नवरात्रीतील दुसरी माळ श्रीब्रम्हचारिणी देवीसाठी.
दधाना करपद्माभ्यामक्षमालाकमण्डलु |
देवी प्रसीदतु मयि ब्रह्मचारिण्यनुत्तमा ||
या देवी सर्वभूतेषु माँ ब्रह्मचारिणी रूपेण संस्थिता।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नम:।।
देवी श्रीब्रह्मचारिणी हे आदिशक्तीचं तपस्वी रूप आहे. हिमालयाच्या पोटी जन्म घेऊन जेंव्हा भगवान शिवांसाठी उग्र आणि घोर तपश्चर्या करत होती, त्यावेळच्या तिच्या स्वरूपाला, कार्याला, अवस्थेला व योगिनी रुपाला मिळालेलं नाव म्हणजे श्रीब्रह्मचारिणी. देवीच्या या रुपात देवीच्या उजव्या हातात जपमाळा व डाव्या हातात कमंडलू आहे. हे दोन्ही तप व वैराग्य यांचं प्रतीक आहे.
तपस्येच्या या काळात अनेक कठोर आणि उग्र साधना हजारो वर्षे हिमालयपुत्रीने केली. देवाधिदेवसुद्धा तिच्या या तपश्चर्येमुळे अचंबित झाले. यात हजार वर्षे फक्त कंद मूळ, हजार वर्षे फलाहार, हजार वर्षे एकभुक्त, हजार वर्षे बेलाची पानं यावर राहून देवीने घोर तप करून भगवान श्रीशिव शंकरांना प्राप्त केलं.
योगी तपस्वी आणि साधक यांना त्यांच्या तपस्येत व साधनेत जी शक्ती उपयोगी येते वा गरजेची असते ती म्हणजे श्रीब्रह्मचारिणी. अत्युच्च पातळीची वैराग्यवृत्ती अंगी येण्यासाठी वा आलेली टिकवून ठेवण्यासाठी प्रेरणादायी म्हणजे श्रीब्रह्मचारिणी. एखाद्या उच्च ध्येयाच्या प्राप्तीसाठी लागणारी चित्तवृत्ती अंगी येण्यासाठी श्रीब्रह्मचारिणी देवीची उपासना करावी.
श्रीब्रह्मचारिणी ही योगिनी कुंडलिनी जागृतीसाठी साधक साधना करतात तेंव्हा त्यांना एकाग्रता, तल्लींनता हे मिळवण्यासाठी व या कार्याच्या सिद्धतेसाठी आवश्यक शक्तीस्वरूप आहे. देवी श्रीब्रह्मचारिणी याकार्यात योगी , त्यागी, तपस्वी, साधक यांची प्रेरकस्रोत आहे. अश्या या उग्रतपस्वी, योगिनी स्वरूपातील श्रीब्रह्मचारिणी देवीला प्रार्थना करूयात.
नित नित स्मरूनी तुजला प्रर्थीतो
कार्याच्या सिद्ध्यर्थ तुजला स्तवितो
वैराग्यवृत्ती जी अभ्यासा गरजेची
त्याच्या प्राप्त्यर्थ योगिनीस भाजतो
जय देवी जय देवी श्रीब्रह्मचारिणी
तप जप सामर्थ्ये अद्भुत तव करणी
जय देवी जय देवी ..
शिवलीला ऐसी ज्यासाठी हिमकन्या
प्राप्तीस्तव उग्र तप बसली आचरण्या
अविरत अविश्रांत शक्ती घोर धरण्या
निश्चय करुनि ध्येये शंकर वर वरण्या
दैवाची लीला ही काळाच्या स्मरणी
जय देवी जय देवी श्रीब्रह्मचारिणी
जय देवी जय देवी ....
कार्याची जननी जी तप धारिणी
आश्चर्ये एकाग्रता प्राप्त हो म्हणुनी
आत्मरत योग्यांच्या नित तू स्मरणी
लागती साधक जे जाण तव भजनी
त्यांच्या त्या कार्या धावावे योगिनी
जय देवी जय देवी श्रीब्रह्मचारिणी
जय देवी जय देवी ....
आई श्रीब्रह्मचारिणी देवीला साधनेच्या यशस्वीतेसाठी प्रार्थना करून तिच्या चरणी नतमस्तक होऊ या. तिच्या अद्भुत शक्तीच्या प्राचितीसाठी अर्चना करूया.
©® लेखन आणि काव्य : प्रसन्न आठवले
३०/०९/२०१९
माळ द्वितीय अर्पण !!! 🚩🚩🚩🌷🌷🌷
Comments
Post a Comment