शाळा, कर्तृत्वाची पहिली पायरी आणि आठवणींचं फिक्स्ड डिपॉझीट !!
शाळा , गेल्या दिडशे वर्षातल्या कित्येक पिढ्यांचं बालपण जिथे गेलं , अशी व्यवस्था. गुरुकुल पद्धतीतून आपण इतक्या सहज ज्या व्यवस्थेत ब्रिटिशांमुळे आलो, त्या व्यवस्थेत आता कमीतकमी दहा बारा पिढ्या तरी नक्कीच घडल्या असतील, गेल्या दिडशे वर्षात. याच व्यवस्थेत वाढलले, मोठे झालेले कित्येक जण आपापल्या लहानपणाला तिथेच सोडून पुढे जातात. पण त्या बालपणाच्या आठवणी आयुष्य व्यापून दशांगुळे उरतात.
शाळा , प्रत्येकाच्या आयुष्यातील अनिवार्य गोष्ट. आधुनिक शिक्षण पद्धतीतील मूलभूत घटक. आई वडील यांनतर मानसिक , सामाजिक , बौद्धिक संस्कार, जाण , समज आणि विकास हे साधणारा दुसरा महत्वाचा पैलू. कदाचित हिऱ्या प्रमाणेच पैलू पडणारा जवाहीर. आमच्या , म्हणजेच टिळकनगर विद्या मंदिर डोंबिवली या शाळेबाबत नक्कीच या सर्व गोष्टी लागू होतात, हे अभिमानाने सांगताना खरंच आनंद नव्हे तर उर भरून येतो. आज आयुष्यात जे काही आहोत त्या सर्वांचं श्रेय आमच्या या शाळेला जातं. आमची १९८२ ची बॅच.
खरतर आमचा काळ, साधारण १९७५ ते १९८२ , राजकीय सामाजिक उत्थापनाचा आणि उलथापालथींचा होता. पण त्याचा कोणताही परिणाम आमच्यावर जाणवू देण्यात आला नाही वा शाळा प्रबंधक समिती तो प्रभाव आमच्यापर्यंत पोहोचू न देण्यात व त्याचा आमच्यावर परिणाम होऊ न देण्यात यशस्वी झाली असेल. याच विशेष कौतुक आज वाटतं . आमच्या तीन तुकड्या होत्या अ , ब आणि क . आमच्या १९८२ च्या बॅचचं विशेष महत्व म्हणजे आतापर्यंतच्या दहावीच्या ५५ बॅचेस मध्ये फक्त आमच्याच बॅच मध्ये एका वेळी ४ विद्यार्थी श्यामला काळे, बृहद अभ्यंकर , प्रसाद औटी व महेश मोघे गुणवत्ता यादीत झळकले होते. हा विक्रम आजही अबाधित आहे.
आमच्या बॅचचे विद्यार्थी जे आज अनेक क्षेत्रात यशस्वी आहेत त्याची वानगीदाखल उदाहरणे, माहिती तंत्रज्ञान क्षेत्र , वैद्यकीय क्षेत्र, सनदी लेखापाल क्षेत्र, स्थापत्यशास्त्र, संशोधन व विकास क्षेत्र, विपणन अर्थात मार्केटिंग क्षेत्र, ग्राफिक डिझाईन, लांब पल्ल्याच्या गाड्यांवर चालक, पर्यावरण क्षेत्र, जलशुद्धीकरण क्षेत्र, इलेक्ट्रॉनिक क्षेत्र, नाट्य क्षेत्र, बँकिंग क्षेत्र, संगीत विषारद, स्वतःचा व्यवसाय, कृषी क्षेत्र, वकिली व्यवसाय, वैद्यकीय सेवा क्षेत्रात कर्करोगासारख्या आजारावर निदान करण्यात अग्रेसर असलेल्या टाटा कॅन्सर इन्स्टिटयूट मध्ये शिक्षणाच्या बळावर सेवा क्षेत्रात कार्यरत, शिक्षण क्षेत्र, समाज सेवा क्षेत्र, लेखन क्षेत्र अश्या विविध क्षेत्रात आमच्या बॅचचे त्यावेळचे अनेक विद्यार्थी आज उच्च पदावर कार्यरत आहेतच पण अग्रेसर सुद्धा आहेत. अनेकांनी त्यावेळच्या शिदोरीच्या जोरावर अनेक क्षेत्रात आपले स्थान प्रस्थापित केले आहे. आमच्या बॅचचे बहुतेक सर्व विद्यार्थी आज स्थिर स्थावर आहेत, याचं श्रेय त्यांच्या कष्टाबरोबर शाळेला आहे हे नक्की.
शाळा आठवल्यावर प्रथम आठवतात अर्थातच शाळेतील शिक्षक ज्यांनी खरच मायेचा आणि प्रेमाचा ओलावा निर्माण करून शिकवण्याची औपचारिक पद्धत कधीच वापरली नाही. रोज सकाळी शाळेत कधी एकदा जातोय असं होऊन जायचं, त्याचं श्रेय अर्थातच १००% शाळेतल्या शिक्षकांनी तयार केलेल्या या मोकळ्या वातावरणाला. मराठी शिकवणाऱ्या बर्वे बाई, टांकसाळे बाई, साखरे बाई (शिवणाला देखील ), इंग्रजीसाठी वैद्य बाई, इतिहास भूगोल नागरिकशास्त्र अर्थातच सुधा जोशी बाई आणि दीक्षित बाई , शारीरिक शिक्षणासाठी असलेल्या पळधे बाई व गोखले बाई, शास्त्र व गणित यासाठी रानडे सर , भंडारे सर, साठे सर, चौधरी सर, शिरहट्टी बाई, मराठी आणि राष्ट्रीय छात्र सेना अर्थातच एन सी सी साठी शिंपी सर, संगीतासाठी दाणी बाई. अर्थात काही अपवाद होतेच ज्यांची भीती वाटायची जसं साठे सर, शिरहट्टी बाई, काही प्रमाणात रानडे सर. अर्थातच मुख्याध्यापक पुरोहित सर आणि उपमुख्याध्यापक वाजपेयी सर ह्या नावांची असलेली सुप्त भीती, कायम मागे मागे असायचीच. त्यामुळे आपोआपच शिस्त ही न सांगता लागत गेली.
