ओढ भेटीची
एक अनामिक ओढ़ जाणवे
खेचून काही नेते मज का
का वाटे ही हूरहूर नूसती
नसता माझ्या मनात शंका
का व्हावी ही भेट वाटले
का वाटे हा मोदच भेटूनी
असे अचानक का व्हावे
भासे काही गेले निसटूनी
उरात होते का ही धडधड
का होई हा श्वास जलदही
का पाउल हे पडते अडते
का भासे हे फिरते जगतही
पुन्हा कधी का होईल हेही
नच जाणवले कधी कसेही
मृदुल मनाची जाणीव नव्हती
कि हे रम्यच स्वप्न असेही
विसरून गेले जाणीव सगळी
वाटे आता काही न उरले
फक्त एक काळोखी मिणमिण
बाकी सारे स्वप्नी सरले
का रे मजला ओढ जाणवे
तुझा मनाच्या कडे कपारी
का हे आहे असेच स्पंदन
आहे का मी उगा बावरी
निशा भासते गेली संपून
उरे उगवती उषा जणू हि
रंग बदलले दिशा दिशातील
जणू मनातील संपून तीमिरही
कवी : प्रसन्न आठवले
Comments
Post a Comment