Skip to main content

भोग आणि ईश्वर भाग ६५३

भोग आणि ईश्वर भाग ६५३

©® संकल्पना आणि लेखन : प्रसन्न आठवले 
 
मनाने, बुद्धीने आणि आत्म्याने जे काही  केलं जातं, त्याला सुद्धा कर्म म्हणतात. कारण सूक्ष्म देह आणि आत्मा, या देहात असेपर्यंत, त्या देहातील सूक्ष्म देहाने, जे काही विचार केले जातील, त्याच विचारांनी काही कार्यांना गती दिली जाते. जरी नुसते विचार केले गेले, तरीही त्या विचारांसाठी ऊर्जा, शक्ती व ओज तेज खर्च होईलच. म्हणजेच जिथे काही खर्ची पडतं तिथे नक्कीच काही निर्माण होतं. मात्र निर्माण झालेलं खर्च झालेल्या ऊर्जेने, ज्या विचारांच्या लहरी, तरंग किंवा vibrations अर्थात vibes निर्माण झाले, त्यानुसार त्या कर्माच्या बीजाची निर्मिती होते.

जशी बीज निर्मिती असेल, त्याप्रमाणे त्या कर्माचं झाड आणि त्याला त्या प्रकारची फलनिष्पत्ती होणार. हे सर्व तार्किक वाटलं तरीही, सत्य आहे. आपण इतक्या सूक्ष्मात जाऊन विचार करत नाही. कारण आपण तितकं चिंतन करतच नाही. परंतु आपल्या पूर्वजांनी, ऋषी मुनी, विद्वान या शास्त्रज्ञांनी याचा खोलात जाऊन विचार, चिंतन, अभ्यास आणि तपशीलवार मांडणी केली. त्यांना त्यांच्या ज्ञानाच्या, मनातील प्रगाढ खोलीच्या आणि कष्ट साध्य सिद्धीच्या जोरावर, अनेक गूढ, गहन, संकेतांचं, ज्ञान प्राप्त झालं होतं. वर मांडलेलं ब्रम्ह, माया, सूक्ष्म देह, स्थूल देह आणि आत्मा यांच्या बद्दलचं ज्ञान, या प्रक्रियेतूनच प्राप्त करून जगापुढे मांडलं. 

तेच त्यांनी अनेक प्रकारच्या ग्रंथातून, मांडून, ते आपल्यापुढे ठेवलं आहे. फक्त एक मुद्दा म्हणून सांगतो, ज्यावेळी तक्षशिला आणि नालंदा ही विद्यापीठं अविवेकी दानवी बुद्धीच्या माणसांकडून जाळण्यात आली, त्यावेळी असे लाखो प्रकारचे ग्रंथ, शोध, अभ्यासपूर्ण निष्कर्ष, प्रमेये त्या आगीत जळून खाक झाली. त्यामुळे आज त्यातील कित्येक रहस्ये, ज्ञान भांडार काळाच्या पडद्याआड लुप्त झाली. आपण त्यांची कल्पना सुद्धा करू शकणार नाही. कारण हे ज्ञान, त्याचे निष्कर्ष, शोध हे अशा काळात मांडले गेले, जेंव्हा एकाग्रता हा एक नियम होता, नित्य होता आणि मनाच्या वारूला शांत करून, त्याच्या अमर्याद ऊर्जा आणि शक्ती यांचा उपयोग करून, त्याला अवकाशात, अंतराळात भरारी मारून, अंतराळातील, त्याही पलिकडील ब्रम्हांडातील आणि ब्रह्मांडाच्या पलीकडे असलेल्या विश्व नियंत्याची रहस्ये, ज्ञान त्यांनी जाणलं होतं.

हेच ज्ञान आणि त्यातील विशेष ज्ञान, पृथ्वीवरील मानवाच्या उपयोगी पडावं म्हणून त्यांनी मांडून ठेवलं होतं. अर्थात ते मांडण्याची पद्धती सुद्धा सांकेतिक अशीच होती. ते त्यांनी स्तोत्र, मंत्र, श्लोक या स्वरूपात मांडून, त्याच्या नित्य पठणाची, पिढ्यानपिढ्यांची व्यवस्था त्यांनी करून ठेवली होती. उद्देश हा होता की, पुढील पिढ्यांमधील कोणी विद्वान, ज्ञानी यातील रहस्य ओळखून, अनंत शक्ती परमात्म्याला जाणून, त्याच्या भक्ती सारख्या मार्गातून, मोक्षाचे गहन मार्ग शोधून काढेल. 

त्यासाठीच त्यांनी या श्लोकांची, स्तोत्रांची, मंत्राची नित्य उपासना पद्धती मांडून ठेवली. त्यालाच आवर्तनं ही संज्ञा दिली आणि अनुष्ठान, यज्ञ याग, इत्यादी शास्त्रीयं पद्धती मांडून ठेवल्या. त्या नित्य होतील, जोपासल्या जातील, पुढे पुढे नेल्या जातील ही व्यवस्था जोडून दिली. आजपर्यंत त्यातील बऱ्याच, परंपरेने अजूनही केल्या जातात, पाळल्या जातात. जे ज्ञान त्यांनी शोधलं, त्यासाठीची तात्विक बैठक, आसनं, योग, हे सर्व त्या ज्ञानाची, त्यांच्या प्राप्तीची सात्विकता नित्य राहावी म्हणून केली गेली. 

