भोग आणि ईश्वर भाग ६५२
©® संकल्पना आणि लेखन : प्रसन्न आठवले
या विश्वात म्हणजे अनंत ब्रह्मांडं असलेल्या या जगतात (पूर्ण व्यापक अर्थाने आणि दृष्टीने), फक्त पृथ्वी नामक ज्ञात ग्रहावर, आपण 700 ते 800 कोटी मानव आहोत. बाकीचे प्राणी वेगळे. म्हणजेच तितके स्थूल देह, सूक्ष्म देह आणि आत्मे या पृथ्वीवर व्यक्त स्वरूपात वावरत आहेत. यामध्येच विश्वनियंत्याच्या भव्य स्वरूपाची कल्पना येईल. तितकीच व्यापक मायेची शक्ती आहे, जी या विश्वातील प्रत्येक जीवाला ब्रह्माशी बांधून ठेवून, स्वतः अज्ञात आहे.
यामध्ये प्रत्येक माणसाचं आयुष्य वेगळं आहे. क्वचित एखादा माणूस संपूर्ण पृथ्वीवर दुसऱ्या माणसाप्रमाणे तंतोतंत आयुष्य जगत असेल. ही आपल्या कल्पनेतील फक्त शक्यता आहे. अन्यथा, साधारण 700 ते 800 कोटी लोकं 700 ते 800 कोटी प्रकारचं आयुष्य जगतात, असं ठामपणे सांगता येईल. म्हणजेच प्रत्येकाची lifeline अर्थात जीवनरेखा भिन्न भिन्न मार्गाने जात असते.
याचं काहीतरी कारण असणारच. वैज्ञानिक दृष्टीने विचार केला तर, तितक्या विचार लहरी, तरंग या वातावरणात उमटत असतात. त्या एकमेकांना आकर्षित किंवा प्रतिकर्षित करत असतील किंवा एकसमांतर जात असतील. या लहरी, तरंग अतिसूक्ष्म असतात. त्यांच्या frequency levels खूप वेगळ्या प्रकारच्या असतात. वैज्ञानिक दृष्टीने ज्या लहरी तरंग अर्थात waves किंवा vibrations असतात, त्यांच्या frequencies आपण मोजू शकतो, पकडू शकतो, वाचू शकतो.
अंतराळातून सुद्धा अनेक vibrations, ज्यांना सिग्नल म्हणतात ते येत असतात. त्या एका विशिष्ट coded language मधे अर्थात विशिष्ट सांकेतिक भाषेत असतात. आपल्या जगतात तयार होणाऱ्या लहरी तरंग या देखील सांकेतिक भाषेत असतात. विज्ञान त्यांना वाचण्याचा, त्यांना decode करण्याचा, त्यांच्या सांकेतिक भाषेचा अभ्यास करून, वाचण्याचा प्रयत्न करतं. आपल्या मनातून, देहातून, वाचेतून आणि बुद्धीतून निघणाऱ्या तरंग लहरी सुद्धा सांकेतिक भाषेत असतात.
आपले विचार जे वाचेने अर्थात वाणीने बोलतो, ते देखील वास्तविक सांकेतिक भाषेतच असतात. पण ती भाषा अगदी लहानपणापासून आपल्याला आई, वडील, नातेवाईक, शाळा यांमधून शिकवली जाते. ती इतकी नित्य आणि आपल्या सवयीची असते की, आपल्याला त्याचं फार अप्रूप किंवा आश्चर्य वाटत नाही. या बोलण्याच्या भाषेचा उगम आपण आपल्या संस्कृतीतील आराध्य देवतांपैकी श्रीगणेश व देवी श्री शारदा यांच्याशी जोडतो.
बोलता न येणाऱ्या लोकांसाठीसुद्धा आपण म्हणजे मानवाने खाणाखुणांची एक विशिष्ट सांकेतिक भाषा तयार केली आहे. तिला प्रत्येक भाषेतील बोलीभाषेच्या सांकेतिक भाषेशी जोडली आहे. ज्यामुळे बोलता येणारे सुद्धा ती शिकून, बोलता न येणाऱ्या लोकांना ती भाषा शिकवतात. न दिसणाऱ्या दिव्यांग जनांना सुद्धा आता एका विशिष्ट सांकेतिक भाषेचा अर्थात ब्रेल लिपीचा आधार आपण दिला आहे. या दोन मानव निर्मित सांकेतिक भाषा हा मानवाच्या उच्च प्रतिभेचा सकारात्मक आणि समाजोपयोगी भाग आहे. ती एक वैचारिक उपलब्धी आहे. असो.
