नवरात्रातील तिसरी माळ माता चंद्रघंटा देवी
पिण्डजप्रवरारूढ़ा चण्डकोपास्त्रकेर्युता।
प्रसादं तनुते मह्यं चंद्रघण्टेति विश्रुता॥
माता दुर्गेच्या तिसऱ्या स्वरूपाचं नाव चंद्रघंटा देवी आहे. अत्यंत निर्मळ पवित्र स्वरूप आहे चंद्रघंटा देवीचं. देवी शांतस्वरूप आहे. देवीच्या मस्तकी घंटेच्या आकाराची चंद्रकोर आहे म्हणून देवीच्या या रुपाला चंद्रघंटा हे नाव मिळालं. देवीला दहा हात असून प्रत्येक हातात खड्ग , त्रिशूळ आदी अस्त्र शस्त्र असून डाव्या हातात कमंडलू आहे. देवीची वर्णकांती सुवर्णासमान असून देवी सिंहारुढ आहे. तिची ही मुद्रा युद्धासज्ज आहे. परंतु भक्तांसाठी हे स्वरूप परम शांतीदायक आणि कल्याणकारी आहे.
देवीच्या आराधनेने व साधनेने साधक अलौकिक शांती आणि सुखाचा अनुभव घेतो. देवीची साधना पाप आणि इतर बाधा यांचं निवारण करते. देवीची साधना शीघ्र फलदायी आहे. देवी भक्तांच्या हाकेला त्वरेने धावून येते असा तिचा लौकिक आहे. या देवीचे साधक सिंहाप्रमाणे पराक्रमी, निर्भय आणि निश्चिन्त होऊन जातो. देवीचं ध्यान केल्याने घंटानाद होऊन बाह्य बाधे पासून भक्त रक्षिला जातो. देवीच्या मस्तकावर असलेल्या घंटानंदाने समस्त असुर पिशाच्च इत्यादी थर थर कापतात , भयकंपित होतात.
देवीच्या साधनेने भक्त निर्भयता व विरता यांचा अनुभव करतो. परंतु त्याचसोबत विनम्रता व सौम्यता यांचाही विकास होतो. देवीच्या कृपेने व साधनेने भक्तांच्या मुख, नेत्र व काया यावर एक दिव्य तेज व कांतीची झळाळी पाहायला मिळते. देवीचे भक्त जिथे जातील तिथे लोकांना परम शांतीचा अनुभव येतो. आराधकांच्या शरीरातून दिव्य परमाणूंचा उत्सर्ग होतो.जो साधारण डोळ्यांना दिसत नाही. परंतु अश्या साधकांच्या संपर्कात येणारे या गोष्टीचा अनुभव करू शकतात.
देवीची महती थोर आहे. तिचं गुणगान करायला शब्द अपुरे आहेत. तरीही देवीचं गुणगान खालील प्रार्थनेने करूया
शीघ्र फलदायी तू साधका तारिसी
घंटारूप अर्धचंद्र मस्तकी धारिसी
कांती तव सुवर्ण भक्तीने पावसी
भक्तांच्या हाकेला अतिवेगे धावसी ll
जयदेवी चंद्रघंटा तव रूपे भारिसी
सिंहारुढ तव स्वरूप दशभुजा देवी
अस्त्रांनी शस्त्रांनी सज्ज तव मूर्ती
निजभक्ता रक्षाया येसी ही कीर्ती
पापाचा मेरूही सहजी तू पाडसी ll
जयदेवी चंद्रघंटा तव रूपे भारिसी
गांजले भक्तगण ब्रीद राखी आपुले
साधका दिव्यत्व तव भक्तीने दिधले
सुखशांती समाधान मिळवून तरले
ऐश्या या स्वरूपाची प्रचिती दाविसी ll
जयदेवी चंद्रघंटा तव रूपे भारिसी
आईच्या शीघ्र फलदायी कीर्तीचा अनुभव घेऊन भक्तिरसात न्हाऊन जाऊया.
जय देवी चंद्रघंटा !!! 🌹🌹🌹
©® लेखन आणि काव्य : प्रसन्न आठवले
०१/१०/२०१९
माळ तृतीय अर्पण !!! 🚩🚩🚩🌷🌷🌷
Comments
Post a Comment