त्याची पवित्रता, गुणांची नित्यता कमी होऊ नये,या एकमेव उद्देशाने, ही व्यवस्था करण्यात आली होती. परंतु त्यामागील कारणं, तत्व आणि उद्देश लक्षात घेण्यात आली नाहीत किंवा ती जोपासली गेली नाहीत. तरीही अनेक सिद्धी, साधनं, साध्य यांची सात्विकता बऱ्याच प्रमाणात अजूनही शिल्लक राहिली आहे. 

हे सर्व मांडण्याचा उद्देश इतकाच होता की, आपल्या विचारांची शक्ती आणि बल किती आहे. आपण अगदी ब्रह्मांडा पलीकडे जाण्याची क्षमता, आत्मा, सूक्ष्म देह आणि स्थूल देह यांच्या सहाय्याने प्राप्त आणि सिद्ध करू शकतो. किंबहुना या तिन्हीना एकत्रित आणण्याचा उद्देश, या विश्वाची आणि त्या पलीकडील रहस्ये जाणून, आपल्या मूळ स्वरूपाकडे आत्म्याला घेऊन जाणं हा आहे. ब्रम्ह, माया, ब्रह्मांड, आत्मतत्त्व, सूक्ष्म देह निर्मिती आणि त्या देहाचा आत्म्यासह अनंताचा प्रवास. सूक्ष्म देह म्हणजे बुद्धी, मन, चित्त आणि अहंकार. 

सूक्ष्म देह निर्मिती पश्चात, इच्छा, आकांक्षा, वासना निर्माण होऊ लागतात. सर्वात पहिली इच्छा म्हणजे स्थूल देह प्राप्तीची, निर्माण होते. कारण सूक्ष्म देह फक्त इच्छा निर्माण करू शकतो. पण त्यांचं प्रत्यक्षीकरण हे स्थूल देहात अर्थात भूलोकी प्राप्त होणाऱ्या देहात होतं. निर्माण झालेल्या इच्छेने निर्माण झालेली भूक ही स्थूल देहातच शमवली जाते.  म्हणजे मुळात इच्छांचा उगम हा देह निर्मितीच्याही आधी सुरू होते. अर्थातच जो सूक्ष्म देह, आधीपासून आकांक्षा बाळगून असतो, तो सूक्ष्म देह स्थूल देहनिर्मिती पश्चात, दिसणाऱ्या बाह्य जगात पूर्ण हरवून जातो. 

म्हणजे देह निर्मिती नंतर लगेच बुद्धी मन चित्त आणि अहं यांचा देहाच्या सहाय्याने वासना, इच्छा, भावना, यांच्या पूर्ती, तृप्ती आणि अतृप्तीच्या चक्राचा खेळ सुरू होतो. इथेच कर्माची फळसाखळी सुद्धा निर्माण होते. मग सुरू होतो सूक्ष्म देह, त्याच्या पायी स्थूल देहाची होणारी परवड, त्या सर्व इच्छा, आकांक्षा वासना यांच्या पूर्ततेसाठी निर्माण होणाऱ्या कर्मांचा अखंड वाहता झरा. त्या झऱ्याचा प्रवास आणि प्रवाह म्हणजे अनेक देहातून फिरणारा आत्मा आणि सूक्ष्म देह. 

म्हणजे जिथे जगात येणं, हाच एक कर्म प्रवास आहे, तिथे स्थूल देहात आलेल्या सूक्ष्म देहाला, आपण सोबत आणलेल्या आत्म्याचा पूर्ण विसर पडतो आणि त्या आत्मरूप तत्वाची परवड सुरू होते. तो फक्त एक ऊर्जा, शक्ती, चेतना यांचा स्रोत बनून राहतो. त्याचा मार्ग ब्रम्ह आणि ब्रह्मातून परब्रम्हाकडे जाण्याचा असतो. सूक्ष्म देह हा माया व ब्रम्ह यांचा आविष्कार आहे. आत्मा त्यामध्ये गुरफटला जातो. 

विषय खूप मोठा आहे. आपल्या आधीच्या भागातील विषयाकडे येण्यासाठी, हा गाभा सांगणं आवश्यक होतं. पुढच्या भागात विषयाला अजून पुढील टप्प्यावर नेण्याचा प्रयत्न करूया. पण तोपर्यंत मनाला नामाच्या नादात गुंतवून पुढे जात राहूया. 

तोपर्यंत जय श्रीराम!! 

©® विचार व  लेखन : प्रसन्न आठवले
२८/१०/२०२५
९०४९३५३८०९
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️
श्रीकृष्ण प्रेरणा!!श्रीकृष्णार्पणमस्तू !!

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...