लकबींमध्ये रानडे सरांची खडू अथवा वेळप्रसंगी डस्टर फेकून मारायची सवय, चौधरी सरांची आं नकोरे, सुधा जोशी बाईंची त्रासिक चेहऱ्याने बोलण्याची विशिष्ट पद्धत. या ठिकाणी मला आमच्या वर्गातील एक आठवण शेयर करावीशी वाटते.
दूरदर्शनवर नुकताच २२जून १८९७ हा सिनेमा लागून गेला होता आणि नंतरच्याच आठवड्यात, सुधा जोशी बाईंच्या तासालाच घडलेला एक प्रसंग जो कायम स्मरणात आहे व राहील. इतिहासाचा तास चालू होता आणि तेवढ्यात त्यांना वाजपेयी सरांचा निरोप आला आणि त्या वाजपेयी सरांच्या दालनात गेल्या. अर्थातच वर्ग मोकळा झाला आणि वर्गातला एक मुलगा ( नावं टाळतोय मुद्दामहून) जागा सोडून ३,४ बेंच पुढे जाऊन पहिल्या बेंच वरच्या मुलाशी गप्पा मारत होता. जुन्या बिल्डिंगमध्ये पहिल्या मजल्यावर २ नंबरच्या खोलीत आमचा वर्ग भरला होता, ज्या वर्गाला बाहेरील भिंतीला व व्हरांड्या कडील भिंतीला दोन दोन खिडक्या होत्या. थोड्याच वेळात बाई आल्या. त्या एका खिडकीतून पुढे आल्या आणि मध्ये भिंत होती, तिथे त्या असताना एक मुलगा म्हणाला गोंद्या आला रे गोंद्या आला रे.
जो मुलगा बेंच सोडून गेला होता, तो परत जागेवर येऊन बसला. त्यामुळे बाईंना कळलं नाही की, कोणी जागा सोडली होती. पण त्यांनी ते वाक्य ऐकलं होतं. त्यामुळे त्यांना हे लक्षात आलं की कुछ तो हुवा था. त्यांनी सर्व मुलांना खोदून खोदून विचारलं की कोण हे वाक्य म्हणालं. अर्थातच एकाही मुलाने सांगितलं नाही. अनेक धमक्या देऊनसुद्धा एकही मुलगा बधला नाही. अगदी हुशार मुलं देखील बळी पडली नाहीत, अन्यथा हे विद्यार्थी हे नेहमी सॉफ्ट टार्गेट असतं. काही होत नाही म्हटल्यावर बाईंनी सर्व मुलांना बेंचवर उभं करून मोर्चा मुलींकडे वळवला. आश्चर्य वाटलं आम्हाला की एकाही मुलीनेसुद्धा तोंड उघडलं नाही. त्यांनादेखील धमकी देऊन बघितली बाईंनी. मुलांना तसच उभं करून त्या तास संपताना निघून गेल्या, अर्थात रागातच. मुलामुलींच्या एकतेचा एक वेगळाच रंग त्या दिवशी बघायला मिळाला.
अर्थातच काळाच्या गतीनुसार वर्ष सरत सरत दहावी आली. इथे जाणवायला लागलं की आता शाळा नावाची पवित्र शृंखला अबद्ध करून, आता खुल्या प्रांगणात आपल्याला जावं लागेल. वेगळे भाव मनात येत होते. बाहेरच्या जगाशी संपर्क येणार म्हणून असलेला आनंद, मनाचे अनेक कोपरे व्यापत होता आणि एका कोपऱ्यात शाळा सुटणार याचं दुःख दडून बसलं होतं. त्याला बाहेर पडायला जागा नव्हती, नव्या जगाच्या ओढीपुढे.
पुढे आयुष्याच्या चाकोरीमध्ये बद्ध झालेले आम्ही, नवीन तंत्रज्ञानाच्या आधारे पुन्हा जोडले गेलो समाज माध्यमातून. आता रीतसर समूह स्थापून संपर्क असतोच. आता तर गेट टूगेदरच्या माध्यमातून रीतसर वर्षातून एक दोन वेळा भेटतो. त्यावेळच्या आठवणी पुन्हा उजळवतो. त्यात रमण्यात सोनेरी दिवसांची आठवण ताजी होते. पण तरीही जी मजा त्या वयात होती, आज तिच्या फक्त आठवणी शिल्लक आहेत. पण त्याच आठवणी मनातली मरगळ दूर करून, एक वंगण म्हणून उपयोगी येतात. म्हणून त्या आठवणी जपणं हाच मार्ग आता हातात आहे. या लेखाच्या निमित्ताने पुन्हा अनेक वर्ष मागे गेलेल्या आठवणींचे ते मंतरलेले दिवस पुन्हा रुंजी घालून गेले. !!
दहावी , १९८२ तर्फे प्रसन्न आठवले
टिळकनगर विद्या मंदिर, डोंबिवली पूर्व.
9049353809
8422990092
Comments
Post a Comment