Skip to main content

भोग आणि ईश्वर भाग ६५१

भोग आणि ईश्वर भाग ६५१ 
©® संकल्पना आणि लेखन : प्रसन्न आठवले 
 
आपल्या मनात येणारे विचार किंवा येणारा प्रत्येक विचार हा कुठेतरी कर्माशी निगडित असतो. किंबहुना आपण घेतलेल्या पहिल्या श्वासापासून सुरू झालेला या देहातील, हा प्रवास, अगदी शेवटच्या श्वासापर्यंत, या जन्मात, संकेतात्मक किंवा संदेशात्मक असतो. आपल्या मनात आलेला विचार कृतीत येऊन, त्यातून घडणारं प्रत्येक कर्म हे कुठेतरी आधीच्या कर्माशी निगडित असतं. 

त्याची शंभर टक्के संगती जोडणं, हे आपल्यासारख्या सर्वसामान्य लोकांना अशक्य असतं. अर्थातच ही संगती जोडून, त्याचा नेमका अर्थ लावणं हे अद्वितीय, अलौकिक ऊर्जा, शक्ती असलेल्या भूतलावरील, काही दिव्य सत्पुरुषांना शक्य असतं. त्यांना एखादी व्यक्ती पाहिल्यावर, त्याच्या आत्म्याचा इथवरचा प्रवास दिसतो आणि या देहातील आत्म्याची परतीची वाट कुठे चुकली, हे त्यांना समजतं. त्यानंतर ते सांगतात त्याप्रमाणे आपण केल्यास, पुढील मार्ग सुकर होत जातात.

या मधे एक लक्षात ठेवण्याची गोष्ट म्हणजे त्यांचं मार्गदर्शन ही एक दिशा असते. उदाहरणार्थ आपण नवीन जागेचा पत्ता नवीन शहरात, गावात शोधत असताना, एखाद्या व्यक्तीला विचारतो. त्यावेळी ती व्यक्ती आपल्याला दिशादर्शन करते. पुढे काही अंतर गेल्यावर आपण पुन्हा पुढील दिशा किंवा मार्ग विचारतो. त्यावेळी एखादी व्यक्ती पुढचा मार्ग सांगते. जर ती व्यक्ती त्याच दिशेला जाणारी असेल तर, आपल्याला अचूक पत्त्यावर नेऊन सोडेल. अन्यथा थोडा मार्ग आपण विचारत विचारत जाऊ शकतो किंवा जाऊ. 

हे साध्या आयुष्यातील संसारात घडणारं नित्य वास्तव आहे. पण देहातील आत्म्याच्या एकूण प्रवासात त्याला अनेक देहातून जावं लागतं. प्रत्येक देहात एक सूक्ष्म देह त्या आत्म्यासोबत असतो.सर्व कर्माच्या हिशोबाची इत्थंभूत नोंद सूक्ष्म देहात होत असते. सूक्ष्म देह म्हणजे मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. एक प्रकारे ही cloud system म्हणता येईल. कोणत्याही सूक्ष्मातील सूक्ष्म कर्म यातून सुटत नाही. त्याचप्रमाणे कोणत्याही कर्माचं फल प्राप्त झाल्याशिवाय, त्याची सूक्ष्म देहातील नोंद शून्य होत नाही. 

म्हणजेच या नोंदलेल्या प्रत्येक कर्माचा जाबजबाब आपल्याला अर्थात आत्म्याला द्यावा लागतो. वास्तविक आयुष्यात सर्वसामान्य संसारात आपण देह या संकल्पनेला खूप धरून असतो. किंवा आपल्या सर्व संकल्पना, कल्पना, विचार, प्रमेये, चर्चा, ज्ञान, विज्ञान, जाणिवा, सर्व काही स्थूल देहाबाबत असतं. कारण सामान्य माणसाला आत्मा, सूक्ष्म देह इत्यादी गोष्टी जाणवत नाहीत. आपल्याला बरेचदा मनाची सुद्धा जाणीव नसते. इतके आपण या स्थूल देहात हरवलेले असतो. 

हे देखील एकप्रकारे नैसर्गिक आहे. कारण आपल्या देहातील सूक्ष्म देहाला म्हणजे बुद्धीला आणि स्थूल देहातील ज्ञान देणाऱ्या इंद्रियांना जे दिसतं ते फक्त दृष्टी, श्रवण, गंध, रस, स्पर्श या पातळीवर जे ज्ञान मेंदूमार्फत बुद्धीकडे पोचतं ते. तेच जाणिवांना समजतं आणि तेच ज्ञान बुद्धी व मन यांना ज्ञात होतं. या सर्वात देहाच्या मर्यादित बळाला भुलोकीच्या पंचमहाभूत रूप देहाच्या मर्यादा म्हणतात. 

म्हणजे या मनात येणारे विचार, चित्तातील वृत्ती आणि मेंदूतील बुद्धी यांच्या तराजूत तोलून आपण कर्म करतो. आता प्राप्त देह आणि त्याच्या मर्यादा हा पुन्हा एक गहन विषय आहे. कारण एखाद्याला बुद्धीची अमर्याद शक्ती, मनाची प्रगाढ खोली आणि जाणिवा, त्याचप्रमाणे आत्म्याची जागृती प्राप्त होते. अशी व्यक्ती अत्यंत कमी वयात, आत्मजागृत होऊन, या देहातीत जगताचा विचार करून, तिथे जाण्याचा मार्ग. जोखते. 

तर काहीजणांना जेमतेम देह जगण्याची प्रेरणा मिळेल इतकीच ज्ञानेंद्रिय, स्थूल देह आणि सूक्ष्म देहाची प्राप्ती होते. त्यांना मोहाने, लोभाने, असुयेने आणि अशा वृत्तीच्या सर्व शत्रूंनी ग्रासलेलं असतं. त्यांना हे देखील जाणवत नाही की, आपण खोल खोल जात आहोत. चुकलेल्या वाटेवर आपण खूप दूरवर आलो आहोतच. पण त्याच मार्गावर अजून अजून पुढेच जात आहोत. पण अशा भिन्न भिन्न प्रकृतीच्या माणसांचे, भिन्न मार्ग असण्याचं कारण काहीतरी असणारच. अन्यथा एखादा आत्मजागृती सहजी प्राप्त करतो, तर एखादा किटकाप्रमाणे आपलं आयुष्य जगत असतो. 

खूप गहन विचार करायचा आहे. म्हणून आज याच विचारांचं मनन, चिंतन करा आणि नाम मार्गी चालत रहा. पुढच्या भागात पुन्हा भेटूया. 

तोपर्यंत जय श्रीराम!! 

©® विचार व  लेखन : प्रसन्न आठवले
२६/१०/२०२५
९०४९३५३८०९
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️
श्रीकृष्ण प्रेरणा!!श्रीकृष्णार्पणमस्तू !!

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...