जाणिवा, चेतना, संवेदना, साद व प्रतिसाद. ३ सुप्तमनापर्यंत जाण्याआधी मनाचा जरा विचार करूया. मन हे नक्की काय आहे आणि कशाचं बनलं आहे. मुळात मन ही आत्मा आणि देह यांना सांधणारी ती गोष्ट आहे जी प्रसंगी देहाहून जडत्व आणि प्रसंगी आत्म्याहून लवचिकता धारण करू शकते. आपल्या डोक्यात येत असलेले विचार आपल्याला समजून येणं , आपण त्यावर पुनः विचार करणं , शिकलेलं मेंदूत साठवतो पण त्याचा वापर योग्य वेळी करताना त्या त्या बरोबर फाइल्स उघडणं, त्यानुसार मेंदू कार्यरत ठेवणं, एकूणच जड देहाने जे अशक्य भासतं वा वाटतं ते सहजी घडवून आणण्याची असाधारण शक्ती लाभलेली देणगी म्हणजे आपलं मन. त्याची कल्पना एखाद्या विशाल आकाशगंगेच्या खोली इतकी वा एखाद्या अणूरेणूसम भासणाऱ्या कणासम करता येऊ शकेल. म्हणजेच अकल्पित अशी गोष्ट. आता यावर सहज येणारा प्रश्न जर हे इतकं अकल्पित आहे तर मग त्याचा विचार करणं वा त्याला बांधण्याचा प्रयत्न करण्याचा विचार करणं हे अवघड नाहीये का. तर याच उत्तर हो आणि नाही असं दोन्ही देता येईल. असं बघा हे मन हे एखाद्या द्वाड लहान पोरासम पण आहे आणि प्रसंगी ते एखाद्या ज्येष्ठ मुरल...