Skip to main content

तंत्रोक्त देवीसूक्तात दिलेलं शक्तीचं अधिष्ठान १

तंत्रोक्त देवीसूक्तात दिलेलं शक्तीचं अधिष्ठान कुठे कसं कसं वसलं आहे याचं माझ्या आकलनाप्रमाणे केलेलं विश्लेषण आणि विवेचन. ( तंत्रोक्त देवीसूक्त कॉमेंटमध्ये दिलं आहे)

१) महाविष्णूंनी एका शब्दाच्या हुंकारातून माया निर्माण केली. जी या जगात ऐहिक व भौतिक रुपात संचालन करते. सर्व भुतेषु म्हणजे सर्व भुतांच्या (म्हणजेच पंचमहा भूते) सर्वांच्या ठायी असा अर्थ अभिप्रेत असावा.

२) चेतनारूपात तीच शक्ती सर्व प्राणिमात्रांच्या देही आणि देहाबाहेर समस्त ब्रह्मांडात वसलेली आहे. जरी समस्त ब्रह्मांडात हे चैतन्य भरलेलं असलं तरीही जेंव्हा हे चैतन्य पंचमहाभूतरुपी देहात प्रकट होतं तेंव्हाच ते आपलं इच्छित कार्य पूर्ण करू शकतं.

३) देहातसुद्धा बुद्धिरूपात प्राणिमात्रात भरून आहे ती शक्ती देवी तूच आहेस. बुद्धी जी मानवाला इतर प्राणिमात्रांपासून वेगळं असल्याचं दर्शवते. जीचा उपयोग खरतर मानवाने आत्मोन्नत्ती साठी करावा अशी अपेक्षा विधात्याची देखील असणार.

४)  देहाच्या वृद्धीसाठी चलनवलनासाठी आवश्यक निद्रारूपात आणि अंती जन्मजन्मांतरीची शृंखला चालू राहण्यासाठी  चिरनिद्रारूपात तूच  आहेस देवी.

५) देहाच्या अनेक अवस्था या चयापचय क्रियेवर अवलंबित आहेत. त्यासाठी आवश्यक ऊर्जा अन्नसेवनातून मिळते. अश्या या अन्नाच्या वासनेसाठी आवश्यक क्षुधा अर्थात भूक ही देखील एक शक्तीच आहे आणि त्याही रुपात तूच आहेस देवी. त्याही पलीकडे काही मिळवण्याची आस वा तळमळ, काही साध्य करण्यासाठी केलेली वा करावीशी वाटणारी धडपड हीदेखील भूकच व यातसुद्धा देवी तुझाच वास आहे.

६) समस्त ब्रम्हान्ड हे परमेश्वराची छाया अर्थात सावली आहे. म्हणून पूर्ण ब्रह्मांड व्यापून उरलेला तोच आहे. परंतु त्या छायेच्या रुपात देखील तूच आहेस देवी.

७) सर्व भुतांच्या अर्थात पंचमहाभूतांच्या ठायी वसलेली शक्ती ऊर्जा प्रेरणा यांचा स्रोत, यांचं बीज तूच आहेस.

८) तृष्णा म्हणजे  तहान आणि पाणी म्हणजे जीवन. शरीरा बरोबरच मनाची व  जीवनातील तृष्णा ही प्राण्यांना जीवनाच्या जीवनापर्यंत अर्थात साध्यापर्यंत जाण्याची प्रेरणा देते वा इच्छा निर्माण करते. ती तृष्णा तूच आहेस. अर्थात कोणती क्षुधा व तृष्णा ही जीवनावश्यक वा जगण्यास अनिवार्य आहे आणि कोणती अनावश्यक वा षड्रिपूना तारणारी आहे हे प्राण्याने आपल्या बुद्धीने ठरवावे. इथे पुन्हा नमूद करावेसे वाटते की ती बुद्धीही तूच आहेस.

९) अनेक रुपात वसणारी ही शक्ती क्षमाशीलता या सद्गुणांत वास करून भरलेली आहे , हे देवी ती तूच आहेस. क्षमाशील असणं हा धर्मतत्वाचा महत्वाचा भाग आहे. धैर्यवान व शौर्यवान व्यक्तीचा क्षमाशील असणं हा एक गुण समजला जातो. किंबहुना ज्याला आपली शक्ती ज्ञात आहे तोच, कमी ताकदवान व्यक्तीला क्षमा करणं योग्य समजतो.

१०) . हे देवी तू त्या स्वभावरूपात स्थित आहेस. त्या शक्तीरूपात तूच आहेस हे देवी. प्रत्येक व्यक्तीला एक विशिष्ट स्वभाव विशेष असतो. तो त्या मनुष्याचा स्थायीभाव असतो. तो मनुष्य त्या त्या स्वभावानुसार प्रत्येक क्षणी घटित होणाऱ्या घटनांकडे पाहतो आणि त्यावर आपली प्रतिक्रिया देखील नोंदवतो

११) लज्जा या रुपात देवी तूच मानवी देहात, मनात व्याप्त आहेस. लज्जा म्हणजे फक्त स्त्रियांचा दागिना या एका मर्यादित अर्थाने न पाहता लज्जा म्हणजे माणसाचा समाजात वावरताना वागायचा एक मोठा सद्गुण आहे. एखादा मनुष्य चारचौघात कसलीही भीडभाड न ठेवता वागतो, कोणाचाही कसाही अपमान करतो. अश्या वेळी हा लज्जा शब्द व्यापक अर्थाने माणसाचा दागिनाच आहे. तो दागिना तूच आहेस देवी.

क्रमशः
भाग १ समाप्त
©® संकल्पना व लेखन : प्रसंन्न चिंतामणी आठवले
०९/१०/२०१९
9049353809

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...