भोग आणि ईश्वर भाग ६५० (पुन्हा सुरू)
©® संकल्पना आणि लेखन : प्रसन्न आठवले
ही लेखमाला पुन्हा सुरू करत आहे. महाराजांची इच्छा असेल त्याप्रमाणे पुढे जाईल.
आपण प्रारब्ध, नशीब, luck, bad luck इत्यादी शब्द वापरतो. मुळात प्रारब्ध म्हणजे काय. कधीकधी ईश्वरेच्छा बालियसी सुद्धा म्हणतो. पण याचा नक्की अर्थ आपण न समजून घेता, हे शब्द वापरून, वास्तविक ते बोथट किंवा अर्थहीन केले आहे. त्याचप्रमाणे आपण ते सोयीनुसार सुद्धा वापरतो. मी सुद्धा मला यामध्ये मोजलेलं आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ज्यावेळी आपलं सर्व चांगलं होत असतं, त्यावेळी आपण माझ्या कष्टाला फळ मिळालं. किंवा देवाने माझ्या कष्टाचं चीज केलं असं म्हणतो.
कधीकधी आपण देवाला सुद्धा यात मधे आणत नाही. त्याऐवजी आपण म्हणतो. माझ्या कष्टाचं चीज झालं. पण हेच ज्यावेळी आपण नकारात्मक काळातून, वाईट घटना घडतानाच्या काळातून जातो, त्यावेळी मात्र, देवाचं माझ्याकडे दुर्लक्ष आहे, देव सुद्धा वेळेनुसार पाठ फिरवतो, देवाला माझ्याबद्दल काहीही प्रेम आस्था उरलेली नाही, मीच सापडलो / सापडले का देवाला त्रास द्यायला, माझं नशीबच फुटकं आहे. ही एक दुसरी बाजू आपलीच असते.
म्हणजे वेळेनुसार, काळानुरूप, कोण बदललं आहे. कोणाला दृष्टी आणि बुद्धीदोष झालेला आहे. वास्तविक सर्वसामान्यपणे देवाने किंवा नियंत्याने जी व्यवस्था निर्माण केली आहे, ती स्वयंचलित, स्वयंनियंत्रित, स्वावलंबी आणि स्वयंपूर्ण व्यवस्था आहे. ईश्वरच काय कोणीही त्यात काहीही हस्तक्षेप करत नाहीत. अत्यंत अपवादात्मक परिस्थितीत कोणीतरी शक्ती त्यात येऊन, अनियंत्रित, अनैतिक स्थिती सुधारून, पुन्हा आपल्या स्थानी जातं.
बऱ्याच वेळा या गोष्टी आपल्याला माहित सुद्धा होत नाहीत. कुणीतरी ते सांगितलं किंवा निदर्शनास आणून दिलं तर आपल्याला ते लक्षात येतं. आता यामध्ये आपण जे विचार करतो (योग्य किंवा अयोग्य) ते विचार सुद्धा आपल्या प्रारब्धानुसार असतात. म्हणजे एखाद्या वेळी आपण योग्य व सकारात्मक विचार केला आणि योग्य दिशेने आपण गेलो, तर आपल्या पूर्वकर्मानुसार ते घडणं अपेक्षित होतं, त्यामुळे तसा विचार आपण केला.
अन्यथा आपण वेगळा विचार केला असता. म्हणजे जर आपले विचार चुकले आणि त्यानुसार आपले निर्णय चुकले की पुढे परिणाम सुद्धा चुकीचे होतात. म्हणजे खरंतरं आपणच चूक आणि बरोबर वागलेले असतो. वास्तविक प्रत्येक परिणामाची जबाबदारी आपली असते. पण यामध्ये काहीं घटक असे आहेत जे बाहेरून कार्य करतात किंवा परिणाम ठरवतात.
म्हणजेच इथे दोन गोष्टींचा विचार केला पाहिजे. प्रत्येक कर्मामागे विचार आणि कृती असे दोन टप्पे आहेत. विचार हा सुद्धा दोन विकल्प दाखवतो एक अंतर्गत आणि बाह्य. म्हणजे देशांतर्गत विचार प्रक्रिया आणि देहा बाहेरील गोष्टीतून येणारा विचार. या दोन्ही विचारातून एक सामायिक विचार तयार होतो. प्रत्येक छोट्या ते मोठ्या अश्या प्रत्येक विचारामागे ही internal आणि external factors अर्थात अंतर्गत आणि बाह्य घटकांच्या संमिश्र परिणामाने विचार इतर.
या दोन्ही घटकांतून जे मिश्रण तयार होते, त्याला आपल्या मनातून प्रकट, झालेला विचार म्हणता येईल.
या मधे पूर्वकर्माचा फलरूप परिणाम असा की, विचारांची दिशा त्यानुसार ठरते ज्यानुसार आपण पूर्वकर्म लिहिलं असेल. खूप जणांचा या पूर्वकर्म यावर विश्वास नसतो. म्हणून दोनच उदाहरणं देतो, विचार करावा. एक म्हणजे जन्मतः दैवी आवाज लाभलेल्या लता दीदी आणि त्यांच्या आवाजाचा कस निघेल असा काळ आणि असे गीतकार, संगीतकार आणि चित्रपट त्यांना मिळाले. पूर्ण जीवन सार्थकी लागलं. त्यांनी या जन्मात असं काय कर्म केलं की जन्मतः त्यांना इतका दैवी आवाज मिळाला. त्यांच्या कष्टाला मी दुय्यम महत्त्व देत नाही.
दुसरं उदाहरण अमिताभ बच्चन यांचं. पाच सहा टॉपच्या कलाकारांनी नाकारलेली जंजीर मधली भूमिका त्यांच्याकडे आली आणि पुढचा सर्व इतिहास आपण जाणतो. त्यांनीही स्ट्रगल केलं, यात दुमत अजिबात नाही. म्हणूनच आपल्याच पूर्व कर्माचा हिशोब भोग किंवा उपभोग स्वरूपात आपल्याला अनेक मार्गांनी प्राप्त होतो. या प्रक्रियेत आपण करत असलेले विचार आणि घेतलेले निर्णय हे सुद्धा आपण केलेल्या पूर्व कर्मानुसार आपणच आखून दिलेले असतात.
विषय खूप मोठा आहे आणि गहन सुद्धा आहे. म्हणूनच वर लिहिलेल्या मुद्द्यांवर विचार करा. प्रयत्न असेल की प्रतिदिन याचा भाग लिहावा. माझ्या सद्गुरूंनी श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांनी कृपा केली, तर प्रतिदिन एक भाग नक्की होईल. आज इथेच थांबूया. पण नाम जे कोणतं आपण घेत आहात, ते घेत रहा. कधीही त्यात खंड नको. यावर सुद्धा आपण या लेखमालेत बोलणार आहोत.
तोपर्यंत जय श्रीराम!!
©® विचार व लेखन : प्रसन्न आठवले
२५/१०/२०२५
९०४९३५३८०९
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️
श्रीकृष्ण प्रेरणा!!श्रीकृष्णार्पणमस्तू !!
Comments
Post a Comment