स्थितीचं विस्तृत विश्लेषण ! ( जरा मोठा आहे लेख)
शिवसेनेच्या स्थापनेनंतर बरीच वर्षे सेनेला उपहासाने वसंतसेना असं संबोधलं जायचं. बाळासाहेब हे प्रथमपासून आक्रमक शैलीसाठी प्रसिद्ध होते. किंबहुना तोच त्यांचा मूलतः स्वभावधर्म होता. पूर्ण आयुष्य ते त्याच शैलीत जगले , वावरले. अगदी आपल्याला त्यामुळे नुकसान होऊ शकतं वा होत आहे हे जाणवून सुद्धा त्यांनी कधीही तो स्वभाव त्यागला नाही वा बदलला नाही. मुळात सेनेची स्थापना ही तत्कालीन कॉमुनिस्ट पक्षाचं मुंबईतील वाढतं प्रस्थ रोखण्यासाठी झाली हा बोलवा आहे आणि त्यामागे तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक हे होते अशी वदंता होती.
या प्रतिमेच्या पार्श्वभूमीवर बाळासाहेबांनी आपलं राजकारण पुढे नेलं. १९७५ च्या आणीबाणीला त्यांनी विरोध केला नाही. कारण ते स्वतः आक्रमक स्वभावाचे असल्यामुळे कदाचित ते त्या वेळी त्यांना रास्त वाटलं असेल. साधारण १९८५ पर्यंत सेनेने मराठी माणसाला केंद्रीभूत मानून राजकारण व समाजकारण केलं. माझ्या मते १९८४ ची दंगल ही मुख्यत्वे कारणीभूत ठरली असेल , बाळासाहेबांना हिंदुत्ववादी राजकारणाकडे वळवायला. कारण स्वातंत्र्यवीर सावरकरां नंतर जहाल हिंदुत्ववादी नेता देशात नव्हताच. ही पोकळी कदाचित या दंगलीमध्ये वा नन्तर त्यांना विचार करायला लावणारी ठरली असेल.
तेही एकमेव सार्थ नेते होते त्यावेळी, जे उघडपणे हिंदुत्वाची भूमिका समर्थपणे व्यासपीठावर निडरपणे मांडण्याची हिम्मत बाळगून होते, परिणामांची पर्वा न करता. त्यांच्या हाताखाली असलेला सैनिक त्यांच्या एका आदेशावर जीव ओवाळून द्यायला तयार होता. याचाच प्रत्यय पुनः एकदा १९९२-९३ च्या वेळी आला. हिंदुत्वावर जे संकट येईल ते अंगावर घेण्याची ताकद असलेले एकमेव नेते त्यावेळी ते होते. किंबहुना त्याना हिंदुत्वाची खरी ताकद समजली १९८४ च्या दंगलीत आणि या ताकदीचा अंदाज बाळासाहेबांना कळल्यानन्तरच त्यांनी अधिकृतपणे हिंदुत्ववादाकडे आपल्या पक्षाचं धोरण वळवलं, जे त्याआधी प्रादेशिक होतं. हा हिंदुत्ववादाचा शिक्का अभिमानाने बाळासाहेबांनी मिरवला शेवटपर्यंत.
भाजपा हा देखील हिंदुहीतवादी पक्ष आहे , प्रथमपासूनच. पण बाळासाहेबांचा जहालपणा त्यांच्याकडे आधी नव्हता, अस नाही. पण त्यात म्हणावा तितका कणखरपणा आधी पडद्यावर नव्हता. कदाचित युती नन्तर आणि बाळा साहेबांच्या प्रभावात आल्यावर तो फरक त्यांना प्रकर्षाने जाणवला असेल. आधी त्यासाठी त्यांच्या विश्वहिंदू परिषद व बजरंग दल या शाखा होत्या. त्या माध्यमातून हा प्रभाव त्यांनी वेळोवेळी समाजमनावर मांडला, जाणवू दिला.
पण मुख्य ओळख जी भाजपाला पक्षीय पातळीवर दिली ती सुरवातीला राममंदिर प्रश्नाच्या वेळी अडवाणीजी यांनी. त्यावेळी अडवाणीजी यांना पक्षाचा चेहरा तर वाजपेयीजी याना पक्षाचा मुखवटा म्हटलं जायला लागलं. तरीही खरा शक्तिपरीचय हा २००२ ला गोध्रा दंगलीत मोदींच्या कणखर नेतृत्वामुळे घडला. एक नवीन अध्याय भाजपा आणि पर्यायाने देशासमोर घडत गेला. याच प्रभावात भाजपाने जहाल हिंदुत्व हा नवीन चेहरा देशाला दिला. मोदी कणखरपणा , आत्मविश्वास , दुरदर्शीपणा , प्रखर नेतृत्वगुण , या सर्वांच्या जोरावर एक मुख्यमंत्री ते पंतप्रधानपदापर्यंत चढत गेले.
