळे त्यांना अर्धनारीनटेश्वर या नावाने ओळखलं जायला लागलं.
देवीचं वाहन सिंह असून ती चतुर्भुजा आहे. उजव्या बाजूच्या हातात गदा व सुदर्शनचक्र असून डावीकडील हातात शंख व पद्म आहे. देवी कमलासनावर विराजमान आहे. देवीच्या आठ रूपातील आठ दिवसांच्या पूजनाने योग्य मार्गावर असलेला साधक नवव्या दिवशी आई सिद्धीदात्रीच्या पूजनात व अर्चनेत सर्व सिद्धी प्राप्त करतो. या इहलोकी परम सुखाची प्राप्ती करून झाली की अंती साधक मोक्षपदाला निर्गमन करतो.
अश्या सहज साध्य सिद्धीदायी देवी सिद्धीदात्रीला शरण जाऊन तिच्या कृपेची कामना करूया आणि ह्या नऊ दिवसांच्या सेवेचे फल प्राप्त करण्यास समर्थ होऊया.
शरण आलो तुझिया चरणी
देवी सिद्धीदात्री तव भजनी
करुनि वंदन कर जोडूनी
पाहू निरंतर तुज या नयनी
तूच शक्ती अगम्य जगताची
वाही भार कृपा तव साची
भक्तवत्सल या तव ब्रीदाची
राखसी माते लाज तुची
बालक आम्ही करतो नित्य
चुका निरंतर हे नसे मिथ्य
तूच ईश्वरी आधार हे सत्य
भाव तव चरणी हे न असत्य
तूच देसी स्वये सदाशिवाला
सिद्धी अनेक साक्षी पुरणाला
सिद्धी निधी न लगे आम्हाला
तुझी कृपा राहो स्वीकारी सेवेला
नऊ दिवसांचे केले व्रत मी
वाहिली काव्य सुमने चरणी
पूजा ही माझी सार्थ मानूनी
कृपा तव राहो नित्य भक्तावरी
©® लेखन व काव्य : प्रसन्न चिंतामणी आठवले
०७/१०/२०१९
माळ नववी अर्पण !!! 🚩🚩🚩🌷🌷🌷
Comments
Post a Comment