भोग आणि ईश्वर भाग ६५४
©® संकल्पना आणि लेखन : प्रसन्न आठवले
काल एक गोष्ट लक्षात आली असेल की, सूक्ष्म देह आणि स्थूल देह मिळून जो खेळ आयुष्यभर खेळतात, त्याच्या परिणामांची छाया पुढच्या जन्मात, त्या जन्मातील स्थूल व सूक्ष्म देहाला मिळून भोगावी लागते. आत्मा मात्र चैतन्य रूपात त्या कार्याला साक्षीत्व देतो. म्हणजे फक्त स्थूल देह नाही तर सूक्ष्म देह सुद्धा या सर्वात भागीदार असतो. मन विचार करतं, बुद्धी त्याचं विश्लेषण करून कार्य करण्यास देहाला प्रवृत्त करते. मनात येणारे सर्व विचार वृत्ती रूपाने चित्तात साठवले जातात.
त्या वृत्तीचं पुढे व्यक्तिमत्वात रूपांतर होऊन, ती त्या व्यक्तीची ओळख होते. यातूनच त्या व्यक्तीला हीन दर्जाचा, लंपट, क्रोधी, तापट, शांत, सोशिक, सात्विक, राजसी, इत्यादी उपाध्या प्राप्त होतात. तो त्या व्यक्तीचा गुणधर्म होतो. तो त्रिगुणातील एक किंवा अधिक गुणांच्या मिश्रणाचा संचय होतो. या गुणांवर आपण नंतर चर्चा करूया. नंतर त्या उपाध्या त्याच्या स्वभावाचा भाग बनतात. म्हणूनच एखादा मनुष्य मूलतः रागीट, चिडचिड करणारी, शांत, मनमिळावू, सुस्वभावी, इत्यादी इत्यादी असल्याचं आपण म्हणतो.
अनेक वेळा आपण बघतो की, एखादी व्यक्ती अनेक अडचणीत, अनेक प्रकारच्या कष्टात, आपला शांत व सोशिक स्वभाव सोडत नाही. कितीही कष्ट, संकटं, काळज्या, चिंता मागे लागल्या तरीही, त्यांच्या वागण्यात, बोलण्यात, लोकांपुढे सादर होण्यात, कोणताही राग, चिडचिडेपणा असत नाही. या विरुद्ध एखादी व्यक्ती थोड्या थोड्या काळजीने, चिंतेने, कष्टाने, आपला संयम घालवून बसते. किंचितही त्रास त्या व्यक्तीला सहन होत नाही.
यामध्ये चिडणारी, संयम गमावणारी व्यक्ती आपल्या वागण्याने, चुकीच्या प्रतिक्रियेने, नवनवीन कर्मांना जन्म देते. कारण कर्म हे फक्त कृतीने नाही तर, विचार, आचार, उच्चार या तीनही मार्गांनी केलं जातं. कोणतीही कृती करणं किंवा कोणतीही कृती किंवा कार्य न करणं हे देखील कर्म आहे. आता यामध्ये दोन विशिष्ट गट तयार करता येतील.
स्थूल देहाने केलेलं कर्म आणि सूक्ष्म देहाने केलेली कर्मे. अर्थातच त्या प्रत्येक कर्माच्या बिजातून लहरी तरंग अर्थात स्पंदनं किंवा vibes निर्माण होतात. त्या आपल्या बलानुसार फळाच्या सिद्धतेसाठी मार्गस्थ होतात. म्हणजे आपण एखाद्याबद्दल आपल्या मनात अप्रकट विचार करत आहोत. पण त्या विचारातून निर्माण झालेल्या आणि होणाऱ्या लहरी आधी सूक्ष्म व तत्पश्चात स्थूल देहातून बाहेर मार्गस्थ होतात. त्या लहरी देह व कर्मेंद्रियांनी निर्माण होतात आणि ज्ञानेंद्रियांच्या मार्गाने बाहेर पडतात
त्या लहरी , या अंतराळातील किंवा त्या बाहेरील विश्वनियंत्याच्या व्यवस्थेत प्रवेश करून, नोंदल्या जातात. त्यांचा संबंध हा मुख्यतः सूक्ष्म देहाच्या संबंधाने नोंदला जातो. हा फलप्राप्तीसाठीचा आराखडा झाला. पण प्रत्येक कर्माची नोंद, सूक्ष्म देहात सुद्धा केली जाते. त्यासाठी मनातील सुप्त पटलाचा किंवा क्लाऊड स्टोरेज सिस्टिमचा वापर केला जातो.
म्हणूनच देहातून आत्मा बाहेर जातो आणि तो देह सुटतो, तरीही सूक्ष्म देह त्या आत्म्यासोबत प्रस्थान करतो. म्हणूनच ईश्वरी किंवा नियती निर्मित व्यवस्थे नुसार, देह सरला तरीही, त्या देहाच्या सहाय्याने आणि सूक्ष्म देहाने केलेल्या कर्मांचा हिशोब पुढील जन्मातील सूक्ष्म देहाला, त्या जन्मातील स्थूल देहात चुकता करावा लागतो. आपण याकडे एक अपरिहार्यता किंवा एक व्यवस्था अथवा नाईलाज यापैकी कोणत्याही दृष्टीने पाहिलं तरीही, परिणाम बदलणार नाहीत.
आपण या जन्मात भोगत असलेल्या, भोगणाऱ्या आणि भोगून झालेल्या फळांची वर्गवारी गत जन्मातील संचित स्वरूपात जन्मतः प्राप्त अपूर्ण कर्म आणि या जन्मात आपण निर्माण करत असलेल्या क्रियमाण कर्माची फळं अशा दोन गटात मुख्यत्वे करता येईल. यावर आपण पुढच्या भागात विचार करणार आहोत. पण आपलं नित्य ईश्वर स्मरण सुरू ठेवूनच.
तोपर्यंत जय श्रीराम!!
©® विचार व लेखन : प्रसन्न आठवले
२९/१०/२०२५
९०४९३५३८०९
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️
श्रीकृष्ण प्रेरणा!!श्रीकृष्णार्पणमस्तू !!
Comments
Post a Comment