तर अश्या या ज्ञात आणि अवगत सांकेतिक भाषेच्या विश्वात आपण लीलया वावरतो, त्या शिकून आपण त्याचा अनेक गोष्टींसाठी उपयोग करतो. मनातील भाव , विचार मांडतो. आता यात सुद्धा सकारात्मक व नकारात्मक बाजू आहेत. उदाहरणार्थ आपण आपल्या सांकेतिक बोली भाषेने जगाशी, आपल्या घरातल्या लोकांशी, नातेवाईकांशी, सर्वांशी चांगल्या गोष्टी बोलू शकतो, बोलतो. हा दैवी किंवा सकारात्मक दृष्टिकोन झाला.
पण याच भाषेच्या आधारावर, अपशब्द वापरणं, शिव्या घालणं, धमक्या देणं, भीती घालणं इत्यादी गोष्टी सुद्धा माणूस करतो. आपल्या लोभासाठी, मोहासाठी, लाभासाठी, अनैतिक गोष्टींसाठी सुद्धा याच सांकेतिक बोली भाषेचा वापर माणूस करतो. ही झाली असुरी किंवा अमानवी बाजू. म्हणजे आपल्याला परंपरेने, दैवाने मिळालेल्या किंवा लाभलेल्या गोष्टीत सुद्धा सकारात्मक, दैवी, योग्य बाजू आणि नकारात्मक, दानवी, असुरी, अयोग्य अशी बाजू सुद्धा आहे. म्हणजेच उपलब्ध गोष्टीचा सदुपयोग व दुरुपयोग करणं सर्वस्वी आपल्या अर्थात प्रत्येक मानवाच्या हातात म्हणजेच कर्मात आहे.
म्हणजे वागण्याचे सुद्धा व्यक्ती परत्वे भिन्न भिन्न प्रकार आहेत. म्हणजेच असं म्हणता येईल की प्रत्येक व्यक्तीच्या व्यक्ततेची पातळी किंवा पद्धत भिन्न भिन्न आहे. ही व्यक्तता एका विशिष्ट सांकेतिक भाषेत होते. त्यातील वाणीची किंवा बोलण्याची सांकेतिक भाषा आपल्याला समजते किंवा शिकून समजून येऊ शकते. अगदी खुणांची किंवा डोळ्यांची किंवा चेहरा व देहबोली यातून व्यक्त होणाऱ्या सांकेतिक लहरींची भाषा सुद्धा समजू शकते, अथवा शिकून घेता येते. किंवा जाणता येते.
पण मनाने, बुद्धीने व आत्म्याने व्यक्त विचार किंवा अभिव्यक्ती आपल्याला वाचता येत नाही, माहीत नाही किंवा समजत नाही. कारण त्यांची पातळी अर्थात frequency आपल्या ज्ञानेंद्रियांच्या पलीकडे आहे. कारण त्यांच्या लहरी तरंग अतिसूक्ष्म असतात. त्या बुद्धी, मन आणि आत्मा या पातळीवर जाणून घेता येतात. या तिघांनाच त्या अतिसूक्ष्म लहरी तरंग जाणण्याची किंवा catch करण्याची शक्ती असते. स्थूल देहात ती शक्ती असत नाही. पण सूक्ष्म देहात ती शक्ती विधात्याने दिलेली आहे. मात्र त्यांना जाणून घ्यायला, त्या लहरी समजायला, आपल्या बुद्धीला, मनाला आणि आत्म्याला त्या पातळीवर नेण्याची आवश्यकता असते.
त्यासाठी बुद्धी, मन हे आत्म्यात आणि आत्मा हा परम आत्म्यात रत व रममाण होणं आवश्यक आहे. पण तो खूप गहन विषय आहे. त्यावर, जसजसे आपण पुढे जाऊ, तसतसे विचार करूया. आता या अज्ञात सांकेतिक भाषेला (बुद्धिज मनीज व आत्मज लहरी यांना) जाणणारी यंत्रणा विधात्याने नक्कीच निर्माण केली आहे. कारण आपल्या बोलीभाषांची सांकेतिक भाषा जाणणारी यंत्रणा जशी अक्षरं, शब्दं, वाक्यं लिपी, आपण जाणतो आणि ती शिकण्याची व्यवस्था आपण केली आहे.
त्याचप्रमाणे मानवी बुद्धिज मनीज व आत्मज लहरी ही सांकेतिक भाषा काय व्यक्त करते. त्यातून निर्माण होणाऱ्या लहरी सुद्धा कर्मचाच भाग आहेत. त्या काय भाव, विचार व कर्म करतात ही एक वेगळी सांकेतिक भाषा आहे. म्हणूनच मानवी जीवनाची भिन्नता ही या तीन कर्मांवर मुख्यतः अवलंबून आहे. यावर पुढच्या भागात आपण विचार करूया. अर्थात मनाला नामाच्या लहरीत रममाण करण्याचं कर्तव्य नित्य सुरू ठेवूया.
तोपर्यंत जय श्रीराम!!
©® विचार व लेखन : प्रसन्न आठवले
२७/१०/२०२५
९०४९३५३८०९
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️
श्रीकृष्ण प्रेरणा!!श्रीकृष्णार्पणमस्तू !!
Comments
Post a Comment