इथेच दुसरा अध्याय सुरू झाला. कदाचित मोदींनी दूरदृष्टीने एक गोष्ट नक्की जाणली असेल की , बाळासाहेबांनंतर हिंदुत्वाचा खरा आधार कोण, ही पोकळी कशी काय भरून येणार किंवा तितका धडाडीचा नेता कोण, हे प्रश्न राहतातच. याला दिशा आपसुकपणे मोदींच्या कणखर नेतृत्वाने दिली. याच जोरावर भाजपा आधी गुजरातमध्ये नंतर देशामध्ये मजबूत होत गेली. याची कुणकुण सेनेला लागली असेल अर्थातच जाणवलं असेल. शिवाय बाळासाहेबांनंतर त्यांच्या ताकदीने त्यांचे सर्व मुद्दे पुढे नेण्यात त्यांच्या नन्तरचं नेतृत्व तितकं सक्षम नाही वा नसेल हे खूप आधी जाणवल्यानंतर सेनेचं नेतृत्व वेगळा विचार व दिशा वा नविन पक्षधोरणाच्या मागे लागले. याची सुरवात खूप आधीपासूनच सुरू केली होती हे आज नक्की वाटतं.
त्याच दृष्टीने व दिशेने वाटचाल नवीन नेतृत्वाने नक्की आधीच सुरू केली आणि भाजपासोबत वेगळं होण्याकडे त्यांची वाटचाल माझ्यामते २००९ ते २०१४ या दरम्यान झाली. याच दरम्यान पक्षात बाळासाहेबांइतकाच नवीन नेतृत्वाचा शब्द, वजन वाढवू लागला, जम बसवू लागला. याचीच चुणूक पक्षात जुन्या लोकांचा राबता कमी होऊन नवीन लोकांचं कार्यक्षेत्र , आवाका वाढत वाढत गेला. कारण पक्षीय धोरण व दिशा बदलायच्या होत्या. ज्या जोरावर नवीन नेतृत्वाची पूर्ण नियंत्रणाकडे मार्गक्रमणा सुरू झाली.
ही प्रक्रिया जाणीवपूर्वक होऊन त्याद्वारे , साधारण मोदी नेतृत्व उदयास येऊन नियंत्रित होत गेलं, तोपर्यंत सेनेची दिशा व पुढील मार्ग स्पष्ट होत गेली. ही गोष्ट २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत, जेंव्हा सेनेने प्रथम वेगळं लढण्याचा निर्णय घेतला, तिथेच त्यांनी त्यांच्या ताकदीची चुणूक काँग्रेस व राष्ट्रवादी यांना दाखवून दिली. ज्याचा उपयोग त्यांना आता आघाडीशी बोलणी करताना होईल हा अंदाज येऊनच भाजपा नेतृत्वाने आपली वाटचाल सुरू केली. या निवडणुकीत जाणीवपूर्वक युती करून एक गोष्ट केली भाजपाने ती म्हणजे सेनेच्या या नुकसानकारक वा घातक ताकदीचा बंदोबस्त वा त्याला नियंत्रित करण्यात बऱ्याच प्रमाणात यश मिळवलं.
आणि म्हणूनच काँग्रेस द्विधा मनःस्थितीत आहे. सेनेची भाजपाला नुकसान करण्याची शक्ती किती आहे वा पाच वर्षात ती किती वधारली का घटली आणि त्यांच्या हिंदुत्ववादी पार्श्वभूमीवर इतर राज्यात किती नुकसान होऊ शकतं याचाच अंदाज काँग्रेसला येत नाहीये. म्हणूनच त्यांनी घाईत निर्णय घेण्यास, कृतीतून स्पष्ट नकार दिला. त्यातच संजय निरुपम या दुसऱ्या वाचाळ वीराने इशारा दिलाच आहे की, सेनेसोबत काँग्रेसने जाऊ नये. हाच आघाडी होण्यात पेच आहे.
आता परतीचे मार्ग सेनेने स्वतः एक एक करत बंद करत आणलेत. त्यामुळे काँग्रेस नेतृत्वाला मनवून आघाडीत घुसण्याखेरीज त्यांना अन्य पर्याय एकच , जर आघाडी सरकार आलं तर बाहेरून पाठिंबा देणं वा जे मिळेल त्यावर आनंदी राहणं वा तिघात एक म्हणजे एक तृतीयांश भागीदारी स्वीकारणं. कारण आज जरी काँग्रेसने तडजोड केलीच तरी ती फार काळासाठी करणं, त्यांना स्वतःला घातक आहे. म्हणूनच भविष्यात काँग्रेस जे देईल ते स्वीकारत जाणं हे भविष्य असेल. कारण राष्ट्रवादीसारखी बार्गेनिंग पॉवर, नेत्यांची फौज, निगरगट्ट नेते आणि ताकद सेनेकडे आता राहिल्ये अस नक्कीच वाटत नाही.
बघूया काय होतय.
©® विश्लेषण प्रसन्न आठवले
१२/११/२०१९
Comments
Post a Comment