आध्यात्म विराम ६
म्हणजेच ईश्वरी व्यवस्थेत, मानवी व्यवस्थेच्या एकदम विरुद्ध तत्व असतं. कमी प्रगत, कच्च्या विद्यार्थ्यांना ईश्वर किंवा ईश्वरी व्यवस्था विशेष सहाय्य करते. यामधे जे अज्ञानापोटी मागे आहेत किंवा ज्यांना नित्य कर्म करत असल्यामुळे, मागील अनेक जन्मात गती मिळाली नाही अश्या जीवांना ईश्वर विशेष सहाय्य करून, पुढे नेण्याचा प्रयत्न करतो. हे सहाय्य अर्थातच, त्यांची कर्मफल गती सुधारून, पुढे जाण्याचा मार्ग सुकर व्हावा, इतकेच केले जाते.
अनुत्तीर्ण किंवा कमी टक्केवारी असणाऱ्या विद्यार्थ्यांना, ज्याप्रमाणे उत्तीर्ण होण्यासाठी व्यवस्था करावी, त्या स्वरूपाचे, हे सहाय्य असते. परंतु यामधील विशेष गुह्य, जे ईश्वरी व्यवस्थेचे खास वैशिष्ट्य आहे, ते म्हणजे, जे विद्यार्थी, जाणीवपूर्वक, विकारवश, मोह, लोभ यांनी मदांध होऊन, स्वार्थात बुडून, अहंकारग्रस्त, सत्ता, पैसा, अधर्म यांच्या अधिपत्याखाली,अनितीपूर्वक, दुर्व्यवहार, दुराचार, भ्रष्ट आचार करतात, त्या जीवांच्या अधोगतीची जबाबदारी, कर्माफळाचे भोग, हे त्या जीवांच्या पुढील दुर्दशेला कारणीभूत असेल.
अश्या दुर्जन जीवांना सुद्धा, सुधारण्याची संधी, ईश्वर देतो. कारण ईश्वर हा मूळ कृपाळू व कनवाळू आहे. पण तरीही अश्या आत्म्यांना, देहभोगातून देहभोगाकडे वाटचाल करण्याची गती, कर्मफळ न्यायाने प्राप्त होतेच. पण कनवाळू ईश्वर, तरीही अश्या जीवांची चिंता करतो. जशी चिंता काळजी अज्ञानी जनांची करतो, तशीच काळजी, या जीवांची करण्याची इच्छा ईश्वरी मनात असते, उमटते. पण अश्या जीवांना पुढे जाण्याची गरज, आवश्यकता, सदिच्छा, बुद्धी, त्यांच्या मनात उमटत नसेल आणि हातून कृती वा कर्म होतच नसेल, तर ईश्वर त्यांना काहीही करू शकत नाही.
इथे एक दाखला घेऊन, हा मुद्दा समजून घेण्याचा प्रयत्न करूया. महाभारत युद्धा आधी, कृष्णशिष्टाई प्रसंगी, धृतराष्ट्र सभेत,दुर्योधनाने,सर्व प्रस्ताव धुडकावून लावल्या नंतर, दुर्योधन स्वतः, मधुसूदन वासुदेवाला सांगतो की, मला पांडवांना सहाय्य करण्याची किंवा त्यांना काही देण्याची बुद्धीचं होत नाही. पण जर तू सर्वेश्वर आहेस तर, माझ्या ठायी तशी बुद्धी, तूच उत्पन्न का करत नाहीस.
यावर श्रीकृष्ण फक्त मंद स्मित करतो. पण त्याच्या मनात हा भाव दृढ होता की, प्राण्याच्या ठायी, बुद्धी, इच्छा, वासना, विकार व त्यानुसार कर्म हे त्या त्या प्राण्याची जबाबदारी असते. ईश्वर स्वतः तिथे काहीही सहाय्य करू शकत नाही. फक्त जाणिवांची जागृती होईल, असे ज्ञान व अंजन ईश्वर, अनेक प्रकारांनी करू शकतो. तरीही त्यानुसार मन बुद्धी यांचा निर्णय आणि कर्म करण्याचं कार्य प्राणीमात्राला स्वतःच करावं लागतं.
विषयाची व्याप्ती व गहनता, इथे थांबून वाचकांना चिंतन करण्याची मुभा व समय देण्याची सुबुद्धी देत आहे. म्हणूनच आज इथे थांबू आणि उद्या इथूनच पुढे सुरुवात करूया.
क्रमशः
श्रीकृष्णार्पणमस्तू!!
©® संकल्पना, विचार व लेखन : प्रसन्न आठवले
०६/११/२०२२
9049353809 व्हॉट्सॲप
9960762179
Comments
Post a Comment