Skip to main content

गीत विश्लेषण - आकाश पांघरुनी जग शांत झोपलेले भाग ४ व अंतिम

गीत विश्लेषण - आकाश पांघरुनी जग शांत झोपलेले भाग ४ व अंतिम 


आकाश पांघरूनी जग शांत झोपले हे 

घेऊन एकतारी गातो कबीर दोहे


गगनात हासती त्या स्वप्नील मंद तारा

वेलीवरी सुखाने निजला दमून वारा

कालिंदीच्या तीरी या, जळ संथ संथ वाहे


भरला स्वरात त्याच्या भक्तीतला सुगंध

ओठांत आगळाच आनंद काही धुंद

त्याच्या समोर पुढती, साक्षात देव आहे


काहूर अंतरीचे भजनात लोप होई

भक्तीत श्रीहरीच्या मन हे रमून जाई

उघडून लोचनांना तो दिव्य रूप पाहे


गीतकार : मधुकर जोशी 

संगीतकार : दशरथ पूजारी

गायिका : सुमन कल्याणपूर


अश्या निस्सीम भक्तांच्या देहातून भक्तीचा भारलेपणा अखंड वहात असतो. अर्थातच त्यांच्या प्रत्येक इंद्रियातून त्याचा प्रत्यय येतच असतो. ओठ हे मुख्यतः भगवंताचं नाम घेऊन जन्म सार्थकी लावण्यासाठी आहे हे त्यांनी जाणल्यामुळे त्यांच्या स्वर आणि सूर यांना जगतापर्यंत पोचवणाऱ्या ओठातून नामरूपात, स्तुतिरुपात हा भक्तीरुप आनंद ओसंडून वहात असतो. त्यांच्या सान्निध्यात येणाऱ्या प्रत्येकास त्याचा अनुभव येतोच येतो. भक्ती ही सरतेशेवटी आनंदाची अनुभती असल्याकारणाने तोच आनंद त्यांच्या वाणीतून ओठांवाटे प्रकट होत असतो.


भगवंताचं साक्षात हे वचन आहे की ते निस्सीम भक्तांच्या हृदयात वास करतात आणि असे भक्त त्या भगवंताच्या हृदयात नित्य विराजित  असतात. अशी कित्येक उदाहरणं सांगता येतील की, ज्यावेळी प्रत्यक्ष जगतपालक भगवंत भक्तांच्या भेटीला सप्त स्वर्ग सोडून भूतलावर अवतरला आहे. मूलतः भक्त आणि भगवंत हे आत्मा आणि परम आत्मा असे खरतर अविभाज्य भाग आहेत. 


एक सगुण देहात बद्ध , परंतु भक्तीने देवत्वापर्यंत पोचण्याची शक्ती असलेला आणि दुसरा निर्गुण निराकार असूनसुद्धा जगतासाठी आकार रूप गुण धारण करून भक्तांच्या दारी तिष्ठत असणारा भगवंत. म्हणूनच भक्तशिरोमणी संत कबीर भक्तीरुप दोहे गाऊन भगवंताला आळवत असतानाच तो भगवंत साक्षात समोरच उभा आहे, आपली स्तुती भक्तांच्या मुखातून ऐकण्यासाठी.


खरा भक्त, खरतर, अष्टौप्रहर नामात दंग असतो. विचारांच्या तरंगलहरी तिथे प्रकटच होत नाहीत. कारण तिथे स्व आणि चिंता यांना मुक्ती असते. परंतु खऱ्या भक्तांच्या मनात काहूर असलेच तर ते जगाच्या चलनवलनाचं, जगाच्या कल्याणाचं काहूर वा विचार अथवा चिंता असू शकते. पण ज्यावेळी असा संत ध्यानस्थ होतो, हरिनाम वाचे वदतो वा प्रभूला स्मरतो त्यावेळी सर्व चिंता, काहूर, विचार हे त्या नामात भजनात श्रीचरणी वाहून त्या चिंता काळज्या हरीच्या पदरात टाकून संत विमुक्त होतात. 


ही प्रक्रिया नित्य निरंतर नेमाने होते. कारण असे सतचित आत्मे हे नित्य श्रीहरीच्या समुखच असतात. त्या श्रीहरीच्या भक्तीत यांचं मन तल्लीन होत, रमून जातं. मन शून्यात जातं आणि भक्त आणि भगवंत हे एकरूप होऊन जातात. ही नित्य स्थिती असते आणि त्यासाठी भजन, नाम, जप, ध्यान, समाधी ही फक्त एक उपचार प्रक्रिया आहे. संत तर सदैव श्रीहरीचेच असतात. भगवंत हृदयी वसलेले हे शुद्ध सात्विक आत्मे फक्त जगतकल्याणासाठी देह धारण करतात.


अश्या ध्यानस्थ, समाधिस्थ श्रीहरीनामात हरवून गेलेल्या संत कबिराना डोळे उघडताच समोर ते दिव्य हरिरुप साक्षात दिसतं. अर्थात इथे एक लक्षात ठेवलं पाहिजे की, अखंड नामस्मरणाने त्यांना दिव्यदृष्टी प्राप्त झालेली असते. अन्यथा या चर्मचक्षुना त्या हरीचे तेज अप्राप्य आहे, अशक्य आहे. 


भक्तीत लीन , रत झालेल्या, हरवून गेलेल्या संत कबिरांच्या या भावस्थितीवर अत्यंत सुरेख शब्दात गुंफलेली ही शब्दमाला ऐकताना व त्याला सुजोड संगीताची सुरेल साथ आणि त्यासोबत सुमनताईंचा भक्तीत रममाण करणारा, स्वतःला विसरून गाण्यात गुंग करणारा मधुर आवाज, असा हा त्रिवेणी संगम साधलेलं हे गीत, नक्कीच आपल्याला एका वेगळ्या भक्तीविश्वात नेईल.


समाप्त


©® विश्लेषक : प्रसन्न आठवले

१८/०९/२०२०

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...