नवरात्रातील सातवी माळ देवी कालरात्री
एकवेणी जपाकर्णपूरा नग्ना खरास्थिता |
लम्बोष्ठी कर्णिकाकर्णी तैलाभ्यक्तशरीरिणी || वामपादोल्लसल्लोहलताकण्टकभूषणा |
वर्धन्मूर्धध्वजा कृष्णा कालरात्रिर्भयन्करि ||
दुर्गेच्या सातव्या दिवशीच्या रुपाला कालरात्री म्हणून संबोधलं जातं. देवी कालरात्रीला काली, महाकाली, भद्रकाली, भैरवी, म्रुत्यु, रुद्रानी चामुंडा, चंडी आणि दुर्गा या विनाशकारी रूपातील एक मानलं जातं. रौद्री आणि धुमोरना देवी हीदेखील देवीची अप्रसिद्ध नामाभिधानं आहेत. काही काही ठिकाणी काली आणि कालरात्री या भिन्न देवी मानल्या जातात. अन्यथा काली आणि कालरात्री ही एकाच रूपाची दोन नावं आहेत.
देवीच्या या रूपाने भूत , प्रेत , पिशाच्च यांसह समस्त नकारात्मक ऊर्जा व शक्ती पलायन करतात, इतका देवीच्या या रूपाचा विशेष प्रभाव आहे. उपासनेच्या सातव्या दिवशी साधकाचं मन सहस्त्रार चक्रात स्थित असतं. देवी कालरात्रीच्या या दिव्य स्वरूपात साधक एकाग्र होऊन जातो. या चक्रात पोहोचल्यानंतर साधकासाठी सिद्धी आणि निधींची समस्त द्वारं ही उघडली जातात अशी मान्यता आहे. अर्थात नित्य योगयाग , साधना व कुंडलिनी जागृतीचा साधक असलेल्या साधकांसाठीच, ध्यानात असुद्या.
देवीच्या या रुपात देवीचा रंग अंधारासमान काळा आहे. केस पसरलेले आहेत, विस्फारलेले पण आग ओकणारे नेत्र नकारात्मक शक्तींसाठी विनाशकारी आहेत. गळ्यात विजेसमान चमकणारी रुंडमाळा आहे. नासिकेतून होणाऱ्या श्वास उच्छश्वासातून भयंकर ज्वाला निघत आहेत. या भयावह वा भयकारी रूपाची शक्ती साधकांना आणि भक्तांना मात्र अत्यंत लाभकारक आहे. देवीच्या भक्तांसाठी शुभकारक आहे. म्हणूनच देवीचं अजून एक नाव हे शुभंकारी सुद्धा आहे.
देवीच्या स्मरणमात्रेने भूत पिशाच्च दैत्य दानव आदी समस्त शक्ती भयभीत होऊन पलायन करतात. देवीच्या नित्य साधनेने ग्राहबाधा देखील दूर होते. देवीची भक्ती करणाऱ्या साधकांना अग्निभय, जलभय, जंतूभय, शत्रूभय आदी कोणतेही भय रहात नाही. देवीच्या कृपेने साधक सर्वथा भयमुक्त होतो. परंतु देवीच्या या स्वरूपाची साधना करणाऱ्या साधक व भक्तांना यम , नियम व संयम यांचं पूर्णतः पालन करावं लागतं. मन काया आणि वाचा यांचं पावित्र्य कठोरतेने राखावं लागतं.
या देवीच्या रुपाचं स्मरण करून तिला सर्व नकारात्मक ऊर्जा आपल्या आयुष्यातून दूर करण्यासाठी प्रार्थना करूया.
भूत प्रेत दानव निशाचर भयभीत
थर थर कापती असुर तव अंकित
विघ्नांच्या नाशास्तव अवतारा आली
जय जय जय बोला जय महाकाली
अंधकारासम वर्ण तव
केस जटा पसरून भव
अग्नी प्रज्वले सर्वांगी तव
दुष्ट शक्ती भयभीती पाहता भद्रकाली
जय जय जय बोला जय महाकाली
भुभूतकार चित्कार ध्वनी
करण्या विनाश असुर मनी
जाळुनीया टाका नकारध्वनी
संकटावर स्मरणाने घाव जी घाली
जय जय जय बोला जय महाकाली
चेतना ऊर्जा शुभंकारी भक्ता
तव उपासना देई अभय भक्ता
कृपा करी वर देई आई तू भक्ता
प्रसन्न हो इप्सित दे सिद्धीदायी काली
जय जय जय बोला जय महाकाली
देवीच्या या सगुण रुपात भक्तप्रतिपालक हेच ब्रीद आदिशक्तीने जपलय. त्याचं नित्य स्मरण करू आणि तिची नित्य प्रार्थना आपल्याला संकटमुक्त ठेवील हे ध्यानात धरू.
©® लेखन व काव्य : प्रसन्न चिंतामणी आठवले
०५/१०/२०१९
माळ सातवी अर्पण !!! 🚩🚩🚩🌷🌷🌷
Comments
Post a Comment