कालाय तस्मै नमः २
©® संकल्पना, मांडणी आणि विचार: प्रसन्न आठवले.
मागील लेखातील एक एक उदाहरण पुढे नेऊ. गोलाकार संरचना काळाची सुद्धा असणार, हे आपण सोदाहरण मागील लेखात जाणलं. मुळात या विश्वातील किंवा आपल्या सूर्य मंडळातील सर्व ग्रह वर्तुळाकारच आहेत. कोणत्याही ग्रहाबद्दल कोणतीही शंका किंवा विपरीत माहिती किंवा पुरावा नाही. या गोल आकाराचं इतकं महत्व किंवा मांडणी मी करत आहे कारण, जर काही विशिष्ट कालावधीत कोणत्याही गोष्टीची, गणितीय सूत्राने पुनरावृत्ती घडवायची असेल तर, गोलाकार रचना हेच एकमेव उत्तम परिमाण आहे.
याचा अजून एक अर्थ असा निघतो की, विधाता किंवा नियंता हा किती मोठा गणितज्ञ, खगोलशास्त्री, वैज्ञानिक, तत्ववेत्ता आणि सर्वज्ञ असला पाहिजे. त्यातून एक गोष्ट स्पष्ट होते की, सर्वकाही वर्तुळाकार रचनेत मांडणारा निर्माता, काळ निर्मिती करताना काही चूक करेल हे संभवत नाही. म्हणजेच काळाची रचना सुद्धा वर्तुळाकार आहे, हा निष्कर्ष आपण काढू शकतो.
पण जितकं आकर्षण, कुतूहल, गूढ, उत्सुकता काळ या एका शब्दाबद्दल आहे, तितके क्वचितच कोणत्या शब्दाबद्दल असेल. अर्थात यालाच जोडून येणारा दुसरा भाग म्हणजे जन्म आणि मृत्यू. या तिन्हीची गूढता कालातीत आहे. संत महंत, ज्ञानी, सद्गुरू यांनी सामान्य जनांच्या मनातील भीती दूर करण्यासाठी, स्वतःच्या आत्म प्रेरणेने त्याबद्दल खूप छान प्रकारे लिहून ठेवलं आहे. पण यात गूढता कमी होण्यापेक्षा मनातील भय, गंड कमी करण्याचा प्रयत्न जास्त आहे.
कारण मृत्यूसारख्या गुह्य गोष्टीची माहिती किंवा ज्ञान, प्रत्यक्ष अनुभवल्यावर मगच समजते. पण समजल्यावर मागे येऊन सांगण्याची सोय नियंत्याने ठेवलेली नाही. अगदी जिवंतपणी दर्शन दिलेल्या आपल्या देवकी व वसुदेव या माता पित्यांना त्या प्रसंगाची स्मृती, ईश्वराने जन्म घेतल्यावर मायेने पुसून टाकली. यात चमत्कारापेक्षा वैज्ञानिक भाग जास्त आहे, असं माझं स्पष्ट मत आहे.
आपल्या चर्मचक्षूंच्या कक्षेबाहेरील गोष्ट, दृश्य, view काही क्षणासाठी दाखवून, नंतर त्या दृश्याच्या स्मृती देहाच्या मेंदू आणि मन यातून पुसून टाकायच्या म्हणजे खूप मोठी वैज्ञानिक गोष्ट आहे, असं मला वाटतं. असं बघा की आपण संगणकावर किंवा भ्रमण ध्वनीवर काही लिहितो आणि नंतर ते पुसून अर्थात डिलिट करून टाकतो. पुसल्यावर, त्या उपकरणाला त्यातील काही ज्ञात असत नाही.
पण हे आपण RAM म्हणजे Random Access Memory मधून डिलिट करतोच. पण Recycle Beans मधून सुद्धा डिलीट करतो. श्रीकृष्णाने म्हणजे श्री विष्णूंनी दर्शन देऊन, मायेला कार्याला लावून, त्या स्मृती देहाच्या स्मृती पटलावरून पुसून टाकल्या आणि मगच श्रीकृष्ण रूपात जन्म घेतला. म्हणजेच ईश्वरासाठी हा देह एक संगणक आहे. म्हणूनच त्याच्या RAM वरून तो त्या स्मृती पुसून टाकू शकला.
आता यातून अनेक मुद्दे उपस्थित होतात. ते एकदा पाहूया.
1. ईश्वरासाठी हा देह एक संगणक किंवा भ्रमणध्वनी स्वरूप आहे.
2. माया ही देखील ईश्वराचा एक प्रोग्राम अर्थात आज्ञावली असावी. जिचा उपयोग ईश्वर नामक वैज्ञानिक हा, माणूस या देहातील संगणकीय प्रणालीला आज्ञा देण्यासाठी वापरतो.
3. आत्मा हा प्रत्येक देहरूप यंत्रातील शक्ती, ऊर्जा आणि चैतन्यस्वरूप तेज आहे. ज्याच्या अस्तित्वाने देहरूप यंत्रातील सर्व यंत्रणा कार्यरत असतात.
4. ज्ञानेंद्रिये ही या संगणकाला बाह्य गोष्टींचे ज्ञान, आकलन करून देणारी देहांतर्गत नेटवर्क व्यवस्था आहे. ज्यामुळे बाह्य जगतातील सर्व गोष्टींच्या लहरी, ऊर्जा प्राप्त करून त्या मेंदूरूप प्रक्रिया व्यवस्थेला पोचवल्या जातात.
5. मेंदू ही अनेक आज्ञावली असलेली एक हार्ड डिस्क आहे. ज्यामध्ये ज्ञानेंद्रिय रूप नेटवर्क व्यवस्थेकडून आलेल्या लहरी प्राप्त करून, त्या देहाच्या प्रती प्रमाणे डीकोड केल्या जातात. त्या डीकोड करून त्यातून देहाच्या मेंदूच्या व मनाच्या ज्ञानाप्रमाणे अर्थ काढून, त्यावर प्रक्रिया केली जाते.
6. देहाच्या मनाच्या मेंदूच्या ज्ञानाप्रमाणे त्याच लहरींचं आकलन, पृथक्करण आणि प्रतिसाद वा प्रतिक्रिया प्रत्येक देहातून वेगळी दिली जाऊ शकते. ही प्रक्रिया प्रत्येक देहाच्या आतील मन मेंदू मज्जासंस्था यांच्या ज्ञानाच्या गुणवत्तेवर अवलंबून असते.
7. विश्वातील मायारूप प्रणाली, देहातील ज्ञानाच्या
गुणवत्तेवर आपल्या त्या त्या देहावर परिणाम दाखवते किंवा प्रभाव पाडते.
8. ज्यांना या मायेच्या आज्ञाप्रणालीतून बाहेर पडता येतं, ते सर्वोच्च वैज्ञानिकाच्या पुढील कार्यासाठी आत्मस्वरूप ऊर्जा, प्रकाश व चैतन्य या माध्यमातून पुढे जातात. अर्थात ज्ञान रूपात व शुद्धतेच्या कसोटीवर घासूनच.
अजूनही काही मुद्दे आहेत, ज्यावर उद्याच्या भागात विचार करूया. आता इथेच थांबूया.
ॐ शिवशक्ती रुपाय नमः ll
ॐ शिवाय नमः ll
श्रीराम जयराम जय जयराम ll
©® संकल्पना, मांडणी आणि विचार: प्रसन्न आठवले.
9049353809
9960762179
२३/०३/२०२५
Comments
Post a Comment