नवरात्रातील आठवी माळ महागौरी
श्वेते वृषे समारुढा श्वेताम्बरधरा शुचिः |
महागौरी शुभं दद्यान्महादेवप्रमोददा ll
नवरात्राच्या आठव्या दिवशी देवीच्या महागौरी या रूपाची पूजा केली जाते. देवी महागौरीची शक्ती अमोघ आणि शीघ्र फलदायी आहे. महागौरीची आराधना केली असता भक्तांचे सर्व किल्मिष धुतले जाऊन भक्त पापरहित होतात. इतकंच नव्हे तर भविष्यात पाप, ताप, दुःख दैन्य भक्तांच्या जवळ पास सुद्धा फिरकत नाही.
देवीचा वर्ण पूर्णतः गोरा आहे. या गोरेपणाची तुलना शंख , चंद्र आणि जुईच्या फुलांच्या गोरेपणाशी केली आहे. इतकंच नव्हे तर देवीची वस्त्रे व अलंकार आभूषणे हे देखील गौर आहे. देवीचं वय आठ वर्षे मानलं जातं म्हणून देवीला अष्टवर्षा गौरी असंही म्हटलं जातं. देवीला चार हस्त असून वाहन वृषभ आहे. उजव्या बाजूचा खालचा हात अभय मुद्रेत व वरचा हात त्रिशूळधारी आहे. डावीकडील खालच्या हातात डमरू व वरचा हात वर मुद्रेत आहे. चेहऱ्यावर शांत भाव आहेत.
एकदा भगवान भोलेनाथांच्या काही बोलण्यावर रुष्ट झालेल्या माता पार्वती अरण्यात तपश्चर्येसाठी निघून जातात. अनेक वर्षे झाली तरी पार्वती आली नाही हे पाहून भगवंत स्वतः शोध घेण्यास निघतात. त्यांना देवी एका अरण्यात तप करताना दिसतात. त्यांना हेदेखील दिसत की, पार्वतीच्या संपूर्ण शरीरावर तेजामुळे एक झळाळी आली आहे. देवीची छटा चंद्रासमान श्वेत आणि जुईच्या फुलासमान धवल झाली आहे. तिच्या तपाच्या तेजाने वस्त्रालंकारांवर देखील तीच प्रभा होती. म्हणून भगवान शंकरांनी देवीला गौरवर्ण होण्याचा वर दिला.
दुसऱ्या एका कथेनुसार शिवशंकरांना मिळवण्यासाठी उमेने जे घोर तप केले त्यावेळी तपपूर्तीपर्यंत तिचा वर्ण व कांती काळ्या रंगाने व्याप्त झाली. भगवान शंकरांनी प्रसन्न झाल्यावर देवीला गंगाभिषेक घातला ज्या योगे देवीचा वर्ण , कांती सतेज व शुभ्र झाली म्हणून तिला गौरी हे नाव प्राप्त झाले. महागौरी या रुपात देवी अत्यंत शांत, मृदुल, करूणामयी आणि स्नेहमयी आहे. देवीच्या या स्वरूपाला पाहूनच प्रार्थना करताना ऋषीगणांनी स्तुतीपर मंत्र म्हटला "सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते." महागौरीच्या अर्चना पूजन व आराधनेने अनेक असाध्य सिद्धी भक्तांना लीलया प्राप्त होतात. अलौकिक सामर्थ्य आणि तेज यांची प्राप्ती होते. देवीच्या नित्य भक्तीने सत् वृत्ती वृद्धिंगत होते आणि असत् वृत्तीचा विनाश होतो.
आपण सर्व मिळून देवीच्या या स्वरूपाची प्रार्थना करून नित्य कृपेची अर्चना करूया.
शिवशंकर अर्धांगी तू
मिळवलेस तपसाधनेने
शिव होऊनी प्रसंन्न केले
गौर वर्णी अभिषेकाने
ऐसी तव महती विशेष
इच्छित ते ते देसी खास
मायेच्या तू आहेस पार
प्राप्त सहजी निजभक्तास
आई कृपेचा तू सागर
आजण दिन यां आधार
तव भक्ती करती त्यांवर
अखंड कृपा हो अपार
हे महागौरी तूच उमा
तूच तपाने प्राप्त शिवा
जाणलेस या जगता तूच
चतुर्भुजा दूर करी भवा
आई तूच सकळ माया
मोह, क्रोध, लोभ, मदा
निवारी वा नियंत्री सदा
तव भक्तीत भक्त आनंदा
आई वर्णू न शके तव कीर्ती
अमोघ शस्त्रांची तुज प्राप्ती
भवताप हरे पाहता तव मूर्ती
तव तेजे जगी सुखे विहरती
आई होसी भक्तांना प्रसन्न
तव कृपेचा होउदे चिंतामणी
प्रार्थनेस कवनी जे आठवले
वाहिले स्तुतीपर तव चरणी
©® लेखन व काव्य : प्रसन्न चिंतामणी आठवले
०६/१०/२०१९
माळ आठवी अर्पण !!! 🚩🚩🚩🌷🌷🌷
Comments
Post a Comment