देवकी - ५
त्या क्षणात माझ्या जागी इतर कुणीही असतं तर कदाचित एक क्षण अशीच अवस्था झाली असती. पण यादवराज वसुदेव , इतकं धीरोदात्तपणे , अभूतपूर्व संयमाने दादाला अडवत आणि खड्गाकडे हात करून ते खाली आणण्यास तितक्याच निश्चयाने वदले
" हे महापराक्रमी कंस, संयम , संयम. महान सेनापती संयम. प्रजापालक, जे तुम्ही ऐकलंय, तेच समस्त जनांनी ऐकलय. आपला तिळपापड होणं साहजिक आहे. पण धैर्यवान तोच जो प्राप्त स्थितीत आपलं मस्तिष्क शांत ठेवून आपल्या मुख्य शत्रूवर मन एकाग्र करेल."
या त्यांच्या बोलाने दादा एक पाऊल मागे झाला. खड्ग हात खाली घेतला. खड्ग म्यान केलं. खरतर एकदा खड्ग बाहेर काढल्यावर त्याच्या लक्ष्यावर घाव घालून इच्छित लक्ष साध्य करून मगच ते खड्ग म्यान जात असे, दादाचं. हे मी नक्की जाणून होते. मग हे अस कसं झालं, की न लक्ष साधता खड्ग पुनःश्च म्यान झालं. याचं खूप महत्वाचं कारण अर्थातच , वसुदेवांची तीक्ष्ण अन भेदक नजर, पण तितकीच शांत, सखोल, काळजाच्या पार जाणारी, आणि तरीही बघत राहावीशी वाटणारी.
समोरचा मंत्रमुग्ध वा संमोहित होऊन स्थिर राहून फक्त ऐकत असे. कारण तो आवाजही तितकाच आतून हृदयाच्या नव्हे आत्म्याच्या गाभ्यातून येत असे. कुठून इतकं वज्रबल या मनात असेल हा संभ्रम पडतो मला, बरेच वेळा. अश्या जीव घेणाऱ्या क्षणी देखील , वीज अंगावर घेऊन पुनः त्या विजेला रोखून पुनरपी परतवून लावणं, हे फक्त आणि फक्त वसुदेवच करू जाणोत व धजावोत. या वसुंधरेच्या पाठीवर असा कोणी असेल असं वाटत नाही.
विधात्याने कोणत्या साच्यातून यांना घडवलं आणि मला त्यांच्यासोबत बांधून दिलं, हे त्या क्षणी उमगलं आणि कायमस्वरूपी कोरलं गेलं मनात, एक कोरीव लेणं म्हणून. खात्रीच झाली त्या क्षणी की यांच्या समवेत साक्षात मृत्यूदेखील यावयास धजावणार नाही. आज कारागृहात या गोष्टीचा पदोपदी प्रत्यय येतो आहे आणि येत राहील. या आयुष्याचं मर्म काय, जगण्याचं वर्म काय हे माहीत नाही आजतरी. पण वसुदेवांशी का गाठ मारली हे मात्र त्या क्षणी जाणवलं, समजलं.
भाग ५ समाप्त .......
क्रमशः
© संकल्पना मांडणी व लेखन : प्रसन्न आठवले
Comments
Post a Comment