मृत्यू एकच अधिकारी येथे
मृत्यू एकच दिशादर्शक
जग चालले मृत्यूदिशेने
मृत्यू एकच समालोचक
एकच सत्य जग देखे
असत्य न झाले एकदाही
मृत्यू साक्षी पंचभूताचा
नश्वर शरीरा वाली नाही
क्षणात मनुजा दाखवी न्यून
किती कठोर तयाचा दणका
चुकले न कोणा आले कितीही
एकच न्याय राजा वा रंका
तरीही मनाला माने मनुजा
किती श्रेष्ठ मी या जगती
राम कृष्ण देहा नच सोडी
देह ठेविला ऐसेची म्हणती
म्हणुनी राहुनी लीन चरणी
भोगावे सारे राहुनी मौना
नाम एक अंतिम जे सत्य
तोच एक अंतिम दागिना.
राम म्हणा वा कृष्ण म्हणा
रघुराई व घनश्याम म्हणा
नाम कोणतेही जिव्हेवर
अनंत पापे जळली म्हणा
कवी : प्रसन्न आठवले
१९/०८/२०१९
Comments
Post a Comment