#आत्मचिंतन_बोध भाग ९
कालच्या भागात आपण पाहिलं की आत्म्याचा श्वासांचा हिशोब संपला की एक श्वास देखील, अतिरिक्त, आत्मा त्या देहात थांबत नाही. थांबू दिला जात नाही. कारण त्या गणितावर, पुढची अनेक गणितं अवलंबून असतात. खूप क्लिष्ट नाही पण थोडं किचकट आहे.बघुया. या जन्मा तील मृत्यूनंतर, त्या आत्म्याचा प्रवास, जो त्याच्या कर्म फलाने ठरलेला आहे किंवा त्या आत्म्याने ठरवला आहे, तो पुढे नेण्याची मोठी जबाबदारी काळ पुरूष,यम, मृत्यूची व्यवस्था, या सर्वांवर सोपवलेली असते.
त्यात कसूर होऊन चालत नाही. कारण त्या आत्म्याचा पुढील जन्म, त्या जन्मातील, अनेक भोग उपभोग, कर्म फल, त्या आत्म्याशी निगडित सर्व आणि सर्वांचे त्या जन्मातील व्यवहार, हे त्या आत्म्याच्या या देहातील गमनावर अवलंबून असतात. म्हणजे एकाचं गणित चुकलं की, त्यावर अवलंबून कितीतरी गणितं चुकू शकतात. बरं ही पुढची गणितं एकाच नव्हे तर पुढील कित्येक जन्मातील, चुकणार. म्हणजे अनेकांच्या त्या आत्म्यासंबंधी कर्म करार चुकू शकतात.
कर्म करार, नवीन वाटला शब्द तरीही त्याचा अर्थ खूप सखोल आहे. तो अर्थ नंतर पाहू, पण पुन्हा मुद्यावर चर्चा करूया. म्हणजे किती बारकाईने आणि विचारपूर्वक ईश्वराने, हे जन्म मृत्यूचं गणित, श्वासांना जोडलं आहे, ते वरील विवेचनातून लक्षात येईल. आपण एखाद्याला, शब्द दिला, इतक्या वाजता, अमक्या ठिकाणी, भेटू.पण अनेक कारणं घडतात आणि आपण वेळेत पोचू शकत नाही. कदाचित त्याचा चक्रवाढ परिणाम,त्याने कोणाला दिलेली वेळ पाळली जाणार नाही. हे चक्र अनेक जणांशी बांधील असतं. ते सर्व चक्र चूकु शकतं.
पण आज न पाळू शकलेली वेळ आणि त्याचा परिणाम, आपल्या व्यवहारात कदाचित रात्रीपर्यंत संपतो आणि उद्या आपण कदाचित ती भेट पूर्ण करतो. पण त्याचा परिणाम, त्या व्यक्तीचं आपल्यामुळे चुकलेलं गणित जुळायला वेळ लागू शकतो. माणसाने निर्माण केलेल्या गोष्टी या, जाऊ द्या उद्या पाहू,या सदरातील असतात. पण ईश्वर हा काटेकोर, अचूक आणि अत्यंत परखड शिस्त पालक आहे.
त्यामुळे त्याने ठरवून.दिलेल्या गोष्टी, नियम, त्यांच्या पालनासाठी असलेली व्यवस्था आणि त्या व्यवस्थेला चालवणारी, त्यानेच निर्माण केलेली लोकपाल इत्यादी, तितकेच काटेकोर, शिस्तीचे असतात. नव्हे असणारच. हे जगत आणि अनेका नेक ब्रम्हांडे, या सर्वांमध्ये ही सर्व व्यवस्था अचूक चालली पाहिजे,यासाठी प्रत्येक देहातील जीवाच्या श्र्वासाच्या काळ हा ठरवून देण्यात आलेला आहे.
म्हणजे आत्म्याचा एकूण श्वासकाळ ही मर्यादा नक्कीच, नक्कीच त्या आत्म्याचा, अनेकानेक देहातील एकूण प्रवासावर असणार. पण प्रत्येक देहात सुद्धा ही मर्यादा असणार. ती मर्यादावेळ संपली की, तो देह सोडून आत्मा निघणार म्हणजे निघणारच. त्याला तशी आज्ञा देणारी व्यवस्था सुद्धा ईश्वराने निर्माण केलेली आहे. त्याच व्यवस्थे नुसार, त्या आत्म्याला, विशिष्ट वेळी, देह सोडून बाहेर निघण्याची आज्ञा सदरची व्यवस्था देते.
विषय मोठा आहे,त्यामुळे उद्याच्या भागात पुढे चिंतन सुरू ठेवूया.
©® संकल्पना आणि लेखन: प्रसन्न आठवले
9049353809 व्हॉट्सॲप
9960762179
०२/११/२०२३
Comments
Post a Comment