भोग आणि ईश्वर भाग ६५५
©® संकल्पना आणि लेखन : प्रसन्न आठवले
सूक्ष्म देह आणि स्थूल देह या दोन्हींनी कर्म होतात हे आपण पाहिलं. पण प्रत्यक्षात सूक्ष्म देह इच्छा, वासना, क्रोध, इत्यादी. भाव निर्माण करतो. पण त्यांचं शमन हे स्थूल देहा मार्फतच होतं. त्या अर्थाने सर्व कर्म ही स्थूल देहाने केलेली असल्यामुळे, खरंतर फलरूप शिक्षा किंवा बक्षीस हे त्या देहालाच व्हायला हवंय. पण प्रत्यक्षात जी कर्म फलरूपाला पक्व होत नाहीत ती, संचित रूपात गंगाजळीत शिल्लक राहतात.
हिशोबाच्या भाषेत सांगायचं झालं तर, करंट म्हणजे चालू काळाची व संचितातील परिपक्व फळांची देणी व घेणी चालू काळात वसूल होऊन, ते चालू काळात (अर्थात सध्याच्या जन्मात) भोग व उपभोग रूपात समोर येतात. त्याचं नफातोटा पत्रक म्हणजे आपलं या देहातील, या जन्मातील जीवन. जे भोगून होणार नाही किंवा अपूर्ण अथवा अपरिपक्व फल असेल ते पुढील जन्मासाठी संचित स्वरूपात ताळेबंदात शिल्लक राहील.
ते सूक्ष्म देहात साठवून आत्मा, शरीर सोडताना पुढील जन्मासाठी घेऊन जाईल. आता प्रश्न तरीही अनुत्तरित राहतो की, जर सर्व भाव भावना सूक्ष्म देहातील मन बुद्धी चित्त आणि अहंकार यांच्या मार्फत उत्पन्न होतात आणि शरीर फक्त माध्यम आहे तर शिल्लक संचितातील अपरिपक्व कर्मांचा हिशोब पुढील जन्मातील स्थूल देहाला का भोगावा लागतो.
इथे एक लक्षात घ्या की, स्थूल देहच सूक्ष्म देहाच्या वासना, भावना शमन करण्याचं साधन आहे. सूक्ष्म देहच सर्व गोष्टींचा मुख्य कर्ता आहे. त्यामुळे खरतर ही सर्व बेरीज वजाबाकीची गणितं, सूक्ष्म देहासाठी असतात. पण त्रिमिती, स्थूल देह, यांच्या मर्यादा यामुळे, स्थूल देह हाच सर्व आहे, तोच संसार करतो, तोच एक कर्ता, या भावनेला देह चिकटून आयुष्यभर याच समजात वावरतात.
जे देहासमोर आहे, जे ज्ञानेंद्रिय, पंचेंद्रिय यांना ज्ञात होतं, जे स्थूल मानाने मोजता येतं, ज्याला प्रमाणाने सिद्ध करता येतं, जे दृष्टीला दिसतं तेच एक सत्य, हा भाव वैज्ञानिक दृष्टी म्हणून आपण मानतो. बुद्धी, मन, अहंकार हे दाखवता न येणारे घटक आहेत. त्यांना प्रमाण मानलं किंवा नाही तरीही आयुष्यात काहीही फरक पडत नाही, अशी एक सर्वसाधारण धारणा असते.
त्यामुळे जे दृष्टीला दिसत नाही, ऐकायला येत नाही ते नाही, अशी भावना निर्माण होऊ शकते. अर्थात प्रयोगाने विज्ञानाने सुद्धा काही दृष्टीपलीकडील गोष्टी स्वीकारल्या आहेत. उदाहरणार्थ God's particle अर्थात देवकण हा नुकत्याच करण्यात आलेल्या, जागतिक पातळीवरिल एका वैज्ञानिक प्रयोगात, शास्त्रज्ञानीच प्रयोगाअंती काढलेला हा निष्कर्ष आहे. असो.
मुळात सूक्ष्म देह हाच सर्व भावांचा कर्ता अर्थात initiater आहे आणि स्थूल देह हा सर्वांचा आज्ञा पालनकर्ता अर्थात instrument आहे. आत्मा फक्त power and energy source आहे. त्यामुळे वास्तविक अर्थाने सर्व सचित कर्म ही सूक्ष्म देहाचे assets आणि liabilities असतात. म्हणून सर्व संचित ही सूक्ष्म देहाची प्राप्ती आणि जबाबदारी असते. म्हणूनच एक देह गेल्यावर सूक्ष्म देह नवीन देह प्राप्तीसाठी अखंड धडपडत असतो.
त्याच्या पोतडीतील अपरिपक्व कर्माच्या बिजातून सर्वात बलवान कर्म परिपक्व होईल त्यावेळी, त्या सूक्ष्म देहाला, स्थूल देह प्राप्तीसाठी पोषक वातावरण आणि निर्मिती व्यवस्था तयार मिळते. एकदा ही स्थिती आली की, प्राप्त अनुकूल स्थितीचा लाभ घेऊन, सूक्ष्म देह, स्थूल देहात प्रवेश करतो. आत्मा त्यासोबत आपोआप येतो. आता त्या सूक्ष्म देहाला सचितात शिल्लक असलेल्या कर्माच्या हिशोबाची पूर्तता करण्यासाठी आणि नवीन कियमाण निर्माण करण्यासाठी नवीन देह मिळतो.
विषय अजून सखोल आहे, म्हणून पुढच्या भागात चर्चा पुढे नेऊया. पण नामाचा हात सोडू नये, हीच नम्र विनंती.
तोपर्यंत जय श्रीराम!!
©® विचार व लेखन : प्रसन्न आठवले
३०/१०/२०२५
९०४९३५३८०९
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️
श्रीकृष्ण प्रेरणा!!श्रीकृष्णार्पणमस्तू !!
Comments
Post a Comment