गीत विश्लेषण - आकाश पांघरुनी जग शांत झोपलेले भाग २
आकाश पांघरूनी जग शांत झोपले हे
घेऊन एकतारी गातो कबीर दोहे
गगनात हासती त्या स्वप्नील मंद तारा
वेलीवरी सुखाने निजला दमून वारा
कालिंदीच्या तीरी या, जळ संथ संथ वाहे
भरला स्वरात त्याच्या भक्तीतला सुगंध
ओठांत आगळाच आनंद काही धुंद
त्याच्या समोर पुढती, साक्षात देव आहे
काहूर अंतरीचे भजनात लोप होई
भक्तीत श्रीहरीच्या मन हे रमून जाई
उघडून लोचनांना तो दिव्य रूप पाहे
गीतकार ः मधुकर जोशी
संगीतकार ः दशरथ पूजारी
गायिका ः सुमन कल्याणपूर
बघूया त्याचा मनोहारी गूढ गर्भीत अर्थ.
आकाश हे पंचतत्वातील एक तत्व. निर्गुण ब्रम्हस्वरूप. पृथ्वीला झाकोळून उरलेलं. अर्थातच सर्वसमावेशक तरीही दशांगुळे उरलेलं. ज्याची तुलना फक्त परम ईश्वराशी होऊ शकते. म्हटलं तर सगुण म्हटलं तर निर्गुण निराकार. कारण त्याचा काहीही विशिष्ट आकार नाही. त्या त्या वेळी जसं दिसतं तसं भासतं . ईश्वराचं तसंच आहे. म्हटलं पृथ्वी अर्थातच सजीव निर्जीव सृष्टीचं प्रतीक. जडत्वाशी संबंध असलेली आणि जडत्वाचं प्रतिनिधित्व करणारी माता वसुंधरा. जी सर्व लेकरांची पापं पोटात सामावून घेते. कारण तिच्याच कुशीवर पापी आणि पुण्यात्मे एकाच प्रकारे चिरनिद्रा घेतात आणि आपल्या जडत्वाचा पृथ्वीरूप भाग देहभाग विलीन करतात.
अश्या या ईश्वराच्या प्रेममय दृष्टीचा लाभ घेत, त्याच्या प्रेमाच्या शीतल छायेत विसावून हे जडरूप जग शांत झोपलं आहे. अर्थातच हि शांतता रात्रीची आहेच. पण प्रतीकात्मकपणे कर्म करून सर्व ईश्वरार्पण करून पुन्हा कर्मरत होण्यास सिद्ध होत आहे. त्याआधी या ईश्वररूप आकाशाचा प्रेमळ हात पांघरूण म्हणून लपेटून काही क्षण विसावलं आहे. अश्या शांत वेळी अर्थातच ज्यावेळी सर्व जग कर्माच्या चक्रात बद्ध असतं, त्यावेळी संत कबीर ईश्वरी नामाचा उच्चार करत, त्या ईश्वराला स्मरत जागा आहे. इथे काही गोष्टी या उलगडून दाखवल्या नसल्या तरी त्या काव्याचा गर्भित अर्थ जो मला गवसला तो असा आहे.
मुळात जगाची हि निद्रा अनंत ब्रह्मांडाच्या मालकाच्या शक्तीवर, कर्तृत्वावर, क्षमतेवर विसंबून शांतपणे निजकार्यात मग्न आहे. ती निद्रा प्रतीकात्मक आहे. कारण जेंव्हा जग कर्मगतीच्या जन्ममृत्यूच्या फेऱ्यात हरवून गेलंय , त्यावेळी काही पुण्यात्मे हे या जगताच्या कल्याणार्थ, मार्गदर्शनार्थ पृथ्वीवर जन्म घेतात. किंबहुना त्यांना अश्याप्रकारे जन्म घेण्यातच आपल्या आयुष्याची इतिश्री आहे हे माहित असतं . त्यांचं पंचमहाभुत रूपातील देहधारी अस्तित्व हे केवळ आपल्याला दिसण्यासाठी असतं .
बाकी त्यांना त्या देहाची गरज फक्त जगात कल्याणार्थ असते. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती म्हणतात ते याच साठी. तर अश्या प्रतीकात्मक निद्रेत असलेल्या जगाच्या चिंता वाहायला, त्या जगातला कर्मगतीच्या झोपेतून जागं करायला, जन्ममृत्यू, सुखदुःख, यातील फोलपणा दाखवण्यासाठी सत्चित आत्मे जागृत असतात.
एकतारी म्हणजे एकच तार असलेलं वाद्य. जे पुराणकाळापासून अर्थात देवर्षी नारदांपासून संत मीराबाई, संत तुलसीदास, संत कबीर यांपर्यंत निजानंदी एकरूप झालेल्या सर्व भक्तांनी आपलंस केलं. अर्थातच याचं कारण एकतारी हे एक तत्वाचं प्रतीक, एकच नाम, एकच ध्येय, एकच मार्ग, एकच लक्ष्य. असं लक्ष हाती म्हणजे समोर ठेवून त्या लक्ष्याला सतत स्मरत, त्या लक्ष्याचा मागोवा घेत जाणं हे प्रेमरूप भक्तीचं मुख्य लक्षण. त्याचंच प्रतीक म्हणजे एकतारी.
क्रमशः
©® विश्लेषक : प्रसन्न आठवले
०८/०९/२०२०
Comments
Post a Comment