ll ॐ गंगणपतये ll
जानकी पुनःवनवास ९५
मातेने बघितलं पलीकडल्या तीरावर लक्ष्मणाचा रथ हळू हळू दूर जात आहे. त्यामुळे माता अजून शोकाकुल झाली आणि त्या निर्जन रानात आपण एकटेच आहोत या जाणिवेने मातेला अजूनच रडू येऊ लागलं.
उध्वस्त जीवन म्हणजे काय याचं जगाला उदाहरण मिळावं म्हणूनच कदाचित राघवानी या गर्तेत मला ढकलून दिलं असावं का ? एक राजा म्हणून कदाचित त्यांचा निर्णय सुयोग्य म्हणतील सुद्धा अयोध्येतील लोकं. म्हणतील? , पण काळाच्या कसोटीवर हा निर्णय तावून सुलाखून निघेल अस आज वाटत असलं तरी ते धूसर आणि अंधुक वाटतय.
कारण कुठलाही मानमरातब न ठेवता एका राणीला हो एका सार्वभौमत्व असलेल्या , राघूकुल भूषण, राजा प्रभू राम यांना आपल्या एकमेव राणीला अश्याप्रकारे आड रानात, आडवाटेने, कोणालाही न विचारता, सवरता, आपल्या बंधूंच्या माध्यमातून आणि तेही ती गरोदर आहे हे माहीत असताना, सोडून देणं हे कितपत शोभायमान आहे वा असेल हे काळ ठरवेल कदाचित.
कदाचित या साठी की, काळ हा खूप लबाड प्राणी आहे. तो ज्याचं त्याच माप ज्याच्या त्याच्या पदरात घातल्याशिवाय गप्प राहात नाही. मग अस जर असेल तर आपल्याला कोणत्या प्रमादाच वा पातकाच प्रायश्चित्त मिळतंय. जर हे आधीच्या काळातल्या एखाद्या प्रमादरूपी कर्माच बीज फलद्रूप झालेलं असेल तर , तस निदान आजच्या घडीपर्यंत तरी आपल्या हातून काही घडलंय अस वाटत नाही, निदान स्मरणात नाही.
की, आपण प्रभुना सुवर्णमृगाजीन आणण्याची गळ नव्हे, हट्ट धरला, त्याच पातकाची ही शिक्षा नियतीने आपल्याला दिली? पण तस बघितलं तर त्याची भरपाई आपण सुदधा केलीच की, रावणाच्या राज्यात क्षण क्षण पतीकडून सुटका होण्याची वाट पहात. त्याचप्रमाणे रघुवीरांनी देखील भोगली आहे.
मग ही शिक्षा आपली कनिष्ठ भगिनी उर्मिला हिची ताटातूट, तिचा पती लक्ष्मण, यांच्यापासून केली म्हणून तर नाही ना. पण यात आपण तिला तिच्या प्राप्त परिस्थितीत असलेल्या निज कर्तव्याची समज दिली. तिने देखील ते तीचं परमकर्तव्य म्हणूनच स्वीकारलं. तद्नंतरसुद्धा आपण तिला यात तुला अडकवण्याचा हेतू नाही, याची जाण देऊन , पुनश्च खातरजमा करून मगच अंतिम निर्णय घेतला. जो तीनेसुद्धा नाखुषीने नाही तर, स्वखुशीने स्वीकारून चौदा वर्षांचा विरह प्राप्त केला होता. तिला लहानपणापासून मी ओळखते. तिने कधीही कोणतीच गोष्ट नाखुषीने केलीच नाही. किंबहुना निजकर्तव्य म्हणून सुद्धा नाही तर, आपखुषीनेच प्रत्येक गोष्टीचा स्वीकार करून, उलट आपल्याला आनंद दिला. या आनंदात तिचा स्वतःचा आनंद दडलेला असे.
मग लक्ष्मणाचा रोष. छे ही गोष्ट कालत्रयीही शक्य नाही. जितकी शाश्वती मी पतीपरमेश्वराची देईन, तितकीच शाश्वती मी लक्ष्मणाची सुद्धा देईन. ज्याचा जन्मच ज्येष्ठ भ्राता श्रीराम यांकरता आहे आणि जो हे कदापिही अगदी दुस्वप्नातसुद्धा विसरणं शक्य नाही, त्या लक्ष्मणाचा रोष वा रुष्टता ती देखील पत्नी विरहाबद्दल केवळ अशक्य.
मग हे उध्वस्त जीवन का यावं वाट्याला, का हा जीवघेणा खेळ नियतीने माझ्या बरोबर आरंभला आहे. आधी आपल्या चुकीने पतीवियोगाची शिक्षा एकदा भोगल्यानंतर, पुनः ही अघोरी परीक्षा. का फक्त मलाच का ? हे ईश्वरा, हे नियतीकारा, का हा क्रूर खेळ आरंभलास ? निदान माझ्या प्रमादांची तरी मला जाणीव करून द्यायचीस आणि नन्तर हा भोग वाट्याला येऊ द्यायचास. निमूटपणे भोगला असता, हा शाप, एक दुःसह्य स्वप्न म्हणून. अगणित यातनांच हे देणं, हा अघोरी खेळ.
ll श्रीराम श्रीराम श्रीराम ll
क्रमशः
© लेखन : प्रसन्न आठवले
Comments
Post a Comment