भोग आणि ईश्वर ६२८
©® संकल्पना आणि लेखन : प्रसन्न आठवले
विवेकाचा विचार करण्याआधी, बुद्धी म्हणजे काय, यावर जरा विचार करूया. बुद्धी म्हणजे जड तत्वाचं अर्थात पृथ्वी तत्वाचं प्रतीक. मेंदूत असलेल्या पेशींमध्ये, विशिष्ट प्रकारची हार्मोन्स निर्माण करून, त्यातून उत्पन्न लहरी वा संदेश कोणत्याही गोष्टीचं पृथक्करण करण्याची देहात स्थित मेंदू या इंद्रियाची क्षमता. यामध्ये मनाच्या जाणिवा, संवेदना यांचा उपयोग सुद्धा केला जातो. पण तरीही बुद्धी ही कार्यरुपात आणि अस्तित्व स्वरूपात देहाचा भाग गणला जातो.
विज्ञान, जीवशास्त्र, शरीर शास्त्र या सर्वांच्या इतक्या वर्षांच्या अभ्यासाने, सिद्ध झालेली आणि आज माहीत असलेली गोष्ट म्हणजे मेंदूवर जितक्या वळ्या, सुरकुत्या या जास्त, त्यानुसार बुध्दीची क्षमता जास्त असते. बुद्धी म्हणजे संकलन, आकलन, पृथक्करण करण्याची क्षणात. मेंदूची उजवी व डावी अशी विभागणी असून, दोन्ही भागात काही विशिष्ट पेशी समूह, विशिष्ट कार्य करण्या साठी बनवलेला किंवा घडवलेला असतो. त्यामुळे त्या त्या विशिष्ट पेशी समुहांवर, ज्ञानेंद्रियां कडून प्राप्त, त्या त्या विशिष्ट, दृश्य, ध्वनी, इत्यादींच्या लहरी व संदेशांचा परिणाम होऊन, त्यांची जाणीव मेंदूत उत्पन्न होते.
अर्थात या जाणिवा व लहरी संदेश बाहेरूनच उत्पन्न होतात असं नाही. आतील विचारांच्या लहरी वा संवेदना यांचासुद्धा परिणाम मेंदूवर, आकलन पृथक्करण यावर होतो आणि त्यावर आधारित क्रिया प्रतिक्रिया यांचा मेळ या खेळ, अविरत देह, बुद्धी व मन यांच्या दरम्यान सुरूच असतो, अगदी श्वासा गणिक सुरू असतो. मेंदूची क्षमता सुद्धा मनाप्रमाणे अमर्याद आहे पण ती प्राप्त देह व त्याची क्षमता, यांच्या समप्रमाणात असते.
ती देहाच्या, मेंदूच्या विकासाच्या, विशिष्ट शारीरिक सवयींचा आधीन असते. ज्याप्रमाणे देहातील बऱ्याच इंद्रियांच्या उद्दीपन व कार्य यांच्या वेळा, देहाच्या सवयींवर अवलंबून असतात, त्याचप्रमाणे, त्या मेंदू बाबत सुद्धा, बऱ्याच प्रमाणात सवयींवर अवलंबून असतात. म्हणूनच विशिष्ट वेळी शारीरिक अन्हिकं, जेवण खाण्याच्या नित्य सवयी अगदी लहान पणापासून लावल्या जातात आणि लावाव्या लागतात.
याचबरोबर खूप लहान वयात, अगदी जन्माच्या आधी पासून, गर्भात असताना घडलेल्या संस्कार सवयी, मेंदूत व मनात रुजवल्या जातात. त्या अनेकदा आयुष्य भर आपला प्रभाव दाखवतात. अगदी एखादं उत्तम किंवा हिन व्यक्तित्व घडण्यास, हे संस्कार सुद्धा जबाबदार असतात. मुळात सवयीच एकप्रकारे संस्कार बनतात किंवा सवयीच संस्कारांचं कार्य करतात. विशिष्ट सवयी विशिष्ट वेळी लावल्या गेल्या की त्या देह, बुद्धी व मन यांना योग्य वेळी, योग्य कार्य करण्यास प्रवृत्त, सक्षम आणि सिद्ध करतात.
विशिष्ट चांगल्या व वाईट सवयी काजांतराने, देह, बुद्धी व मन यांचा संस्कार होतात. म्हणजेच सवयी व त्याद्वारे घडलेले संस्कार हे चांगला किंवा वाईट परिणाम घडवतात हे नक्की. अर्थात त्या सवयी चांगज्या की वाईट हे समोर दिसणाऱ्या परिणामांची परिणती किंवा परिणाम स्वरूप असतात, हे तर नक्कीच. याचाच अर्थ आज आपल्या देहावर जडलेले संस्कार, हे आपल्याच पूर्व आयुष्यातील किंवा कदाचित पूर्व जन्मातील सवयींचा परिणाम स्वरूप आहेत, हा निष्कर्ष यातून सहजपणे काढता येतो.
तार्किक दृष्ट्या एक गोष्ट स्पष्ट होते की, मेंदूवर सुद्धा आज दिसणारे संस्कार, वागण्याची पद्धत, त्यातून घडलेलं संपूर्ण व्यक्तित्व,आवड निवड,नावडत्या गोष्टी, आवडत्या व्यक्ती, दृश्य, ध्वनी, आवाज, इत्यादी सर्वकाही आपल्या सवयीतून साकार झालेले आहेत. अर्थातच तेसुद्धा आपल्याच कर्माचा परीणाम वा परिपाक आहेत. म्हणजेच ज्यावेळी एखादी व्यक्ती, विशिष्ट,ध्वनी, दृश्य, व्यक्ती, रंग, गंध हे आवडतं किंवा आवडत नाही असं जेंव्हा म्हणते, त्या मागे त्या व्यक्तीवर किंवा त्यांच्या मेंदूवर घडलेले संस्कार कारणीभूत आहेत. हाच विषय उद्या सुरू ठेवू. पण तोपर्यंत नामाने नित्य आत्म संस्कार करत राहूया.
भोग आणि ईश्वर पुस्तकं ३ व ४ यांच्यावर काम सुरू आहे आणि लवकरच, त्यांच्या प्रकाशना बद्दल सूचित करण्यात येईल.
भोग आणि ईश्वर भाग १ (लेख क्र १ ते ६७) व भाग २ (लेख क्र ६८ ते १३७), ही पुस्तकं उपलब्ध आहेत. आपण खाली दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क साधून, , पुस्तक मागवू शकता.
त्याचप्रमाणे भाग १,२ व ३ हे कींडल अमेझॉन वर ईबुक म्हणून उपलब्ध करण्यात आलं आहे. ज्यांना ते शक्य आहे, त्यांना तशी लिंक पाठवण्यात येईल. ते ईबुक घेऊन वाचू शकतात.
©® विचार व लेखन : प्रसन्न आठवले
०४/१०/२०२३
9049353809 wap
9960762179
🕉️🕉️🕉️
श्रीकृष्ण प्रेरणा!!श्रीकृष्णार्पणमस्तू !!
Comments
Post a Comment