आत्मचिंतन भाग ६
या पाच लेखात एक गोष्ट मनावर बिंबवली गेली असेल ती म्हणजे, आपला खरा हिशोब हा मृत्यू पश्चात होणार आहे आणि या देहात असताना, जे काही कमावलं आहे किंवा गमावलं आहे, त्याचा संबंध फक्त देहापुरता आहे आणि तो इथेच सोडून जायचं आहे. देह असताना, तो चालावा, नीट सुस्थितीत ठेवता यावा व शेवटपर्यंत तो सुस्थित रहावा, यासाठी जे आवश्यक आहे, ते केलं गेलं पाहिजे. म्हणजे देह उत्तम रहावा आणि उत्तम शरीर स्वास्थ्य व मन:स्वास्थ्य असावं, हा उद्देश असण्यात काही गैर नाही.
पण त्यासाठी ज्या तडजोडी करायच्या आहेत तितक्याच केल्या जाव्यात, जेणेकरून, कधीही पश्चात्ताप करावा लागता कामा नये. तसही जो ताप नंतर अर्थात पश्चात बुद्धीने येतो आणि मनाला, बुद्धीला व आत्म्याला न्यून अथवा ताप देतो, त्याला आपल्या संचित गाठोड्यात बांधून घेऊ नये. यदाकदाचित अशी गोष्ट अनावधानाने, अनिच्छेने, मनाविरुद्ध तडजोड म्हणून करावी लागली, तर तो आपल्या पूर्वकर्म दोष होता, असे जाणावे आणि लक्षात आल्या पश्चात, त्याबद्दल ईश्वराकडे क्षमेची व करुणेची याचना करावी.
आपण वाचलं किंवा ऐकलं असेल तर, अनेक संत महंत कळत वा नकळत काही अपराध घडला असल्यास किंवा ईश्वर सेवेत काही न्युन राहिले असल्यास, अनेक अभंगात ईश्वराची क्षमायाचना करतात. दीन मी, अज्ञानी मी, पतीत मी, अपराधी मी अश्या प्रकारच्या शब्दात, अगदी संतश्रेष्ठ तुकाराम महाराजसुद्धा अनेक अभंगात अशी याचना करतात. याचं मर्म काय असेल.
तर याचं मर्म किंवा गुह्य हेच आहे की, जर संत, सत्पुरुष, महाज्ञानी ईश्वराकडे करुणेची याचना करत असतील, तर त्यांची स्वतःच्या कर्म दोषांकडे पाहण्याची दृष्टी किती सूक्ष्माती सूक्ष्म असेल. याचा एक अर्थ, त्यांना हा भाव आपण सामान्य जनांनी सुद्धा अंगिकरावा ही अपेक्षा असते. पण याचाच दुसरा अर्थ,जर त्यांच्या सारख्या पुण्यवान सत्पुरूषांच्या हातून सुद्धा काही चुकीची, दोष पूर्ण कर्म घडत असतील असं जर त्यांना वाटत असेल तर, आपल्या सारख्या सामान्य जनांच्या हातून नक्कीच अनेकानेक दोषयुक्त कर्मे घडत असणारच.
पण मनापासून क्षमायाचना केल्यास, ईश्वर नक्कीच आपल्या अजाणतेपणी घडलेल्या कर्मांना आपल्या करुणेचा स्पर्श करून, त्याचे दोष दूर करू शकतो. फक्त ती शक्ती आपल्या प्रार्थनेत असली पाहिजे. यातील आपले भाव हे सचोटीचे असावेत, ही यातून अपेक्षा आहे. अशीच इच्छा संत महंत यांची असणार.म्हणून ते अतिसूक्ष्म दोषांचाही डाग, आपल्या आत्म्याच्या पटलावर राहू नये, याची काळजी घेतात.
म्हणजे नित्य नियमाने आपण अश्या प्रकारचे भाव आपल्या मनात जपत, ईश्वराला स्मरण्याची आपली साधना केली पाहिजे. कारण नित्यनियम करून, मना पासून केलेल्या करूणेत, प्रार्थनेत, ईश्वराकडे त्या संदेश लहरी पोचावण्याची शक्ती व ऊर्जा असते. त्यामध्ये अनेक प्रकारच्या दोषयुक्त कर्माचे सदोष फल जाळण्याचे सामर्थ्य असते. त्याशिवाय त्याने चित्तशुद्धी आणि आत्मशुध्दी सुद्धा साधली जाते.
म्हणजेच आपल्या मृत्यू पश्चात यात्रेसाठी अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे चित्तशुद्धी आणि आत्मशुद्धी. अश्या प्रकारच्या प्रार्थनेसाठी आपल्या मनाला तयार करण्याचे प्रयत्न करायला सुरुवात करा. कारण ते वाटते तितके सहज साध्य व सोपे नाही. यावर विस्तृत चर्चा उद्याच्या भागात करूया.
©® संकल्पना आणि लेखन: प्रसन्न आठवले
9049353809 व्हॉट्सॲप
9960762179
२९/१०/२०२३
Comments
Post a Comment