भोग आणि ईश्वर ६२९
©® संकल्पना आणि लेखन : प्रसन्न आठवले
आतापर्यंतच्या दोन भागातील विस्तृत कथनावरून एक गोष्ट लक्षात येते की, बुद्धीच्या सवयी, या संस्काराशी निगडित असतात. बुद्धी ही मनाच्या अत्यंत निकट मानली जाते किंवा तशी ती असते. म्हणूनच मनाच्या लहरी व संवेदना यांचां जलद किंवा कधीकधी अती जलद प्रभाव, सर्वात प्रथम मेंदू अर्थात बुद्धी यावर होतो. कारण कोणत्याही लहरी, स्पंदनं यांचा त्वरित परिणाम स्त्राव अर्थात हार्मोन्स यावर होतो. त्याचप्रमाणे मनाला देहा कडून कार्य करवून घ्यायला बुद्धी या माध्यमाची आवश्यकता किंवा माध्यम म्हणून निकड असते.
त्यावर आधारित विचार किंवा अविचार हे,या हार्मोन्सच्या स्त्रवण्यामुके येतात, जे बुद्धी आणि मन दोन्हींना भारून टाकतात. म्हणजे बुद्धीच्या अविचार किंवा विचार करण्या मागे, मनाच्या लहरींचं प्रसारित होणं आणि बुद्धीचं त्या दिशेने जाणं, या परस्पर सबंधित घटना आहेत. पण या प्रकारे बुद्धीचं झेपावणं किंवा कार्यरत होणं, हे सवयीचा परिणाम आहे.
कारण एखादी स्थिती किंवा परिस्थिती अथवा घटना घडते, त्यावेळी त्यावर आपली क्रिया किंवा प्रतिक्रिया ही, आपल्या बुद्धीला लागलेल्या सवयीनुसार येते किंवा दिली जाते. अशी सवय जडणं म्हणजे संस्कार होणं, हे एका प्रक्रियेने घडते. ती प्रक्रिया म्हणजे, जेंव्हा एखादी कृती, कर्म, क्रिया आपण नियमित करत जातो किंवा मन इच्छा व आकांक्षा यांच्या द्वारे, बिंबवत जातं, त्यावेळी, त्या कृती, कर्म क्रिया याची सवय देह, बुद्धी इंद्रिय इत्यादींना जडते.
हीच सवय नंतर संस्कार होते आणि त्यानुसार कृती, कर्म किंवा क्रिया घडत जाते. आता बुद्धिवरील संस्कार यावर इतकं दीर्घ विवेचन केल्यावर, आपण या गोष्टीचा विचार करूया की, एखाद्या व्यक्तीवर विशिष्ट परिस्थिती, स्थिती, कुटुंब समाज, कालव्यवस्था इत्यादींचे संस्कार का घडतात आणि त्याची महती ,परिणती काय व का असते. कारण माणसाच्या सवयी, संस्कार हेच अनेकदा वर्तमान कर्म आणि अर्थातच भविष्या तील कर्मफल ठरवतं.
प्राप्त परिस्थितीत आपण करत असलेली प्रत्येक कृती, कर्म वा क्रिया, या सर्व आपल्या देह,बुद्धी व मन यावर येणाऱ्या बाह्य लहरी यांच्या क्रिया व त्यावर आतून आलेली प्रतिक्रिया, यांचा संगम आहे. म्हणजे अंतिमतः आतून येणारी प्रतिक्रिया हीच, आपल्या दृष्टीने, आपली पहिली कृती किंवा कर्म आहे. म्हणजेच आपल्यासाठी तोच निर्णायक मुद्दा आहे.
कारण बाह्य स्थिती वा परिस्थिती, ही आपल्या हातात वा नियंत्रणात नाही आणि तशी ती कधीच नसते व आपण ती बदलू शकत नाही. अगदी आपल्या सर्वात जवळील व्यक्ती कशी वागेल आणि काय व कशी प्रतिक्रिया देईल, हे आपण सांगू शकतं नाही. त्यामुळे आपल्या नियंत्रणात असलेल्या देह, बुद्धी व मन या आतील गोष्टींचा विचार करूया किंवा त्या अनुषंगाने आपल्या प्रतिक्रिया कशा व काय असतात आणि काय असाव्यात, याचा अभ्यास करूया.
भोग आणि ईश्वर पुस्तकं ३ व ४ यांच्यावर काम सुरू आहे आणि लवकरच, त्यांच्या प्रकाशना बद्दल सूचित करण्यात येईल.
भोग आणि ईश्वर भाग १ (लेख क्र १ ते ६७) व भाग २ (लेख क्र ६८ ते १३७), ही पुस्तकं उपलब्ध आहेत. आपण खाली दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क साधून, , पुस्तक मागवू शकता.
त्याचप्रमाणे भाग १,२ व ३ हे कींडल अमेझॉन वर ईबुक म्हणून उपलब्ध करण्यात आलं आहे. ज्यांना ते शक्य आहे, त्यांना तशी लिंक पाठवण्यात येईल. ते ईबुक घेऊन वाचू शकतात.
©® विचार व लेखन : प्रसन्न आठवले
०५/१०/२०२३
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️
श्रीकृष्ण प्रेरणा!!श्रीकृष्णार्पणमस्तू !!
Comments
Post a Comment