Skip to main content

जानकी पुनःवनवास ९५ जुना

ll ॐ गंगणपतये ll

जानकी पुनःवनवास ९५ जुना

इतकं बोलून मातेला पुनःश्च नमस्कार करून लक्ष्मण नावेत बसला आणि नावाडयाला नदी पलीकडील तीरावर नेण्यास सांगितलं. पलीकडील तीरावर उतरून त्वरित रथात बसला. तरीही पुन्हा पुन्हा मागे वळून अत्यन्त दुःखद अंतःकरणाने,  हताश अवस्थेत बसलेल्या मातेकडे, जानकीकडे, बघत होता. माता जानकी अत्यन्त असहाय्य भासत होती. मातेच्या या दयनीय अवस्थेकडे बघून लक्ष्मणाला पुन्हा पुन्हा अश्रू आवारात नव्हते.

इकडे माता सतत रडल्या मुळे  अजून केविलवाणी दिसत होती. तिच्या या स्थितीकडे बघून काळालासुद्धा अश्रू आवरण कठीण झाल होत. मातेने बघितलं पलीकडल्या तीरावर लक्ष्मणाचा रथ हळू हळू दूर जात आहे. त्यामुळे माता अजून शोकाकुल झाली आणि त्या निर्जन रानात आपण एकटेच आहोत या जाणिवेने मातेला अजूनच रडू येऊ लागलं. अश्याच हताश अवस्थेत माता बराच वेळ तिथेच बसून अश्रूपात करत होती.

तिथेच जवळच काही मुनीकुमार खेळत होते. त्यांनी मातेला रडताना पाहिल आणि ते  सर्व धावत, महर्षी वाल्मिकी ऋषी बसले होते, त्याठिकाणी गेले आणि त्यांना सादर प्रणाम करून म्हणाले.

"प्रणाम महर्षी. आम्ही आताच पाहिलं कि एक तेजस्वी स्त्री इथून जवळच एका वृक्षाच्या छायेत रडत बसली आहे. त्या स्त्रीला या आधी कधीही पहिल्याच स्मरत नाही. पण ती स्त्री देवी लक्ष्मी समान भासत आहे. महर्षी आपण येऊन गंगेकिनारी त्या स्त्रीला पाहावं. ती स्त्री साक्षात स्वर्गातून उतरलेल्या एखाद्या देवीसमान भासत आहे. एकूण ती स्त्री शोक करण्या योग्य वाटत नाही.  पण तरीही ती शोकसागरात मग्न झालेली वाटते. ती असहाय्य्य वाटत असल्यामुळे, आपण येऊन त्या स्त्रीच रक्षण करावं असं आम्हाला सर्वांना वाटत."

महर्षींनी ध्यान लावून तपोबलाने सर्व हकीकत  जाणून घेतली आणि त्वरेने, माता जानकी अतीव दुःखाने रडत बसली होती, त्या स्थळी महर्षी पोहोचले. जलद गतीने हातात कमंडलू घेऊन गंगा किनारी मातेच्या समीप पोचल्यावर, महर्षिनी कमंडलूतून पाणी शिंपड़ून तपोबलाने,  मातेला उत्साहित केल आणि मधुर वाणीत म्हणाले

"तू राजा जनकाची कन्या, राजा दशरथाची स्नुषा आणि महाराज रामचंद्र यांची धर्मपत्नी सीता अर्थात जानकी आहेस. मी तुझ माझ्या या आश्रमात सहर्ष स्वागत करतो. ज्या क्षणी तू येथे येण्यासाठी पाठवण्यात आलीस, त्याच क्षणी योगबलाने तुझ्या त्यागाचा सर्व वृत्तांत मी तपोबलाने मनात जाणला होता. मला माहीत होत तू इथेच येणार. हे पतिव्रते तुझ्या सत्वशीलतेबद्दल आणि शुद्धाचरणाबद्दल मी पूर्ण ज्ञात आहे.

मला येथे बसल्या बसल्या विश्वातील सर्व गोष्टींचं आकलन होत असत. हे सीते मी माझ्या तपोबलाने जाणलं आहे कि तू पापशून्य आहेस. तू निश्चिन्त मनाने माझ्या या आश्रमात राहू शकतेस. तुझी जबाबदारी पूर्णपणे माझी असेल याबद्दल कोणताही संदेह बाळगू नकोस. माझ्या आश्रमाजवळ अनेक तपस्विनी तप करण्यासाठी राहात आहेत. त्या तुझा  सुयोग्य सांभाळ करतील. मी देतो ते अर्घ्य घे , सावध हो आणि स्वतःच घर समजून येथे निश्चिन्त मानाने वास्तव्य कर."

मातेने महर्षींचे हे अद्भुत शब्द ऐकले. मातेला खूप समाधान मिळालं. मातेने महर्षींना चरणावर मस्तक ठेवून नमस्कार केला आणि  कथनानुसार  करण्याच वचन दिल.

मातेला घेऊन मुनिश्रेष्ठ, तपस्विनी राहात त्या आश्रमाकडे निघाले.  मुनिराजाना येताना पाहून आश्रमातील तपस्विनी अत्यन्त हर्षित झाल्या आणि मुनिराजाना प्रणिपात करून म्हणाल्या.

"हे मुनीश्रेष्ठ आपलं स्वागत आहे. आज खूप काळानंतर आपण इथे आलात.आमचा प्रणाम स्वीकार करा आणि आम्ही आपली क़ाय सेवा करावी त्यासाठी आज्ञा द्या "

"महापराक्रमी महाराज श्रीराम यांची हि धर्मपत्नी सीता आहे. महाराज दशरथ यांची स्नुषा आणि महाराज जनक यांची सत्शील कन्या आहे हि. हिचा  विनाअपराध श्रीरामाने त्याग केला आहे, ही पतिव्रता , निष्कलंक आणि चरित्रवान असून सुद्धा.  आता हिला मीच सांभाळीन. माझ्या या वचनाच्या पालनार्थ तुम्ही सर्वांनी सुद्धा हिला आपलं मानून  कुटुंब सदस्यांप्रमाणे हिच्याशी वर्तन करावे. हे माझं नम्र पूर्वक आग्रही निवेदन आहे. आणि त्याचा तुम्ही स्वीकार कराल यात मला शंका नाही. "

इतकं सांगून आणि मातेला त्यांच्या स्वाधीन करून महर्षी तिथून आपल्या कुटीकडे जाण्यास निघाले. यावर त्या तपस्विनी आणि सर्व मुनीकुमारांनी महर्षींना वचन दिल कि, ते तिचा अत्यंत प्रेम पूर्वक आणि आदराने सांभाळ करतील. महर्षींनी निश्चिन्त असावं. 

हे ऐकल्यावर अत्यंत आनंदाने आणि समाधानाने महर्षी आपल्या पर्णकुटीकडे प्रस्थान करते झाले.

ll श्रीराम श्रीराम श्रीराम ll

क्रमशः

© लेखन : प्रसन्न आठवले

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...